साधिकेच्‍या मोठ्या बहिणीच्‍या शारीरिक त्रासांवर अचूक नामजपादी उपाय शोधून देणारे सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची साधिकेला जाणवलेली महानता !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. साधिकेच्‍या मोठ्या बहिणीला असलेल्‍या शारीरिक त्रासांची तीव्रता  

‘माझी मोठी बहीण सौ. शुभदा श्रीराम साने (वय ७३ वर्षे) अनुमाने १२ वर्षांपासून संधीवाताने रुग्‍णाईत आहे. संधीवातामुळे तिचे हात-पाय वाकडे झाले आहेत. तिला ‘स्‍टिरॉइडस्’ (सांधेसूज या रोगावर उपाय करणारी एक प्रकारची संप्रेरके) घ्‍यावी लागत आहेत. तिला मूत्रपिंड आणि हृदय यांच्‍याशी संबंधित त्रास आहे. तिला हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) आला होता. तिच्‍या शारीरिक स्‍थितीमुळे तिच्‍या हृदयातील रक्‍तवाहिन्‍यांत असलेले अडथळे (ब्‍लॉकेजेस्) काढायला आधुनिक वैद्यांनी नकार दिला. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘सौ. साने यांना ते सहन होणार नाही.’’

सौ. शुभदा साने

२. बहिणीला असलेला संधीवाताचा त्रास दूर होण्‍यासाठी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नामजपादी उपाय सांगणे 

बहिणीला असलेला संधीवाताचा त्रास दूर होण्‍यासाठी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिला ‘श्रीराम जय राम जय जय राम । श्री दुर्गादेव्‍यै नमः। ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप दिला आहे. हा नामजप ती नियमितपणे तिला होईल तितका करते.

३. साधिकेची बहीण स्नानगृहात पडणे आणि तिच्‍या दोन्‍ही हातांचा अस्‍थिभंग होणे  

२७.७.२०२३ या दिवशी बहीण स्नानगृहात पडली. तेव्‍हा तिच्‍या दोन्‍ही हातांचा अस्‍थिभंग (फ्रॅक्चर) झाला. तिच्‍या एका हाताच्‍या हाडाला चीर गेली आणि दुसर्‍या हाताच्‍या हाडाचे २ तुकडे होण्‍याच्‍या स्‍थितीत होते. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्‍त्रकर्म करणे, हाच यावर उपाय आहे’’; पण तिला शस्‍त्रकर्म पेलवणार नव्‍हते; कारण तिला भूल देणेही शक्‍य नव्‍हते. तिच्‍या दोन्‍ही हाताला ‘प्‍लास्‍टर’ घालावे लागले.

४. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेच्‍या बहिणीला हाडे जुळून येण्‍यासाठी नामजप सांगणे

मी सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितले. त्‍यांनी बहिणीला हाडे जुळून येण्‍यासाठी ‘श्री गणेशाय नमः । श्री हनुमते नमः । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला.

श्रीमती रजनी नगरकर

५. बहीण काही कारणाने संधीवातासाठीची औषधे घेऊ शकत नसतांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिला संधीवाताचा त्रास दूर होण्‍यासाठी दिलेला नामजप अधिक वेळ करायला सांगणे 

बहिणीला ‘स्‍टिरॉइड्‍स’ बंद करायला सांगितली; कारण तिच्‍यावर अन्‍य औषधांचा परिणाम होत नव्‍हता. ‘स्‍टिरॉइड्‍स’ बंद केल्‍यावर तिचा संधीवाताचा त्रास बळावला. तिला २ दिवस संधीवातासाठी आणि २ दिवस हाडे जुळण्‍यासाठी औषधे घ्‍यायला सांगितले होते. मी सद़्‍गुरु गाडगीळकाकांना याविषयी सांगितले. तेव्‍हा ते म्‍हणाले, ‘‘जेव्‍हा संधीवातावरील औषधे बंद असतील, तेव्‍हा संधीवात दूर होण्‍यासाठी सांगितलेला नामजप अधिक करायचा.’’

६. सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेच्‍या बहिणीची हाडे जुळून येण्‍यासाठी सांगितलेले नामजपादी उपाय तिने केल्‍यावर तिची हाडे उतारवयातही लवकर जुळून येणे आणि याचे अस्‍थिरोग तज्ञांना आश्‍चर्य वाटणे  

२०.८.२०२३ या दिवसानंतर तिच्‍या दोन्‍ही हातांची क्ष-किरण तपासणी केल्‍यावर ‘तिच्‍या हाताची हाडे जुळली आहेत’, असे आढळले. ज्‍या हाताच्‍या हाडाचे २ तुकडे होण्‍याच्‍या स्‍थितीत होते, ते हाड अधिक प्रमाणात जुळले होते. अस्‍थिरोग तज्ञांना हे पाहून पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार रुग्‍णाच्‍या अशा शारीरिक स्‍थितीत आणि या वयात इतक्‍या लवकर हाडे जुळणे अवघड अन् अशक्‍य असते.

७. तेव्‍हा मला वाटले, ‘आले देवाजीच्‍या मना, तेथे कुणाचे चालेना !’ ‘एखाद्या व्‍याधीसाठी स्‍थुलातून औषधे घेणे हा उपाय आहेच; मात्र बहिणीच्‍या संदर्भात सद़्‍गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेल्‍या नामजपाची मात्रा अधिक प्रमाणात लागू पडली. ‘स्‍थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्‍ठ’ याची या वेळी मला प्रचीती आली.

८. कृतज्ञता  

सद़्‍गुरु गाडगीळकाका साधकांसाठी अचूक नामजपादी उपाय सांगतात. त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता ! सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या कृपेने मी हे लिहू शकले, याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती रजनी नगरकर (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.८.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक