Indian Activist Released From Saudi Prison : पाकिस्तानविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याविषयी कारागृहात असलेले झहेक तन्वीर यांची १ वर्षानंतर सुटका

पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

भारतीय मानवाधिकार कार्यकर्ते झहेक तन्वीर

रियाध – सौदी अरेबियात एक वर्ष कारागृहात असलेले भारतीय मानवाधिकार कार्यकर्ते झहेक तन्वीर यांची सुटका करण्यात आली आहे. पाकिस्तानविरोधी ‘पोस्ट’ प्रसारित केल्याविषयी झहेक तन्वीर यांना डिसेंबर २०२३ मध्ये सौदी अरेबियात अटक करण्यात आली होती. झहेक यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणार्‍या भारतीय दूतावासाचे आभार मानले. झहेकने भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि भारतीय राजदूत सुहेल एजाज खान यांचे विशेष आभार मानले आहेत.

१. ३९ वर्षीय झहेक तन्वीर यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेंस’ म्हणजेच आय.एस्.आय.च्या तक्रारीनंतर डिसेंबर २०२३ मध्ये सौदी पोलिसांनी त्यांना अटक केली होती.

२. त्यांच्यावर पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. सौदी अधिकार्‍यांनी ‘झहेक यांची ‘पोस्ट’ पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामधील राजनैतिक संबंधांना हानी पोचवणारी आहे’, असे सांगून त्यांना अटक केली होती.

३. झहेक तन्वीर यांनी सांगितले, ‘माझ्या ‘पोस्ट’चा हेतू राजनैतिक दरी निर्माण करण्याचा नव्हता. मी केवळ पाकिस्तानमध्ये कट्टरतावादाला प्रोत्साहन देण्याविषयी लिहिले होते.’

४.  झहेक तन्वीर हे मूळ भारतातील भाग्यनगर (हैदराबाद) येथील रहिवासी आहेत.  अटक होण्यापूर्वी १३ वर्षांपासून ते सौदी अरेबियात वास्तव्य करत होते.

संपादकीय भूमिका

सौदी अरेबिया २ देशांमध्ये दरी निर्माण करणारी पोस्ट केल्याप्रकरणी संबंधिताला कारागृहात टाकतो, तर भारत हिंदु धर्म, हिंदूंच्या देवता यांच्याविषयी विखारी ‘पोस्ट’ करणार्‍यांच्या विरोधात काहीही करत नाही, हे संतापजनक !