‘सौ. सीमंतीनी बोर्डे या ‘संगीत’ हा विषय घेऊन ‘एम्.ए.’ झाल्या आहेत, तसेच त्या ‘संगीतगुरु’ही (‘संगीत अलंकार’) आहेत. ३५ वर्षांपासून त्या शास्त्रीय गायनाचे वर्ग घेत आहेत. त्यांच्या संगीत वर्गात विद्यार्थ्यांना विविध राग शिकवतांना त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत, तसेच सौ. सीमंतीनी बोर्डे राग ‘हरिकंस’ शिकत असतांना त्यांना झालेले त्रास अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले त्यावरील आध्यात्मिक विश्लेषण हेही पुढे दिले आहे.
१. राग ‘दुर्गा’ गातांना आलेली अनुभूती
१ अ. थंडीच्या दिवसात गायनाच्या वर्गात राग ‘दुर्गा’ शिकवतांना थंडी वाजणे बंद होऊन ‘दुर्गा’ गातांना उष्णता जाणवू लागणे : ‘वर्ष २०२३ मध्ये कडाक्याची थंडी चालू असतांना अनुमाने रात्री ८ वाजता मी गायनाचा ‘ऑनलाईन’ वर्ग घेत होते. या वर्गात मी राग ‘दुर्गा’ शिकवत होते. घरात भ्रमणभाषला ‘रेंज’ नसल्याने मी आमच्या आगाशीत बसून वर्ग घेत होते. थंडीचे दिवस होते. त्यामुळे ‘गॅलरी’तील खिडकीच्या काचा मी पूर्ण बंद केल्या होत्या. मी ‘स्वेटर’ आणि कानटोपी घालून वर्गाला प्रारंभ केला. मी ‘दुर्गा’ रागाच्या स्वरविस्तार (टीप १) गायनाला प्रारंभ केला आणि माझ्या लक्षात आले की, ‘आता मला थंडी वाजणे बंद झाले आहे.’
गायन जसजसे पुढे जाऊ लागले, तसतशी मला हवेत उष्णता जाणवू लागली. त्यामुळे मी कानटोपी आणि अंगातील स्वेटर काढून टाकला. एवढे करूनही माझी उष्णता न्यून होईना. तेव्हा भर थंडीमध्ये मी ‘गॅलरी’च्या काचा उघडल्या. जितके दिवस ‘दुर्गा’ रागाचे गायन चालू होते, तितके दिवस मला हाच अनुभव येत होता. रागाचे गायन चालू करण्यापूर्वी मी श्री दुर्गामातेच्या चरणी प्रार्थना करत असे आणि ‘ही स्वरसुमने तिच्या चरणी अर्पण करत आहे’, या भावाने गायन करत असे.
टीप १ – स्वरविस्तार : रागातील स्वरांच्या वेगवेगळ्या रचना तिन्ही सप्तकांतून क्रमाक्रमाने करून रागाचे स्वरूप स्पष्ट करणे
१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी अनुभूतीचे केलेले विश्लेषण : वरील अनुभूतीविषयी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘राग ‘दुर्गा’ हा शक्तीच्या स्पंदनांशी संबंधित असल्याने त्या शक्तीमुळे साधिकेला उष्णता जाणवली, म्हणजेच त्यांनी शक्तीतत्त्वाची अनुभूती घेतली.’’
२. राग ‘जोग’ गातांना साधिकेला आलेल्या अनुभूती
२ अ. ‘जोग’ या रागातील स्वररचना (स्वरसंगती) गातांना ‘त्या जीवनातील आशा-निराशेच्या खेळाशी अचूक जुळतात’, असे अनुभवता येणे : राग ‘जोग’ गातांना त्या रागातील ‘शुद्ध आणि कोमल’ अशा दोन्ही गंधाराच्या जागा (स्वर स्थाने) आळवतांना जीवनातील आशा-निराशेच्या खेळाशी या स्वरसंगती अचूक जुळतात’, असे माझ्या लक्षात आले, उदा. ‘नि सा ग ऽ’ हे स्वर आळवल्यानंतर मला जाणवले, ‘मी भगवंताला आत्मनिवेदन करत आहे, ‘देवा, माझ्याकडून आतापर्यंत अनंत चुका झाल्या आहेत.’ ‘प म प ग म सा ग सा’ अशी स्वरसंगती गातांना मला वाटते, ‘भगवंत जणू मला सांगत आहे, ‘तू निराश होऊ नकोस. पुन्हा नव्या जोमाने साधनेचे प्रयत्न कर. मी तुला अजून एक संधी देत आहे. आयुष्यात चढ-उतार असणारच आहेत.’
२ आ. राग ‘जोग’ गातांना भावाश्रू येऊन मन निर्विचार होणे : एकदा भावस्थितीत राहून मी राग ‘जोग’ आळवत होते. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन काही सेकंद मला आज्ञाचक्रावर चांगली स्पंदने जाणवली आणि माझे मन निर्विचार झाले.
३. राग ‘भूप (भूपाली)’ शिकवत असतांना आलेली अनुभूती
३ अ. राग ‘भूप’ शिकवत असतांना खिडकीतून गरम झळा येत असणे; परंतु ‘भूप’ रागाचे गायन चालू केल्यावर ‘उष्णता न्यून झाली’, असे जाणवणे : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राच्या सभागृहात एका सकाळी ९ ते १० या वेळेत मी ‘भूप’ राग शिकवत होते. त्या वेळी सभागृहाच्या खिडक्यांमधून गरम झळा येत होत्या. ‘भूप’ रागाची स्वरमालिका (रागातील स्वरविस्तार) गाण्यास प्रारंभ झाल्यावर ‘वातावरणातील उष्णता न्यून झाली आहे’, असे मला जाणवले. स्वरमालिका संपवून या रागाची बंदीश (टीप २) शिकवणे चालू केल्यावर ‘मला प्रारंभी उष्णता जाणवत होती’, हेही मला विसरायला झाले. सकाळी १० वाजता गायनाचा वर्ग थांबल्यावर मला पुन्हा उष्णता जाणवू लागली.
टीप २ – बंदीश : शास्त्रीय गायनातील रागाचे स्वरूप स्पष्ट करणारे बोलगीत ! यालाच ‘छोटा ख्याल’, ‘बंदीश’ किंवा ‘चीज’ असेही म्हणतात. ही मध्य किंवा दृत लयीत गातात.
४. राग ‘हरिकंस’ गातांना जाणवणारा त्रास आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याकडून समजलेले त्याचे शास्त्र
४ अ. राग ‘हरिकंस’ शिकत असतांना त्यातील स्वरसंगतीचा त्रास होणे आणि ‘तो राग गायला नको’, असे वाटणे : मी राग ‘हरिकंस’ शिकत असतांना (रागाचे गायन करतांना) आरंभीपासूनच मला त्यातील स्वरसंगतीचा (रागातील स्वरविस्ताराचा) त्रास होत असे. ‘हा राग गायला नको’, असे वाटून मी शिकवणीच्या बाईंनाही सांगितले, ‘‘हा राग मला गावासा वाटत नाही. त्याच्या सुरावटीमुळे (स्वररचनेमुळे) मला तो म्हणतांना त्रासदायक वाटते.’’ त्यामुळे शिकवणार्या बाईंनी मला तो राग शिकवणे थांबवले.
४ आ. ‘हरिकंस’ राग गातांना त्रास का होतो ?’, याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले विश्लेषण : ‘हरिकंस’ रागाच्या गायनाच्या वेळी मला त्रास होतो’, हे मी सद्गुरु मुकुल गाडगीळ यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘या रागातून शक्तीची स्पंदने अधिक प्रमाणात प्रक्षेपित होतात. ही शक्तीची स्पंदने तुम्हाला पेलवत नाहीत; म्हणजेच ती सहन होत नाहीत. त्यामुळे हा राग गातांना तुम्हाला त्रास होतो आणि ‘तो गाऊ नये’, असे वाटते.
‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या कृपेनेच मला या अनुभूती आल्या’, याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. सीमंतीनी बोर्डे, संगीत एम्.ए, ‘संगीतगुरु’ (‘संगीत अलंकार’), नेवासा, अहिल्यानगर, महाराष्ट्र. (२१.११.२०२४)
‘संगीतातून साधना करून सूक्ष्मस्तरीय अनुभूती कशी घ्यावी ?’, याचे मार्गदर्शन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय !
‘भारतीय संगीत हे केवळ स्थूल गाण्याचे माध्यम नसून त्यात ‘संगीतातील स्वर अनुभवणे’, हेही महत्त्वाचे आहे. सौ. सीमंतीनी बोर्डे यांनी केलेल्या अभ्यासावरून ‘संगीतातील विविध रागांचा कशा प्रकारे अभ्यास करून त्यांचा अनुभव घ्यायचा’, हे लक्षात येते. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे संगीतातील सूक्ष्मस्तरीय अध्यात्मशास्त्राचीही उकल होते.
अशा प्रकारे ‘संगीतातून साधना करून सूक्ष्मस्तरीय अनुभूती घेता येते’, याविषयीचे मार्गदर्शन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय करते, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४७ वर्षे), संगीत अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.) (२१.११.२०२४)
|