उद्यापासून (१३ जानेवारीपासून) प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे चालू होणार्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने…
महाकुंभ २०२५
प्रयागराजचे आकर्षक स्वरूप![]() प्रयागराजला आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे. येथे येणार्या भाविकांना आकर्षित करण्यासाठी शहराला विशेष रूप देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाने शहरातील भिंती आणि प्रमुख चौक यांच्या भव्य स्वरूपासाठी ६० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ठेवले आहे. त्यात शहरातील प्रमुख भिंतीवर चित्र काढणे, चौकाचौकात विविध शैलीतील शिल्पे, वाहतूक चिन्हे, हरित पट्टे आणि बागकाम इत्यादींचा समावेश आहे. शहरातील भिंतींवर धर्म, अध्यात्म आणि संस्कृती यांची विविध प्रतिके कोरण्यात येणार आहेत. भिंतींवर अशी चित्रे काढण्यात येत आहेत, जणू ती आपल्याशी संवाद साधत आहेत आणि या प्राचीन शहराविषयी सांगत आहेत. अशा प्रकारे शहरातील अनुमाने ३५ लाख फुटांमध्ये अशी चित्रे चितारण्यात येणार आहेत. |
महाकुंभ शहरासाठी विशेष प्रकल्प![]() या महाकुंभला ४५ कोटी लोक उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक रोजगार, व्यापार, प्रादेशिक हस्तकला आणि कला, तसेच पर्यटन यांना चालना मिळेल. कुंभमेळ्याच्या निमित्ताने सरकार प्रत्येक परिसरातील पायाभूत सुविधांचा विकास करते. त्याचा लाभ हा नागरिकांनाच होतो आणि व्यवसाय सुलभ होतो. महाकुंभसाठी योगी आदित्यनाथ यांच्या राज्य सरकारने ५०० हून अधिक प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या प्रकल्पांचे एकूण मूल्य अनुमाने ६ सहस्र ३८२ कोटी रुपये आहे. त्यात रस्त्यांचे रुंदीकरण, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकणे, अशा प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा समावेश आहे. या महाकुंभ नगरीच्या स्थापनेसाठी ५० सहस्रांहून अधिक कामगार अहोरात्र झटत आहेत. प्रयागराजला जाणार्या सर्व रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले. |
महाकुंभमध्ये विशेष ‘तंबू नगरी’ची उभारणी![]() महाकुंभात २ सहस्रांहून अधिक ‘पेईंग गेस्ट’ तंबूंसह राज्य सरकारने कुंभ परिसरात भाविकांसाठी २ सहस्रांहून अधिक ‘स्विस कॉटेज’ शैलीचे तंबू उभारले आहेत. त्यासाठी आलिशान ‘तंबू नगरी’ उभारण्यात येत आहे. हे ‘उत्तरप्रदेश राज्य पर्यटन विकास महामंडळ लिमिटेड’ बनवत आहे. ते ६ भागीदारांच्या सहकार्याने ही नगरी उभारत आहे. तंबू नगरीमध्ये अनेक प्रकारचे कक्ष उभारले जात आहेत. या कक्षांमध्ये ‘आगमान’, ‘कुंभ कँप इंडिया’, ‘ऋषीकुल कुंभ कॉटेज’, ‘कुंभ व्हिलेज’, ‘कुंभ कॅनव्हास’, ‘कुंभ युग’ इत्यादी प्रमुख आहेत. या तंबूंमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाप्रमाणे पंचतारांकित हॉटेल सुविधा असतील. हे ‘सुपर डिलक्स’ (विशेष सुविधांनी युक्त), ‘टेंट व्हिला’ (तंबूसारखे घर), ‘महाराजा’, ‘स्विस कॉटेज’ (काही सुविधांयुक्त तंबू) आणि ‘डॉर्मिटरी फॉरमॅट’ मध्ये (शयनगृह स्वरूपात) उपलब्ध असेल. |
केंद्र आणि उत्तरप्रदेश शासन यांच्या दृष्टीकोनातून महाकुंभचे महत्त्व
‘या वेळी प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येणारा महाकुंभ हा केवळ परंपरा आणि आधुनिकतेचा संगम नसून प्रत्येक दृष्टीने स्वतःमध्ये एक अद्वितीय असेल. प्राचीन काळापासून आजपर्यंत धर्म, संस्कृती आणि परंपरा, तसेच सामाजिकता अन् व्यवसाय यांसाठी महाकुंभ हे एक मोठे व्यासपीठ राहिले आहे. महाकुंभासाठी जगभरातून येणार्या भाविकांमुळे राज्य सरकारला आर्थिक लाभ होणार आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सरकारनेही कुंभच्या यशस्वी आयोजनासाठी नेहमीच प्रयत्न केले. ब्रिटिशांसाठी कुंभमेळा धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीकोनातून महत्त्वाचा नसला, तरी आर्थिकदृष्ट्या फार महत्त्वाचा होता. वर्ष १९०६ पर्यंत ब्रिटीश सरकार महाकुंभ आयोजित करण्यात जितका व्यय करायची, त्याहून अधिक महसूल या मेळ्यातून त्यांना मिळत होता.

हे लक्षात घेऊन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वर्ष २०२२ मध्येच प्रयागराज महाकुंभ वर्ष २०२५ ची सिद्धता चालू केली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली वर्ष २०२२ मध्येच ‘महाकुंभ २०२५’ संदर्भात पहिली बैठक आयोजित केली होती. त्या काळात मुख्यमंत्री योगींनी प्रयागराजलाही अनेक वेळा भेटी दिल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कार्यक्रमात प्रचंड रस दाखवला. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ कार्यक्रमाच्या सिद्धतेचा वैयक्तिक आढावा घेण्यासाठी प्रयागराजला पोचले. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांनी महाकुंभ कार्यक्रमाशी संबंधित अनेक प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटने अन् अनावरण केले. अशा प्रकारे हा कार्यक्रम जागतिक पटलावर आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
स्थानिक लोकांना रोजगार देण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारचे विशेष प्रयत्न
एका अंदाजानुसार यंदाच्या महाकुंभातून ४५ सहस्र कुटुंबांना रोजगार मिळणार आहे. ७५ सहस्र कामगारांना काम देण्यात आले आहे. महाकुंभासाठी कौशल्य विकास अंतर्गत ४५ सहस्र कुटुंबांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाहेरून येणार्या यात्रेकरूंना रहाण्यासाठी राज्यशासनाने शहरात २ सहस्रांहून अधिक ‘पेईंग गेस्ट (पाहुण्यांसाठी) सुविधा’ विकसित केल्या आहेत.
उत्तरप्रदेश शासनाने वर्ष २०२२ मध्ये पर्यटन धोरण सिद्ध केले होते. त्यात १० लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. हे प्रशिक्षित सेवा पुरवठादार या महाकुंभात मोठी भूमिका बजावणार असून त्यांना रोजगार मिळणार आहे. त्यात पर्यावरणपूरक मातीची भांडी, द्रोण आदी स्वयंरोजगार महत्त्वाची भूमिका बजावतील. त्यामुळे लघु उद्योगांना मोठा लाभ होणार आहे.
उत्तरप्रदेशाचा ‘पर्यटन विभाग टूर गाईड’ (पर्यटक मार्गदर्शक) विभाग चालक, नाविक आणि रस्त्यावरील विक्रेते यांसह अनेक प्रकारच्या सेवा प्रदात्यांना सर्व प्रकारचे प्रशिक्षण देत आहे. पर्यटन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि नौकाधारकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी २ सहस्रांहून अधिक नाविकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यात भाविकांशी व्यवहार कुशलतेने वागण्यापासून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. यासह कुंभकाळात अन्नाची शुद्धता राखण्यासाठी स्थानिक महिला मातीच्या चुलीची विक्री करत आहेत. यातून प्रत्येक सेवा पुरवठादार आणि लघु उद्योगाशी निगडित लोकांना महाकुंभात येणार्या भाविकांशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे जोडून घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यातून येणार्या भाविकांना धार्मिक अन् सांस्कृतिक अनुभवासह आदरातिथ्याचा अनुभव मिळेल.
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन (व्होकल फॉर लोकल)
उत्तरप्रदेशाच्या योगी आदित्यनाथ शासनाने ‘प्रयागराज महाकुंभ २०२५’ च्या माध्यमातून राज्याच्या स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याची योजना आखली आहे. यासाठी शासनाने पंतप्रधान मोदींचा ‘व्होकल फॉर लोकल’ हा मुख्य मंत्र बनवला आहे. या कालावधीत ‘एक जिल्हा, एक उत्पादन’, म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यातील एका मोठ्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
बनारसच्या साड्या, मुरादाबादच्या पितळी वस्तू, गोरखपूरचा टेराकोटा आणि बांदाच्या शजर दगडापासून बनवलेल्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर प्रसिद्धी अन् प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील संबंधित उत्पादनांचा व्यवसायही वाढण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर ‘व्होकल फॉर लोकल’ला प्रोत्साहन दिले होते आणि उत्तरप्रदेश शासनाने त्यात एक नवीन मानक स्थापित केले आहे.
महाकुंभामध्ये ७५ देशांतील ४५ कोटी भाविकांचे आगमन
प्रयागराज येथे होणार्या ‘महाकुंभ २०२५’मध्ये जगभरातील ७५ हून अधिक देशांतील ४५ कोटी भाविक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. यात भाविकांपासून पत्रकार आणि अभ्यासक यांच्यापर्यंत सर्वांचा समावेश आहे. महाकुंभ पहाण्यासाठी एकट्या युरोपातून सुमारे ४ लाख पर्यटक येऊ शकतात. युरोपमधील अनेक देशांतील ‘टूर ऑपरेटर्स’नी उत्तरप्रदेश पर्यटन विभागाशी संपर्क साधला आहे. संयुक्त अरब अमिरात, बहरीन, कुवेत आदी मुसलमान देशांतील पर्यटकही महाकुंभ पहाण्यासाठी प्रयागराजमध्ये हॉटेल्सची नोंदणी करत आहेत. अशा प्रकारे विदेशी पर्यटकांच्या आगमनामुळे भारताला परकीय चलनही मिळेल. त्यामुळे भारतासह उत्तरप्रदेशाची अर्थव्यवस्था बलवान होईल. यासमवेतच उत्तरप्रदेशाची जगभरात ओळख होईल.
वर्ष २०१९ च्या महाकुंभात २४ कोटी भाविक सहभागी झाले होते. त्यापैकी २५ लाख विदेशी पर्यटक होते. या वेळी ही संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तरप्रदेशात कायदा आणि सुव्यवस्थेत अभूतपूर्व सुधारणा झाल्या. त्याचे जागतिक स्तरावर स्वागत होत आहे, तसेच त्याकडे विश्वासाच्या रूपातही पाहिले जात आहे. वर्ष २०२३ मध्ये एकूण ४८ कोटी पर्यटक उत्तरप्रदेशात आले होते. यामध्ये देशी-विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. हा आकडा वर्ष २०२२ च्या तुलनेत ५० टक्क्यांनी अधिक होता. वर्ष २०२८ मध्ये हा आकडा ८५ कोटींवर पोचेल, अशी अपेक्षा आहे. यासंदर्भात यावर्षीच्या महाकुंभाची भूमिका महत्त्वाची ठरते.
प्रयागराजहून अन्य धार्मिक स्थळांपर्यंत विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था
महाकुंभासाठी येणारे भाविक विंध्याचल, अयोध्या, वाराणसी, वृंदावन आणि मथुरा या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांनाही भेट देऊ शकतात. महाकुंभ यात्रेच्या काळात यात्रेकरूंना या देवस्थानांचे दर्शन घेता यावे, यासाठी राज्य सरकारने धार्मिक ‘कॉरिडॉर’ सिद्ध केला आहे. यामध्ये वाराणसीच्या जलमार्गापासून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यापर्यंत विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रयागराज महाकुंभाला वाराणसीशी थेट जोडण्यासाठी रेल्वेने वाराणसी कँट ते प्रयागराज या मार्गांवर ३४ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रयागराज ते अयोध्या, प्रयागराज ते विंध्याचल आणि प्रयागराज ते मथुरा-वृंदावन या मार्गांवर अशाच विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या शहरांसाठी ‘फास्ट रिंग मेमू’ सेवा (महानगरांसाठी चालवण्यात येणारी जलद रेल्वे) चालू करण्यात आली आहे. एक रेल्वे प्रयागराज, अयोध्या, वाराणसी आणि परत प्रयागराज, तर दुसरी रेल्वे गाडी प्रयागराजहून वाराणसी, अयोध्या आणि नंतर प्रयागराज अशी असेल. ही सेवा मुख्य स्नानपर्व वगळता सर्व दिवस चालू असेल.
(साभार : ‘ऑपइंडिया’चे संकेतस्थळ)
अर्धकुंभ, कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ यांमध्ये भेद अन् त्यांची खगोलीय गणना !
‘यावर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा होत आहे, जो प्रत्येक १४४ वर्षांनी एकदा होतो. गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती या नद्यांच्या पवित्र संगमावर आयोजित करण्यात आलेला हा मेळा धार्मिक श्रद्धा अन् भारतीय संस्कृती यांचा सर्वांत मोठा उत्सव समजला जातो. या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी देश-विदेशातून कोट्यवधी भाविक येत आहेत. महाकुंभात संगमावर स्नानाला विशेष महत्त्व आहे. या वेळी स्नान केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्ती होते, असे समजले जाते. ऋषी, संत, महंत आणि नागा साधूंचे आखाडे हेही या कुंभमेळ्यात सहभागी होतात. हा महाकुंभ केवळ धार्मिक श्रद्धेचे प्रतीक नसून भारतीय संस्कृती आणि एकात्मता यांचा उत्सव आहे. या वेळी प्रयागराजमध्ये आयोजित कुंभमेळ्याला ‘महाकुंभ’ म्हटले जात आहे, असे का ? कुंभ, अर्ध कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ यात काय भेद आहे ? आणि त्यांची खगोलीय गणना कोणत्या आधारावर केली जाते ?, हे या लेखाद्वारे पाहूया.
१. कुंभ आणि महाकुंभ यांची खगोलीय गणना
महाकुंभमेळा हा भारतीय संस्कृतीचा असा पवित्र सण आहे, ज्याचे प्रतिध्वनी प्राचीन ग्रंथांपासून आधुनिक युगापर्यंत ऐकायला मिळतात. हा मेळा केवळ श्रद्धेचे प्रतीक नाही, तर भारतीय तत्त्वज्ञान, परंपरा आणि खगोलशास्त्रीय विज्ञान यांचा अद्भुत संगम आहे. पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या पवित्र स्थळांवर अमृताचे थेंब पडले. त्यामुळेच या ४ ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
खगोलशास्त्रीय गणनेच्या आधारे अनादी काळापासून कुंभ आणि महाकुंभ आयोजित केले जातात. विष्णु पुराणात उल्लेख आहे की, जेव्हा गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मेष राशीत असतो, तेव्हा हरिद्वारमध्ये कुंभ आयोजित केला जातो. अशाच प्रकारे जेव्हा सूर्य आणि गुरु हे सिंह राशीत असतो, तेव्हा नाशिकमध्ये कुंभ साजरा केला जातो. जेव्हा गुरु कुंभ राशीत प्रवेश करतो, तेव्हा उज्जैनमध्ये कुंभ होतो. प्रयागराजमध्ये माघ अमावस्येला सूर्य आणि चंद्र मकर राशीत आणि गुरु मेष राशीत असतो, तेव्हा तेथे कुंभ होतो. ही खगोलीय गणना आजही तंतोतंत पाळली जाते.
२. अर्ध कुंभमेळा
अर्ध कुंभ हा एक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, जो प्रत्येक ६ वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज येथे होतो. याचे आयोजन गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर होते, ज्याला धार्मिक दृष्टीकोनातून अत्यंत पवित्र समजले जाते. अर्धकुंभाचे महत्त्व अधिक आहे; कारण ते कुंभमेळ्याचे अर्धे चक्र समजले जाते. यामध्ये लाखो भाविक स्नानासाठी येतात; कारण या वेळी संगमात स्नान केल्याने पापांचा नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. त्याच्या आयोजनाची वेळही खगोलशास्त्रीय गणनेवर आधारित आहे. जेव्हा गुरु वृश्चिक राशीत प्रवेश करतो आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा अर्धकुंभाचे आयोजन केले जाते.
३. कुंभमेळा
कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे, जो प्रत्येक १२ वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ४ ठिकाणी आयोजित केला जातो. हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचे प्रतीक समजले जाते. कुंभमेळ्याची पौराणिक कथा समुद्रमंथनाशी संबंधित आहे. त्या वेळी अमृतकलशासाठी देव आणि दानव यांच्यात संघर्ष झाला होता. मुख्य, म्हणजे पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, ज्याला ‘अमृतस्नान’ म्हणतात. हा मेळाही खगोलशास्त्रीय गणनेवर आधारित आहे. गुरु सिंह राशीत आणि सूर्य मेष राशीत असतांना कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याखेरीज हा दिनांक ठरवण्यासाठी इतर ग्रहांची स्थितीही महत्त्वाची असते.
४. पूर्ण कुंभमेळा
पूर्ण कुंभमेळा हा कुंभमेळ्याचा विस्तार आहे, जो प्रयागराजमध्ये प्रत्येक १२ वर्षांनी भरतो. हे कुंभचे पूर्ण रूप समजले जाते आणि त्याचे महत्त्व इतर कुंभमेळ्यांहून अधिक आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या संगमावर आयोजित या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आत्म्याचे शुद्धीकरण आणि मोक्षप्राप्ती हा आहे. शास्त्र आणि पुराण यांमध्ये पूर्ण कुंभाच्या आयोजनाचे वर्णन केले आहे. या मेळ्यात लाखो भाविक आणि संत सहभागी होतात. विशेषत: नागा साधू आणि आखाडे यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या काळात धार्मिक विधी, हवन, कथाकथन आणि प्रवचन होते. खगोलीय गणनेच्या आधारे पूर्ण कुंभमेळा आयोजित केला जातो.
५. महाकुंभमेळा
महाकुंभमेळा हा भारतीय धार्मिक कार्यक्रमांमधील सर्वांत मोठा उत्सव आहे, जो प्रत्येक १४४ वर्षांनी केवळ प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. हा कुंभमेळ्याचा सर्वांत पवित्र आणि महत्त्वाचा प्रकार समजला जातो.
धार्मिक ग्रंथानुसार या मेळ्यात संगमावर स्नान केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि पापांपासून मुक्ती मिळते. महाकुंभमेळ्याचे आयोजन खगोलशास्त्रीय गणनेवर आधारित आहे. जेव्हा गुरु, सूर्य आणि चंद्र एका विशिष्ट स्थितीत असतात, तेव्हा या मेळ्याचे आयोजन होते. विशेष म्हणजे महाकुंभाचे आयोजन १२ पूर्ण कुंभांसह प्रत्येक १४४ वर्षांनी केले जाते आणि तेही केवळ प्रयागमध्ये. वर्ष २०१३ मध्ये प्रयागराजमध्ये पूर्ण कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी या महाकुंभाची १२ वी वेळ, म्हणजेच १४४ वे वर्ष आहे. त्यामुळे या पूर्ण कुंभला ‘महाकुंभमेळा’ म्हटले जात आहे.
प्रत्येक १४४ वर्षांनी होणार्या महाकुंभाकडे देव आणि मानव यांचा संयुक्त उत्सव म्हणून पाहिले जाते. धर्मग्रंथानुसार पृथ्वीवरील एक वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे असते. या गणनेच्या आधारे १४४ वर्षांचा कालावधी महाकुंभ म्हणून साजरा केला जातो.
अर्ध कुंभ, कुंभ, पूर्ण कुंभ आणि महाकुंभ असे प्रत्येक प्रकारचे कुंभमेळे हिंदु धर्म अन् भारतीय संस्कृती यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या आयोजनांमागे पौराणिक आणि ज्योतिषशास्त्रीय मान्यता आहेत, जे त्यांचे वैशिष्ट्य आणखी वाढवते. महाकुंभ केवळ प्रयागराजमध्ये आयोजित केला जातो. त्यामुळे तो आणखी वैशिष्ट्यपूर्ण बनतो. वर्ष २०२५ चा महाकुंभमेळा हा केवळ आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र नसून भारतीय सांस्कृतिक वारशाचे भव्य प्रदर्शनही असेल.’
(साभार : ‘ऑपइंडिया’चे संकेतस्थळ)