हिंदूंचे सणही आज दहशतीखाली साजरे करावे लागत आहेत ! – कु. प्राची शिंत्रे, हिंदु जनजागृती समिती

तळेगाव दाभाडे (पुणे) येथील सभेस धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कु. प्राची शिंत्रे यांचे भाषण ऐकतांना धर्मप्रेमी

पुणे, २३ मार्च (वार्ता) – भारतात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका, सण यांवर आक्रमण होणे, दगडफेक करणे, त्या काळात दंगली घडवणे असे प्रकार सर्रास घडतात. हिंदूबहुल भारतात हिंदूंनी हे किती काळ सहन करायचे ? हिंदूंचे सण आजही दहशतीखाली साजरे करावे लागत आहेत. आपण भारतात रहातो कि पाकिस्तानात ? हिंदूबहुल भारतात हिंदूंचे सण साजरे करता येत नसतील, तर याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. वारंवार होणार्‍या दंगली आणि त्‍यांमुळे होणारी हानी रोखण्यासाठी सरकारने कठोर, तर हिंदूंनी संघटित व्‍हावे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्राची शिंत्रे यांनी केले. त्या येथील तळेगाव दाभाडे येथे आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होत्या. या वेळी त्यांनी वक्फ बोर्ड, तसेच लव्ह जिहादचा समाजाला पडत चाललेला विळखा यांविषयीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सभेला १५० हून अधिक महिला, युवती आणि युवक उपस्थित होते.

स्वसंरक्षण प्रात्यक्षिके करतांना समितीच्या कार्यकर्त्या

सध्या धर्मावर होत असलेले आघात आणि त्या विरोधात हिंदु जनजागृती समितीने उचललेली ठोस पावले याविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. महेश पाठक यांनी उपस्थितांना अवगत केले.

वैशिष्ट्यपूर्ण

१. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

२. या वेळी स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर करण्यात आली, त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

३. वक्त्यांनी ‘धर्मकार्यामध्ये सहभागी होणार का ?’, असे विचारल्यानंतर प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हात उंचावून सर्वांनी कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मकता दर्शवली.