‘सध्या प्रयागराज येथे महाकुंभपर्व चालू आहे. कुंभमेळा ही हिंदूंसाठी धार्मिक आणि आध्यात्मिक पर्वणी असते. रवि, चंद्र आणि गुरु यांची विशिष्ट स्थिती असतांना कुंभमेळ्याचे आयोजन होते. आता कुंभमेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून जाणून घेऊया.
१. गुरु आणि रवि (सूर्य) यांच्यातील शुभयोगामुळे ज्ञानशक्ती, बुद्धीची सात्त्विकता आणि वातावरणातील पावित्र्य वाढणे
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2024/04/08223200/Raj_Karve.jpg)
गुरु ग्रह मेष राशीत (किंवा वृषभ राशीत) आणि रवि मकर राशीत असतांना प्रयागराज येथे कुंभमेळा होतो. सध्या गुरु ग्रह वृषभ राशीत आणि रवि मकर राशीत आहे; त्यामुळे त्यांच्यात ‘नवपंचमयोग’ हा शुभयोग झाला आहे. गुरु आणि रवि यांच्यातील शुभयोग आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असतो. गुरु ग्रह सात्त्विकता, व्यापकता, पवित्रता, ज्ञान आदींशी संबंधित आहे; तर रवि हा तेज, बुद्धी, कीर्ती, बळ आदींशी संबंधित आहे. गुरु आणि रवि यांच्यात शुभयोग झाल्यावर लोकांची ज्ञानशक्ती वाढते, म्हणजे त्यांची वैचारिक शक्ती अन् चिंतनशीलता वाढते. त्यांच्या बुद्धीची सात्त्विकता आणि मनाची अंतर्मुखता वाढते. वातावरणातील पावित्र्य वाढते. गुरु आणि रवि यांच्यातील शुभयोगामुळे साधनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते.
२. कुंभपर्वात सहभागी झालेल्या भाविकांना आध्यात्मिक बळ मिळणे
गुरु आणि रवि यांच्यातील शुभयोगामुळे निर्माण झालेली सात्त्विकता ‘प्रयागराज’सारख्या पवित्र तीर्थक्षेत्री पुष्कळ प्रमाणात आकृष्ट होते. त्यामुळे कुंभपर्वात सहभागी झालेल्या भाविकांनी गंगास्नान, नामजप, ध्यानधारणा, अनुष्ठान, यज्ञ आदी साधना केल्याने त्यांच्यात सात्त्विकता आणि तेज पुष्कळ प्रमाणात वाढते. त्यांचे शरीर, मन आणि बुद्धी पवित्र होऊन त्यांना पुढील साधना करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळते.
३. पर्वकाळी विशेष गंगास्नान केल्याने मनाची शुद्धी होऊन अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून जिवाचे रक्षण होणे
प्रयागराज येथे कुंभपर्व असतांना ‘मकरसंक्रांती’, ‘पौष अमावास्या’ (मौनी अमावास्या) आणि ‘वसंतपंचमी’ हे ३ पर्वकाळ (महान पुण्य काळ) असतात. (या वर्षी मकरसंक्रांती १४ जानेवारी या दिवशी होती, तर पौष अमावास्या २९ जानेवारी आणि वसंतपंचमी २ फेब्रुवारी या दिवशी असणार आहे.) या ३ दिवशी विशेष गंगास्नान (अमृत स्नान) केले जाते. हा पर्वकाळ असतांना गुरु आणि रवि यांच्याशी चंद्राचाही शुभयोग होतो. चंद्र मनाचा कारक आहे. मन स्वभावतः चंचल आणि बहिर्मुख असल्याने व्यक्तीच्या साधनेत अडथळे निर्माण करणारे असते. त्यामुळे पर्वकाळी विशेष गंगास्नान केल्याने भाविकांच्या मनाची शुद्धी होते, तसेच अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून त्यांचे रक्षण होते.
४. संपूर्ण भारताला कुंभपर्वाचा आध्यात्मिक लाभ होणे
सध्याच्या प्रयागराज येथील महाकुंभपर्वात ४० कोटींहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाने एकत्र येऊन साधना आणि उपासना केल्यामुळे संपूर्ण भारताला याचा आध्यात्मिक लाभ होऊ शकतो. समाजाची एकंदर सात्त्विकता यामुळे वाढू शकते. रज-तमाचे प्राबल्य न्यून होऊन धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊ शकते. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येऊ शकते. समाजाचा अध्यात्माकडे कल वाढून अनेक लोक साधना करण्यास प्रवृत्त होऊ शकतात.’
– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वाविद्यालय, गोवा. (२३.१.२०२५)
संपादकीय भूमिकामहाकुंभमेळ्यामुळे सात्त्विकता वाढून रज-तमाचे, म्हणजेच धर्मविरोधी शक्तींचे बळ क्षीण होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेला गती येईल ! |
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |