सध्या महाकुंभपर्वामध्ये महाकुंभाचे महत्त्व सांगणारी वृत्ते प्रसारित होत असतांनाच एक वृत्त प्रसिद्ध झाले. त्यात हर्षा रिछारिया यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केलेल्या लिखाणामुळे आणि त्यांच्या विविध पोषाख अन् रंगभूषा केलेल्या छायाचित्रांमुळे त्या प्रसिद्ध झाल्या आहेत; किंबहुना प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रसिद्ध केले आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे ‘साधू’ किंवा ‘साध्वी’ या हिंदु धर्मातील अत्यंत श्रद्धेय व्यक्तीत्वाची अपकीर्ती होत आहे; कारण प्रसारमाध्यमे त्यांना ‘साध्वी’ म्हणून संबोधत आहेत. त्यांना अशा प्रकारे प्रसिद्धी देऊन ‘साधुत्वा’ची अपकीर्ती करणार्या प्रसारमाध्यमांनीही हिंदूंच्या भावना दुखावून हिंदु धर्माची अपकीर्ती केली आहे. हे केव्हाही निषेधार्हच आहे.
हर्षा रिछारिया यांची ‘सर्वांत सुंदर साध्वी’ अशा प्रकारे मथळे देऊन छायाचित्रे प्रसिद्ध करणार्या प्रसारमाध्यमांवर हिंदु धर्माभिमान्यांनी खरे तर बहिष्कार टाकायला हवा. कुंभमेळ्याच्या काळात रंगभूषा करून अशी छायाचित्रे काढून देणार्या या महिलाही त्याला तेवढ्याच उत्तरदायी आहेत. या सर्व छायाचित्रांच्या शेवटी ‘मी साध्वी नाही’, असे त्या म्हणत असल्याचेही प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जर त्या स्वतःला साध्वी म्हणत नाहीत, तर प्रसारमाध्यमे त्यांना ‘साध्वी’ या नावाने का संबोधत आहेत ? याचा अर्थ प्रसारमाध्यमांना ‘साध्वी’ या शब्दाचा अर्थ आणि गांभीर्य कळलेच नाही, असा होतो किंवा केवळ सवंग प्रसिद्धीसाठी प्रसारमाध्यमे हिंदु धर्माची अपकीर्ती करत आहेत. अन्य धर्मियांच्या संदर्भात असे करण्याचे त्यांचे धैर्य आहे का ?
‘साध्वी’ या संन्यास घेतलेल्या असतात. संन्यास घेणे, हे वैराग्याचे प्रतीक असते. संन्यास घेणे, ही सोपी गोष्ट नाही. जीवनातील सर्व सुखांचा त्याग करून साध्वी या व्रतस्थ जीवन जगत असतात. ही जीवनशैली त्यांच्या साधनेचा भाग असतो. हिंदु धर्मात असे लक्षावधी साधू किंवा साध्वी असणे, हा हिंदु धर्माचा गौरव आहे. हिंदु धर्मातील अशा आध्यात्मिक व्यक्तीत्वांच्या सामर्थ्यामुळेच आज भारत गौरवशाली देश आहे. विदेशातील महनीय व्यक्ती आज भारताकडे आकर्षित होण्याचे कारण असे कित्येक साधूजन हेच आहेत.
रिछारिया स्वतःला साध्वी म्हणवून घेत नसतांना प्रसारमाध्यमांनी त्यांना तसे संबोधणे, हे केवळ हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारेच नव्हे, तर तो देशाच्या संस्कृतीचाही अवमान आहे. यासाठी कुणी त्यांच्यावर खटला प्रविष्ट केला, तर आश्चर्य वाटायला नको. रिछारिया यांनी महाकुंभमेळ्यामध्ये येऊन ‘प्रेम करणार्या व्यक्ती’ला वश करण्यासाठीचा मंत्र सांगितल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अशा चुकीच्या गोष्टींचा संबंध धर्म, अध्यात्म, हिंदु संस्कृती यांच्याशी कुठे ना कुठे जोडला जाता कामा नये, याचे भान अशा व्यक्ती आणि प्रसारमाध्यमे यांनी ठेवणे आवश्यक आहे.
– सौ. रुपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.