Dress Code In Siddhivinayak Mandir Mumbai : मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाकडून वस्त्रसंहिता लागू

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

मुंबई : प्रभादेवी, दादर येथील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर न्यासाने पुढील आठवड्यापासून वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने २८ जानेवारी या दिवशी न्यासाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

मंदिर न्यासाचे पदाधिकारी राहुल लोंढे यांनी याविषयीची माहिती दिली. या संदर्भात मंदिर न्यासाकडून परिपत्रक काढण्यात आले आहे.

मंदिरात येतांना महिला आणि पुरुष यांचा पोषाख शालीनता आणि पावित्र्य जपणारा असावा. कुणालाही संकोच वाटेल, असा असू नये. काही महिला किंवा पुरुष अर्धी विजार (शॉर्ट्स) घालून येतात. अशा पद्धतीचा पोषाख नसावा. सण किंवा लग्नसोहळा या वेळी ज्या पद्धतीने पुरुष सदरा अथवा पूर्ण विजार किंवा महिला साडी अथवा पंजाबी पोषाख परिधान करतात, त्याप्रमाणे अंगभर पोषाख असावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.