Mahakumbh 2025 PM Modi Visits : महाकुंभपर्वाची आध्यात्मिक आणि सामूहिक शक्ती भारताला विकसित राष्ट्र बनवेल ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी 

  • प्रयागराज येथील महाकुंभपर्वाच्या सिद्धतेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पहाणी

  • महाकुंभस्थळी झाले कलश पूजन !

महाकुंभपर्वाची आध्यात्मिक आणि सामूहिक शक्ती भारताला विकसित राष्ट्र बनवेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रयागराज, १३ डिसेंबर (वार्ता.) : येथील पवित्र महाकुंभपर्वात नवीन इतिहास रचला जाईल. या महाकुंभपर्वात कोट्यवधी भाविक सहभागी होणार आहेत. एकतेच्या या महाकुंभपर्वरूपी महायज्ञाची चर्चा जगभर केली जाईल. महाकुंभपर्वाची आध्यात्मिक आणि सामूहिक शक्ती भारताला विकसित राष्ट्र बनवेल, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. प्रयागराज येथील महाकुंभपर्वानिमित्त आयोजित कलश पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पंतप्रधानांनी या महापर्वाच्या सिद्धतेची पहाणीही केली. या वेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री, महापौर, तसेच अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले,

‘‘त्रिवेणीसंगम वरील हे पवित्रपर्व, म्हणजे  मनुष्याच्या अंतरचेतनेची जागृती असून हेच चैतन्य प्रत्येक भाविकाला या पवित्र अध्यात्मिक क्षेत्रात ओढून आणते. वेदांमध्ये ज्याची महती सांगितली गेली आहे आणि भारद्वाज ऋषींच्या साधनेने सिद्ध झालेले क्षेत्र म्हणजेच प्रयागराज. धर्म, ज्ञान, भक्ती आणि कला यांचा संगम महाकुंभपर्वात दिसतो.’’

या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते गंगापूजन आणि कलश पूजन, साधू संतांच्या भेटी, सरस्वती कूप दर्शन, बडे हनुमानजी मंदिरात पूजन, तसेच अक्षयवट पूजनही करण्यात आले.