सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच आंदोलनास अनुमती !
मुंबई – राज्यशासनाने आझाद मैदानातील मोर्चे, धरणे, आंदोलने आदींविषयी अंतिम नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार एकावेळी एकाच दिवसाच्या आंदोलनाला आणि तेही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच अनुमती मिळणार आहे. ही नियमावली एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहे.
अशी आहे नियमावली !
१. रस्त्यांवर मोर्चा काढून वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण करत आझाद मैदानाकडे जाणे आणि आझाद मैदानातून अन्यत्र मोर्चा काढणे, याला प्रतिबंध असेल.
२. आंदोलन वा सभेचे आयोजन करणार्या आयोजकाला कमाल ५ सहस्र लोकांचा जमाव जमवण्याची अनुमती असेल.
३. आझाद मैदानातील निर्धारित क्षेत्रात आयोजनाच्या संपूर्ण काळात आयोजकाला उपस्थित रहाणे बंधनकारक असेल.
४. कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाले किंवा अनुमती देणार्या सक्षम अधिकार्याच्या निर्देशांचे पालन केले नाही, तर आयोजकाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
५. आंदोलनात सहभागी होणार्यांना कमाल दोन फुटांच्या काठीला लावलेले ९ बाय ६ फुटांचे झेंडे, फलक समवेत आणण्याची अनुमती असेल.
६. सभांमध्ये प्रक्षोभक, चिथावणी देणारी भाषणे आणि विविध समाज, गट यांच्या भावना दुखावणारी अन् सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवणारी भाषा यांच्या वापरास प्रतिबंध असेल.
७. आंदोलनात सहभागींना काठ्या, तलवार, अग्निशस्त्र, ज्वालाग्रही पदार्थ आणण्यास प्रतिबंध आहे.
८. ट्रॅक्टर, बैलगाड्या, सायकल रिक्शा, हातगाड्या, अवजड वाहने आणण्यास बंदी आहे.