चीनमधील साम्यवादी राजवटीची पंच्याहत्तरी !

१ ऑक्टोबर २०२४ या दिवशी चीनमधील साम्यवादी राजवटीने ७५ वर्षे पूर्ण केली. वर्ष १९४९ ते २०२४ असा चीनच्या प्रगतीचा आलेख हा कमालीचा थक्क करणारा आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये एखादे राष्ट्र इतकी प्रचंड आर्थिक प्रगती करते, हे उदाहरण अत्यंत उल्लेखनीय आहे. कोरोना महामारीनंतर चीनची जागतिक विश्वासार्हता न्यून झाली असली आणि आर्थिक विकासाचा वेगही मंदावला असला, तरी आजही चीन अमेरिकेला मागे टाकून पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहे अन् तशा सिद्धतेत आहे. चीनला हे यश सहज मिळालेले नाही. यासाठी चीनला प्रचंड कष्ट घ्यावे लागले आहेत. दीर्घकाळ वसाहतवादी गुलामगिरीत काढलेल्या एका गरीब आणि मागास देशाने आज जगातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्यापर्यंतची मजल गाठली आहे. आज अमेरिकेला सर्वांत मोठी भीती चीनची आहे. भविष्यात अमेरिका आणि चीन यांच्यातील एका नव्या शीतयुद्धाची शक्यता अभ्यासक वर्तवत आहेत. चीन-अमेरिका संघर्ष भविष्यातील जागतिक राजकारणाची दिशा ठरवणार आहे. याप्रसंगी चीनचा हा संघर्षाचा आणि आर्थिक प्रगतीचा ७५ वर्षांचा इतिहास समजून घेणे सयुक्तिक ठरणार आहे.

चीनमधील साम्यवाद

१९ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘चीनची सांस्कृतिक क्रांती आणि ‘आर्थिक महासत्ता’ बनण्याचा संकल्प, माओ कालखंड अन् सांस्कृतिक क्रांती, तसेच डेंग कालखंड म्हणजे आर्थिक उदारीकरणाचे वारे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/845916.html

४. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा कालखंड म्हणजे साम्यवादाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

माओंनी सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून ज्या पद्धतीची राजकीय व्यवस्था आणण्याचा प्रयत्न केला होता, त्याच स्वरूपाची राजकीय व्यवस्था चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडून आणण्याचा प्रयत्न होत आहे. माओंनी ज्याप्रमाणे साम्यवादाची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे शी जिनपिंग हे स्वतःचा व्यक्तीगत प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचा आणि साम्यवादाची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही चीनमध्ये विरोधी पक्षांना स्थान नाही. प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था मुक्त नाहीत. आजही चीनमध्ये लोकांना स्वतःची मते मुक्तपणाने मांडण्याचा अधिकार नाही. आजही चीनमध्ये अल्पसंख्यांकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात. शिनशियाँग, तिबेट यांसारख्या भागातील अल्पसंख्यांकांचे उठाव हिंसक मार्गाने दाबून टाकले जातात. आज चीनमध्ये साम्यवादी पक्षाखेरीज इतर कोणत्याही पक्षाला स्थान नाही. कोरोना महामारीच्या काळात चीनमधील लोकांनी जिनपिंग यांच्या हुकूमशाही राजवटीचे मोठे चटके सोसले.

५. आजच्या चीनच्या अंतर्गत प्रमुख समस्या

आज चीनमध्ये प्रामुख्याने २ अतिशय महत्त्वाच्या समस्या आहेत.

अ. पहिली समस्या भ्रष्टाचाराची आहे.

आ. दुसरी समस्या, म्हणजे सरकारविरुद्ध टीका करण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीविरुद्ध शी जिनपिंग यांनी अघोषित अंतर्गत युद्ध चालू केले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सहस्रो लोकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशांतर्गत कारभारावर टीका करणार्‍या परदेशात स्थायिक झालेल्या चिनी नागरिकांना संपवण्याचा प्रयत्न शी जिनपिंग यांच्याकडून होत आहे. आजही चीनमध्ये गूगल, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रसारमाध्यमांनाही शासनावर टीका करण्याची अनुमती नाही. चीनमधील साम्यवादी पक्षाने १०३ वर्षे पूर्ण केली आहेत. इतक्या वर्षांत हा पक्ष बळकट बनत चाललेला आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच जातांना दिसत आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

५ अ. चीनचे विस्तारवादी आक्रमक धोरण : मुळात चीनमध्ये झालेली सांस्कृतिक क्रांती ही परराष्ट्रांच्या प्रभावातून या देशाला मुक्त करण्यासाठी होती. आजघडीला शी जिनपिंग हे अमेरिकेच्या माध्यमातून होणार्‍या भांडवलशाही आणि भांडवलवादी तत्त्वांचे बीजारोपणाविषयी चिंताग्रस्त आहेत. आजही परकीय प्रभावापासून चीनला, तिथल्या नागरिकांना, साम्यवादी पक्षाला अलिप्त ठेवण्यासाठी तेथील राज्यकर्ते मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसत आहेत. याचाच अर्थ माओंचा उद्देश आज इतक्या वर्षांनंतरही साध्य होतांना दिसत आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या प्रक्रियेत चीनमध्ये सैन्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला दिसतो. यादृष्टीने माओंच्या ‘रेड आर्मी’ला पुष्कळ महत्त्व प्राप्त झाले होते. आजही चीनमध्ये ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ला पुष्कळ मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले जात आहे. या सैन्याच्या आधुनिकीकरणाचे प्रयत्न अत्यंत झपाट्याने चालू झालेले दिसून येतात, म्हणजेच माओच्या काळापासून सैन्याचे महत्त्व वाढवण्याचा चालू असलेला प्रयत्न आजही कायम असल्याचे दिसून येते.

मध्ययुगीन काळापासून चालत आलेली ‘झिरोसम गेम’(आपण जिंकण्यासाठी दुसर्‍या कुणीतरी हरणे आवश्यक आहे.) ही विचारसरणी चीनमध्ये आजही प्रभावी आहे. सांस्कृतिक क्रांतीच्या वेळी याच विचासरणीच्या आधारावर माओने विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला होता. या विचारसरणीनुसार प्रत्येक गोष्टीकडे यश आणि अपयश याच दृष्टीकोनातून पाहिले जाते. ही मानसिकता कायम असल्यामुळेच चीन आजही त्याचे विस्तारवादी धोरण आक्रमक पद्धतीनेच अवलंबत होता. दक्षिण पूर्व आशिया, उत्तर पूर्व आशियामधील चीनचा विस्तारवाद हेच दर्शवतो की, चीन आजही हरणे किंवा जिंकणे याच दृष्टीकोनातून जगाकडे पहात आहे. आर्थिक उदारीकरणामुळे चीनच्या सामाजिक व्यवस्थेवर त्याचा नक्कीच परिणाम झाला आहे; परंतु राजकीयदृष्ट्या विचार करता माओच्या काळातील चीन आजही कायम आहे.

६. चीनमधील परस्परविरोधी प्रवाह

आज चीनमध्ये एकाच वेळी २ प्रवाह दिसून येत आहेत. एकीकडे शी जिनपिंग साम्यवादाचा, स्वतःचा आणि लष्कराचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत, तर दुसरीकडे आर्थिक विकासामुळे इतर जगासमवेत वाढलेल्या संवादामुळे तिथे व्यक्तीस्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे एकीकडे साम्यवादाची बंदिस्त पकड आणि दुसरीकडे व्यक्तीस्वातंत्र्य यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न चीनमधील राजकीय नेतृत्वाला करावा लागत आहे. भविष्यात या सांस्कृतिक क्रांतीचा प्रभाव कसा असेल, हे पहातांना चीनमध्ये व्यक्तीस्वातंत्र्याचा विजय होतो कि साम्यवादाच्या पगड्याचा ? हे पहावे लागेल. पुढील एक दशकाच्या काळात चीनचे आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी कशा प्रकारे एकीकरण होते, हे पहावे लागेल.

७. चीन महासत्ता होण्यामध्ये असलेल्या प्रमुख समस्या

गेल्या ७५ वर्षांपासून चीनने स्वतःच्या विकासाच्या टप्प्यावर अनेक संघर्षांचा सामना केला आहे. भविष्यात चीनचे महासत्ता बनणे किंवा अमेरिकेची जागा घेणे, हे काही गोष्टींवर निर्भर आहे.

अ. यातील पहिले, म्हणजे आशिया खंडातील बहुतांश देशांमध्ये चीनच्या वाढत्या विस्तारवादाविषयी कमालीची साशंकता आणि असुरक्षितता आहे. शी जिनपिंग ती कशी दूर करतात ? हे पहावे लागेल.

आ. आज अनेक देशांशी चीनचे सीमावाद चालू आहेत. अनेक बेटांवरून चीनने वाद उकरून काढलेले आहेत. यासाठी लष्करी बळाचा वापर करण्याची भाषा चीन करत असतो; पण या गोष्टी सामोपचाराने कशा सोडवता येतील आणि त्यातून विश्वास संपादन कसा करता येईल, हे चीनने पहाणे आवश्यक आहे.

इ. चीनच्या अंतर्गत दुखण्यांमध्ये हाँगकाँगचा प्रश्न सध्या कमालीचा चिघळला आहे. हा प्रश्न चीन कशा प्रकारे हाताळतो, त्याचप्रमाणे शिनशियाँग प्रांतात अल्पसंख्यांक उघुर मुसलमानांचा प्रश्न चीन कशा प्रकारे सोडवतो, यावर बरेच काही अवलंबून आहे.

ई. याखेरीज चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ (आशिया, आफ्रिका आणि युरोप यांना चीनला जोडण्यासाठीचा प्रकल्प) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी कमालीची साशंकता आहे. या प्रकल्पामुळे काही राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा संकोच होत आहे, असे आक्षेप घेतले जात आहेत. त्यांचे निरसन चीनला करावे लागणार आहे.

एकंदरीतच सर्वांना विश्वासात घेऊन सामूहिक हित जपण्यासाठी चीन काही करतो का ? हे पहाणे अत्यंत आवश्यक आहे. चीनच्या पारंपरिक विचारसरणीमध्ये ‘झिरोसम गेम’ ही संकल्पना आहे. ही मानसिकता, त्याचप्रमाणे ‘प्रत्येक प्रश्न चिघळत ठेवून युद्धाच्या माध्यमातूनच तो सोडवायचा’, ही मानसिकता चीनला पूर्णपणाने पालटावी लागणार आहे. चीन अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचा, परिषदांचा सदस्य आहे. या व्यासपिठाच्या माध्यमातून चीनने चर्चेच्या आणि विश्वासाच्या माध्यमातून प्रश्न हाताळले, तर भविष्यात चीनला महासत्ता बनणे अवघड ठरणार नाही.

(समाप्त)

लेखक : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे. (१४.१०.२०२४)

संपादकीय भूमिका 

चीनमध्ये अल्पसंख्यांकांची आंदोलने हिंसक पद्धतीने दडपली जातात, तर भारतात अल्पसंख्यांकांचा उदो उदो होतो, हे लक्षात घ्या !