विश्वदेवांकडे ‘पसायदान (कृपा) मागणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् ‘अवघे जगत् आनंदी व्हावे’, यासाठी विश्वकल्याणकारी कार्य करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

काल २८ नोव्हेंबर या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा ‘संजीवन समाधीदिन’ झाला. त्या निमित्ताने…

समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर !

‘भगवान श्रीकृष्णाने ‘सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नाश आणि धर्मसंस्थापना’ यांसाठी अवतार घेतला. त्याने मानवाच्या कल्याणासाठी ‘श्रीमद्भगवद्गीता’ सांगून सर्वांना जीवनाचा मार्ग दाखवला. याच भगवद्गीतेच्या एकूण १८ अध्यायांमधील ७०० श्लोकांवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथातून ९ सहस्र ओव्यांचे भाष्य केले. संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण समाजाला भक्तीचे वळण लावले आणि समाजामधील सत्प्रवृत्तींचे पोषण केले. त्यांनी विश्वकल्याणासाठी विश्वदेवांकडे ‘पसायदाना’च्या माध्यमातून प्रार्थना केली. पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या विवेचनाला आलेले अमृतफळ आहे. 

संत ज्ञानेश्वर यांच्याप्रमाणे सांप्रत काळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला. ते अनेक ग्रंथांची निर्मिती करत आहेत आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी विश्वकल्याणकारी कार्यही करत आहेत. पसायदानातील काही ओव्यांतून माझ्या अल्पमतीला जाणवलेले ‘संत ज्ञानेश्वर आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य’ यांविषयीचे विवेचनरूपी कृतज्ञतापुष्प श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

२८ नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘भगवंताकडील मागणे, समाजातील दुष्ट प्रवृत्ती नष्ट होऊन जीवमात्रांचे परस्परांवरील प्रेम वाढावे आणि साधना करणार्‍या मनुष्याच्या सर्व इच्छा ईश्वरच पूर्ण करील’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.         

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/858318.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

४. पृथ्वीवर ईश्वरनिष्ठांचा समुदाय वाढो !

पू. शिवाजी वटकर

वर्षत सकळमंगळीं । ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९७

अर्थ : ईश्वरनिष्ठांचा समुदाय संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करत या भूतलावर निरंतर प्राण्यांना भेटो !

४ अ. ‘भूतलावर ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वाढावी’, अशी संत ज्ञानेश्वर यांना तळमळ असणे : संपूर्ण जगावर मांगल्याचा वर्षाव करणारे आणि जगाचे कल्याण करणारे ईश्वरनिष्ठ यांची दाटीवाटी पुष्कळ अन् अखंडपणे निर्माण होवो. लोकांना असे ईश्वरनिष्ठांचे मेळावे सर्वत्र भेटावेत; कारण सगळीकडे ‘नश्वरनिष्ठ’ (सत्ता, संपत्ती आणि शस्त्र अशा नश्वर गोष्टींवर निष्ठा ठेवणारे) दिसत आहेत.

४ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सहस्रो साधकांकडून साधना करून घेऊन ‘संतांची मांदियाळी’(समुदाय) निर्माण करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ‘अध्यात्म आणि साधना’ यांविषयी मार्गदर्शन करत आहेत अन् सहस्रो साधकांकडून साधना करवून घेत आहेत. त्यामुळे आतापर्यंत (नोव्हेंबर २०२४ पर्यंत) १३१ साधकांनी संतपद गाठले असून १२६३ साधक संतपदाकडे वाटचाल करत आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी सर्वत्र ‘संतांची मांदियाळी’ निर्माण केली आहे. ते संतांच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे अवतारी कार्य स्थूल अन् सूक्ष्म या स्तरांवर करून घेत आहेत.

५. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी झाल्यावर कल्पवृक्षांची चालती बोलती उद्याने निर्माण होतील !

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९८

अर्थ : (ईश्वरनिष्ठ व्यक्ती म्हणजे) चालणार्‍या कल्पतरूंचे बगीचे, सजीव चिंतामणीचे गाव आणि अमृताचे बोलणारे सागर आहेत.

५ अ. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी झाली की, काय होईल, याचे वर्णन करणारी संत ज्ञानेश्वरमाऊली ! : ईश्वरनिष्ठ लोक हे कल्पवृक्षच असतात. ते अनेक कल्पवृक्षांचे चालते बोलते उद्यानच असतात, तसेच ‘चिंतामणी’ नावाच्या गावातील प्रत्येक मनुष्य चिंतामणी रत्नासारखा (म्हणजे मनुष्याच्या चिंतांचे हरण करणारा) असतो. अशा मनुष्यांच्या मुखातून अमृतबोल निघतात.

५ आ. सनातनचे आश्रम आणि सेवाकेंद्रे उभारून जणू कल्पवृक्षांची चालती बोलती उद्याने तयार करणारी गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर) ! : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ठिकठिकाणी सनातन संस्थेची सेवाकेंद्रे आणि आश्रम निर्माण केले आहेत. या ठिकाणी साधक साधना आणि पूर्णवेळ सेवा करून मोक्षप्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत. ही ठिकाणे, म्हणजे हिंदु राष्ट्राची प्रतिकृतीच आहेत. ही स्थाने ईश्वरनिष्ठ साधकांसाठी कल्पवृक्षांची चालती बोलती उद्याने आहेत. ती मनुष्यप्राण्यांची चिंता हरण करून केवळ आनंद देणारी गावे आहेत.

अशा रितीने विश्वकल्याणकारी आणि अवतारी कार्य करणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले या दोन्ही गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७७ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.१२.२०२३)

संत ज्ञानदेवांना अपेक्षित अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी निर्माण होण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान द्या !’

सौ. सुजाता कुलकर्णी

‘७०० वर्षांपूर्वी जनकल्याणाच्या कळकळीने संत ज्ञानेश्वर यांनी भगवंताकडे ‘पसायदाना’(कृपे)चे मागणे केले आणि सद्यःस्थितीत भगवंत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या रूपात अवतार घेऊन धर्मग्लानी दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. रज-तमाची परमावधी झाल्याने भौतिक गोष्टींनाच अंतिम सुख मानणार्‍या, खर्‍या धर्मापासून दूर गेलेल्या आणि मनुष्यजन्माचे उद्दिष्टच ज्ञात नसलेल्या अज्ञानी लोकांमध्ये अध्यात्म अन् धर्म यांचा प्रसार करणे, त्यांच्यात अध्यात्माची आवड आणि मुमुक्षत्व निर्माण करणे, हे किती अवघड शिवधनुष्य आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसारख्या अवतारी गुरूंनी हे शिवधनुष्य किती लीलया पेलले आहे. अध्यात्म जगतात नवनवीन संशोधन करून बुद्धीवादी मनुष्याची श्रद्धा अध्यात्म आणि धर्म यांवर बसावी, यांसाठी ते अलौकिक कार्य करत आहेत अन् संपूर्ण जगाला खरे अध्यात्म अन् खरा धर्म समजावून सांगत आहेत. एवढेच नव्हे, तर ते अंगीकारल्याने ‘आनंदाची कशी प्राप्ती होते’, हे अनुभूतींच्या माध्यमांतून सिद्ध करून दाखवत आहेत. त्यांच्या धर्मजागृती कार्यामुळे हळूहळू धर्मग्लानी दूर होऊ लागली असून धर्मसूर्य उदयाला येत आहे.

जनहो, संत ज्ञानदेव यांना अपेक्षित अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सर्वत्र निर्माण होण्यासाठी साधनेला आजच आरंभ करा आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या संकल्पित हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात स्वतःचे योगदान द्या !’ (१९.११.२०२४)

– सौ. सुजाता मधुसूदन कुलकर्णी, फोंडा, गोवा.