कॅलिफोर्निया येथील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार ‘सूर्यनमस्कार’ हा जगातील सर्वाधिक प्रभावी शारीरिक व्यायामांपैकी एक मानला जातो. झुंबा (पाश्चात्त्य नृत्यसदृश व्यायामप्रकार), एरोबिक्स (शरिरातील प्राणवायूचे प्रमाण वाढवण्यासाठी केला जाणारा व्यायामप्रकार) आणि डान्स (नृत्य) यांसारख्या अन्य क्रियांच्या तुलनेत सूर्यनमस्कार शरिराला अधिक शक्तीशाली आणि सक्रीय बनवतो. अभ्यासानुसार प्रतिदिन गवतावर १२ वेळा सूर्यनमस्कार घातले, तर शरिरातील ऊर्जा पातळी लक्षणीयरित्या सुधारते. ही ऊर्जा दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. सूर्यनमस्कार केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही, तर मानसिक शांती, आत्मविश्वास आणि एकाग्रता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. या प्राचीन योगक्रियेचा उगम अध्यात्म, विज्ञान आणि आरोग्य यांचा संगम साधणार्या भारतात झाला आहे, हे विशेष आहे. भारतियांना सूर्यनमस्काराच्या रूपात अद्वितीय देणगीच लाभलेली आहे. त्यांनी ती चिरंतन जपायला हवी.
सूर्यनमस्कार प्रभावशाली !
ऋषिमुनींनी निसर्ग, शरीर आणि ब्रह्मांड यांचा अभ्यास करत मानवी आरोग्य अन् आध्यात्मिक उन्नती यांसाठी विविध पद्धती शोधल्या. त्यामधीलच एक पद्धत म्हणजे सूर्यनमस्कार ! ज्यामध्ये सूर्याला जीवनाचा मूळ ऊर्जास्रोत मानून त्याची उपासना केली जाते. ‘आदित्यहृदयम्’ यांसारख्या प्राचीन स्तोत्रांमध्ये सूर्याच्या महतीचे वर्णन केले आहे. आधुनिक विज्ञानही सूर्यनमस्काराच्या प्रभावशीलतेची नोंद घेत आहे. शरिरासाठी हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. योगाच्या या क्रियेमुळे मानसिक स्वास्थ्य, ताणमुक्ती, आणि दीर्घायुष्य लाभते, हे विविध संशोधनांतून सिद्ध झाले आहे. जिथे विज्ञान तंत्रज्ञान अल्प पडते, तिथे पारंपरिक आयुर्वेद, योगाभ्यास उपयोगी पडतात. जी आजारपणे दूर करण्यात विज्ञान, तंत्रज्ञान, आधुनिक वैद्य अयशस्वी ठरतात, तिथे योगशास्त्राने रुग्ण बरे झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. व्यायाम किंवा आसने करण्यापूर्वी शरिरात उत्साह निर्माण होण्यासाठी सूर्यनमस्कार हे एक उत्तम माध्यम आहे. योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत देणगी असून कित्येक विदेशी लोक त्याकडे आकर्षित होत आहेत.
सूर्यनमस्कार आता केवळ भारतीय संस्कृतीपुरता मर्यादित राहिला नसून आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. सूर्यनमस्कार आज जगभरातील आरोग्यप्रेमी लोकांच्या जीवनशैलीचा भागच बनला आहे. अमेरिका, कॅनडा, युरोपियन देश, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील प्रगत देश येथे त्याचे मोठे आकर्षण दिसून येते. सूर्यनमस्कारासारख्या प्राचीन भारतीय योगप्रक्रियेविषयी जागरूकता निर्माण केल्यास लोकांना आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैलीचा मार्ग गवसेल, हे निश्चित !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे