‘१५.९.२०२४ या दिवशी सनातनचे सर्व आश्रम आणि सेवाकेंद्रे येथे सायंकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे । ’ हा नामजप सामूहिकरित्या करण्यात आला. त्या वेळी प्रथम सौ. मेघा गोडसे या साधिका नामजप सांगत होत्या आणि त्यानंतर आश्रमातील सर्व साधक तो नामजप म्हणत होते. नामजप करतांना साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
अ. ‘सौ. मेघाताई ध्वनीक्षेपकावर नामजप सांगत असतांना ‘वैकुंठलोकातून कुणीतरी हा नामजप सांगत आहे’, असे मला जाणवले.
आ. हा नामजप करतांना ‘माझी प्रत्येक पेशी नामजप करत चैतन्य ग्रहण करत आहे आणि ते मला अनुभवता येत आहेे’, असे मला जाणवत होते.
इ. संपूर्ण देवद आश्रम भक्तीरसात पूर्णतः न्हाऊन निघाला होता. माझ्या अंतरातील भगवंताप्रतीची भक्ती प्रत्येक क्षणी वाढत होती. ‘या भक्तीरसामुळे मला माझे स्थूल आणि सूक्ष्म देह पवित्र झाले आहेत’, असे वाटत होते.
ई. या वेळी मला ध्यान लागल्यासारखे वाटत होते. मला ‘तो नामजप अखंड अनुभवत रहावा’, असे वाटत होते.
उ. ‘हा नामजप कधीच थांबू नये. माझे देवाशी सतत अनुसंधान रहावे’, असे मला वाटत होते. हा नामजप अर्धा घंटा चालू होता; पण ‘अर्धा घंटा कधी संपला’, हे माझ्या लक्षातही आले नाही.
ऊ. नामजपानंतर मला अतिशय शांत आणि स्थिर वाटत होते. ‘माझे देवाशी अनुसंधान वाढले आहे आणि माझ्या अंतर्मुखतेत वृद्धी होत आहे’, असे मी अनुभवत होते.
परात्पर गुरुदेवांनी या क्षुद्र जिवाला ही दिव्य अनुभूती दिली, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त करते.’
२. सौ. शुभांगी पात्रीकर (वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.
२ अ. गुरुदेवांचे मनमोहक रूप पाहून नामजप आनंदाने होणे : ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।’ हा नामजप करतांना मला डोळ्यांसमोर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आलटून पालटून राम आणि कृष्ण यांच्या वेशभूषेत दिसत होते. त्यांच्या मुखावर हास्य होते. त्यांचे मनमोहक रूप पाहून माझा जप अंतर्मनातून होत होता. मला नामजप करतांना आनंद जाणवत होता. गुरुदेवांनीच माझ्याकडून नामजप करून घेतला. ही अनुभूती दिल्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
३. श्री. राजेश पाटील, उरण, रायगड.
अ. ‘मी काही काळासाठी देवद आश्रमात सेवेसाठी गेलो होतो. १५.९.२०२४ या दिवशी तेथे सामूहिक नामजप करतांना माझ्या डोळ्यांतून अर्धा घंटा भावाश्रू येत होते.
आ. समोरील पटलावर मला श्रीराम आणि श्रीकृष्ण भव्य रूपात दिसत होते.
इ. मी मानसरित्या श्रीकृष्णाच्या चरणांना घट्ट मिठी मारून नामजप करत होतो. ‘मला नामजपच करत रहावा’, असे वाटत होते आणि आनंद जाणवत होता.’
(सर्व सूत्रांसाठी दिनांक १५.९.२०२४)
|