वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून चालू होणारे ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ भारतासाठी कसे राहील ?

‘वर्ष २०२५ च्या गुढीपाडव्यापासून, म्हणजे ३०.३.२०२५ या दिवसापासून ‘शालिवाहन शक १९४७ – ‘विश्वावसु’नाम संवत्सर’ चालू होत आहे. ‘विश्वावसु’चा अर्थ ‘सर्वांसाठी लाभदायी’ असा आहे. ‘हे संवत्सर भारतासाठी कसे राहील ?’, याचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन पुढे दिले आहे.

१. शनि आणि राहू यांच्या युतीमुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणे

२९ मार्च २०२५ या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होईल. (हे ग्रहण भारतात दिसणार नाही.) त्या वेळी शनि आणि राहू यांची युती असेल. ही युती मे २०२५ च्या अखरेपर्यंत असेल. या युतीमुळे लोकांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होईल. या काळात रोगराई वाढण्याची शक्यता राहील. समाजात अफवा आणि भ्रम वाढतील. भ्रष्टाचारांत वाढ होईल. व्यक्तीगत स्तरावर संकुचितपणा, स्वार्थ, तणाव, चिंता, भौतिकवाद इत्यादी तामसिक घटक वाढतील.

२. गुरु आणि शनि यांच्या केंद्रयोगामुळे देशाची आर्थिक प्रगती मंदावणे

श्री. राज कर्वे

१४ मे २०२५ या दिवशी गुरु ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. तेव्हा गुरु आणि शनि यांचा केंद्रयोग (दोन ग्रह एकमेकांपासून ९० अंश दूर असणे) होईल. हा योग समाजाच्या मानसिकतेवर परिणाम करतो. परस्परविरोधी विचारसरणी असणार्‍या लोकांमध्ये वैचारिक संघर्ष होईल. आक्षेप-खंडण, आरोप-प्रत्यारोप आदींचे प्रमाण वाढेल. मे आणि जून २०२५ या काळात आर्थिक मंदीचे वातावरण राहील. मोठ्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होतील. नवीन कायदे संमत होण्यास अडथळे येतील.

३. रवि आणि गुरु यांच्या युतीमुळे सकारात्मकता वाढणे

जुलै २०२५ मध्ये रवि आणि गुरु यांची युती असेल. ही सकारात्मकता वाढवणारी युती आहे. धार्मिक क्षेत्रे, मंदिरे, आध्यात्मिक संस्था आदींना लाभ होईल. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतील. व्यक्तीगत स्तरावर या योगामुळे विचारशीलता, संयम, परोपकार आदी सकारात्मक घटकांमध्ये वाढ होईल.

४. पावसाचे एकंदर प्रमाण अल्प असणे

या वर्षी पाऊस उशिरा आरंभ होईल. जून मासात (महिन्यात) अल्प, जुलै मासात मध्यम, तर ऑगस्ट मासात अधिक पाऊस होईल. गुरु मिथुन या वायुतत्त्वाच्या राशीत असल्याने पावसाचे एकंदर प्रमाण अल्प असेल.

५. मंगळ आणि केतू यांच्या युतीमुळे नैसर्गिक आपत्तींची शक्यता असणे

जुलै २०२५ मध्ये मंगळ आणि केतू यांचीही युती असेल. हा नकारात्मक योग आहे. हा योग अग्नीप्रकोप, भूस्खलन, भूकंप इत्यादी नैसर्गिक आपत्ती दर्शवतो. देशाच्या साधनसंपत्तीची हानी होऊ शकते.

६. शनि आणि मंगळ यांच्या प्रतियोगामुळे दुर्घटनांचे प्रमाण वाढणे

ऑगस्ट २०२५ मध्ये शनि आणि मंगळ यांचा प्रतियोग (दोन ग्रह एकमेकांपासून १८० अंश दूर असणे) असेल. हा दाहक परिणाम करणारा योग आहे. पूर, वादळे, भूस्खलन, अपघात, दुर्घटना आदींचे प्रमाण वाढू शकते. शत्रूदेशांकडून घुसखोरी, आतंकवादी आक्रमणे इत्यादी घटना घडून सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो.

७. सप्टेंबर २०२५ मधील सूर्यग्रहणामुळे होणारे नकारात्मक परिणाम

१ सप्टेंबर २०२५ या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण असेल. (हे ग्रहण भारतात दिसणार नाही). या ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि चंद्र यांचा शनि ग्रहाशी प्रतियोग (दोन ग्रह एकमेकांपासून १८० अंश दूर असणे) असेल. हा काळ सत्ताधार्‍यांसाठी प्रतिकूल असेल. विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होईल. सत्तापरिवर्तनासाठी डावपेच खेळले जातील. लोकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढेल. व्यक्तीगत स्तरावर निरुत्साह वाढून कामांमध्ये अडथळे येतील.

८. गुरु आणि मंगळ यांच्यातील शुभयोगामुळे सकारात्मक परिणाम होणे

ऑक्टोबर २०२५ च्या उत्तरार्धात गुरु आणि मंगळ यांच्यात नवपंचमयोग (शुभयोग) होईल. या योगामुळे सप्टेंबर २०२५ मध्ये निर्माण झालेली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढेल. सत्ताधार्‍यांना बळ प्राप्त होईल. विकासकामांना गती येईल. धाडसाने नेतृत्व करणारे लोक पुढे येतील. देशहिताचे निर्णय घेतले जातील. परराष्ट्रीय संबंध सुधारतील. राष्ट्रभावना जागृत होईल. संघटन वाढेल. विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान आदींसाठी हा काळ चांगला राहील.

९. नोव्हेंबर २०२५ नंतर सरकार देशहित साधणारे मोठे आणि धाडसी निर्णय घेण्याची शक्यता असणे

नोव्हेंबर २०२५ च्या उत्तरार्धात आणि डिसेंबर २०२५ च्या पूर्वार्धात रवि, गुरु आणि शनि यांचा एकमेकांशी नवपंचमयोग (शुभयोग) असेल, तसेच रवि आणि मंगळ यांची युती असेल. ही पुष्कळ बलवान ग्रहस्थिती आहे. या काळात सरकार देशहित साधणारे माेठे आणि धाडसी निर्णय घेऊ शकते. याला देशप्रेमी नागरिकांचा पाठिंबा लाभेल. हा परिवर्तनाचा काळ असेल. देशविरोधी शक्तींचे बळ क्षीण होईल. सरकारचे परिस्थितीवर नियंत्रण राहील.

१०. शनि आणि मंगळ यांच्या केंद्रयोगामुळे देशविरोधी शक्तींचे बळ वाढणे

डिसेंबर २०२५ च्या उत्तरार्धात रवि आणि मंगळ यांची युती, तसेच शनि आणि मंगळ यांचा केंद्रयोग (अशुभयोग) असेल. हे योग सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही फळे दर्शवतात. या काळात देशविरोधी शक्तींचे बळ वाढेल. त्यांचा विरोध प्रखर होईल. हिंसक घटना घडतील. विरोधकांना चाप बसवण्यासाठी सरकारला कठोर पावले उचलावी लागतील. या काळात शत्रूदेशांकडून उपद्रव होईल. सीमेवर संघर्ष होईल.

११. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये सरकारला पुन्हा बळ मिळणे अन् भारताचे जागतिक स्तरावरील स्थान बळकट होणे

जानेवारी २०२६ मध्ये रवि आणि मंगळ यांच्या युतीचा गुरु ग्रहाशी प्रतियोग होईल. त्यामुळे डिसेंबर २०२५ मध्ये वाढलेली अस्थिरता या काळात न्यून होईल. सरकारला पुन्हा बळ मिळेल. सरकार परिस्थिती नियंत्रणात आणेल. लोकांचा अधिकाधिक पाठिंबा मिळेल. अनेक क्षेत्रांमध्ये भारताचा नावलौकिक होईल. भारताचे जागतिक स्तरावरील स्थान बळकट होईल. फेब्रुवारी २०२६ मध्येही साधारण हीच स्थिती राहील.

१२. मार्च २०२६ मध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी संघर्ष होणे

मार्च २०२६ मध्ये रवि, मंगळ आणि राहू यांची युती होईल, तसेच या ग्रहांचा गुरु ग्रहाशी नवपंचमयोग (शुभयोग) होईल. हा काळ सकारात्मक परिवर्तन होण्यासाठी संघर्ष दर्शवतो. सरकार त्याच्या निर्णयांवर ठाम राहील. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेळप्रसंगी सैन्यशक्तीचा उपयोग करावा लागेल. या काळात जगात काही देशांमध्ये युद्ध चालू होऊ शकते. मोठ्या आगी लागणे, अपघात होणे, उष्णता पुष्कळ वाढून जागतिक तापमान वाढणे इत्यादी परिणाम होतील.

सारांश

एप्रिल ते सप्टेंबर २०२५ हा ६ मासांचा काळ सामान्य राहील. त्यांतील पहिल्या ३ मासांत आर्थिक मंदीची शक्यता राहील. नंतरच्या ३ मासांत नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय स्थित्यंतरे यांची शक्यता असेल. या ६ मासांत देशात मोठे परिवर्तन होण्याची शक्यता दिसत नाही. ऑक्टोबर २०२५ ते मार्च २०२६ हा काळ मात्र परिवर्तन घडवणारा असेल. या काळात सरकारकडून मोठे आणि धाडसी निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. भारताचे इतर देशांशी असलेले राजनैतिक संबंध दृढ होतील, तसेच भारताचे जागतिक स्तरावरील स्थान बळकट होईल.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.३.२०२५)