‘एकदा गुरुकृपेने मला सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत राहून शिकण्याची संधी लाभली. मला सद्गुरु स्वातीताई यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करत आहे.
१. प्रवासातही सेवारत असणे
सद्गुरु स्वातीताई एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जातांना प्रवासातही ‘ऑनलाईन’ सत्संग घेतात. त्या प्रवासात भ्रमणध्वनी (कॉल्स) स्वीकारतात आणि आधी कुणी संपर्क केला असल्यास त्यांना उलट संपर्क करतात. त्यांना प्रवासात उसंत मिळाली असता त्या काही क्षण विश्रांती घेत असतांना त्यांना कुणी संपर्क केल्यास सहजतेने भ्रमणभाषवर त्या साधकाशी बोलतात.
२. ‘गुरुसेवा झोकून देऊन कशी करावी !’, याचा आदर्श साधकांसमोर ठेवणे
सद्गुरु ताईंना शारीरिक त्रास (सर्दी, कणकण इ.) होत असतांना आणि त्यांच्यावर वाईट शक्तींची आक्रमणे होत असतांनाही त्या सेवेत सवलत घेण्याचा थोडाही विचार करत नाहीत. त्या सहजतेने सेवा करतात. ‘सद्गुरु ताईंमध्ये किती क्षात्रभाव आहे !’, याची मला प्रचीती आली. ‘गुरुसेवा झोकून देऊन कशी करावी !’, याचा आदर्श सद्गुरु ताईंनी साधकांसमोर ठेवला आहे’, असे मला जाणवले.
३. प्रत्येक सेवा सहजतेने करणे
सद्गुरु ताई प्रत्येक सेवा सहजतेने करतात, उदा. आश्रमाच्या अन्नपूर्णाकक्षात जाऊन साधकांसाठी प्रेमाने एखादा खाद्यपदार्थ बनवणे, संगणकीय सेवा करणे, साधकांना सेवेत साहाय्य करणे इत्यादी.
४. साधकांना साधनेत प्रेमाने साहाय्य करणे
एकदा मी सद्गुरु ताईंना ‘माझ्या मनातील अडथळे, माझ्यातील स्वभावदोष आणि अहंचे पैलू अन् त्याचा साधनेवर होणारा परिणाम’ यांविषयी सांगितले. त्या वेळी सद्गुरु ताईंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला त्यांचा पुष्कळ आधार वाटला. नंतर मला ‘मनातील अडथळा दूर झाला’, असे जाणवले. मला माझ्या मनातील साधनाविषयक अन्य शंकांचेही निरसन करून घेता आले. गुरुदेवांच्या कृपेने मला सद्गुरूंचा सत्संग लाभल्याबद्दल माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला.
५. सद्गुरु स्वातीताई समष्टी सेवा, तसेच व्यष्टी सेवा यांच्याशी संबंधित निर्णय ‘ईश्वराच्या अनुसंधानात राहून आणि विश्वमन अन् विश्वबुद्धी यांतून विचार ग्रहण करून देतात’, असे मला जाणवले.
६. त्या साधकांशी सहजतेने वागतात.
मला अशा प्रेमळ आणि गुरुचरणी सर्वस्व अर्पण केलेल्या सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग लाभल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी (११.९.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |