अगदी काही दिवसांपूर्वी लेबनॉन येथील ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेचे अनेक आतंकवादी त्यांच्या हातातील ‘पेजर’चा स्फोट होऊन मारले गेले, सहस्रो घायाळ झाले. काही क्षण कुणाला काय होत आहे ? ते लक्षातही येत नव्हते. एका मागोमाग एक स्फोट होत होते, पेजरनंतर क्रमाने वॉकीटॉकी, रेडिओ, सोलर उपकरणे यांचेही स्फोट झाले. यामुळे लेबनॉनमध्ये अतिशय गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेचे प्रमुख आणि अन्य आतंकवादी संघटनांचे प्रमुख यांना नेमके काय होत आहे ? ते कळण्यासही काही वेळ गेला. अतिशय दूरवरचा विचार करून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा उपयोग करून आतंकवाद्यांना मारण्यात आले. आक्रमणाचा हा एक नवीनच प्रकार जगाने अनुभवला. पेजरसह अन्य उपकरणांच्या माध्यमातून स्फोट कसे करण्यात आले, याचा ऊहापोह या लेखात करण्यात आला आहे.
१. इस्रायल विरुद्ध ‘हमास’ आणि ‘हिजबुल्ला’ यांनी पुकारलेले युद्ध
बरोबर १ वर्षापूर्वी ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर ‘हमास’ या आतंकवादी संघटनेने भ्याड आक्रमण केले आणि त्याच्या दुसर्याच दिवशी लेबनॉनच्या सीमेजवळील इस्रायलच्या भागात ‘हिजबुल्ला’ या आतंकवादी संघटनेने जोरदार आक्रमण केले. त्यामुळे इस्रायलला एकाच वेळी त्यांच्या उत्तर आणि दक्षिण भागात लढाई चालू करावी लागली. या प्राथमिक लढाईचे पहाता पहाता युद्धात रूपांतर झाले. इस्रायलकडून हमास आणि हिजबुल्ला यांच्या आतंकवाद्यांवर हवाई आक्रमणे करून त्यांना ठार करणे चालू झाले. यामध्ये गाझा पट्टीमध्ये प्रत्यक्ष सैनिकी कारवाई करून तो भूभाग इस्रायलच्या सैन्याने पादाक्रांतही केला. उत्तरेकडील लेबनॉनच्या भागातील हिजबुल्लाच्या कमांडर्सना इस्रायल क्षेपणास्त्रे सोडून ठार मारत होता.
२. ‘पेगॅसेस’ संगणकीय प्रणालीचा उपयोग
इस्रायलने विकसित केलेले ‘पेगॅसेस’ संगणकीय प्रणालीद्वारे तो आतंकवाद्यांचे भ्रमणभाष हॅक करत असे. त्याद्वारे त्यांचा ठावठिकाणा शोधून काढून त्यांची निश्चिती करत असे आणि त्यांच्या दिशेने ‘गाईडेड मिसाईल’ (मार्गदर्शित क्षेपणास्त्र) सोडून त्यांना नष्ट करत असे. हिजबुल्लाचे अनेक कमांडर्स आणि आतंकवादी यांना इस्रायलने अचूक मारले. अशा प्रकारे संघटनेच्या मुख्य लोकांचा मृत्यू भ्रमणभाषच्या वापरामुळे होत आहे, असे हसन नसरुल्ला या हिजबुल्लाच्या प्रमुखाला लक्षात आले. त्यामुळे त्यांनी भ्रमणभाषचा उपयोग टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरवले; मात्र आता संपर्कासाठी कशाचा उपयोग करायचा ? हा प्रश्न असल्याने त्यांनी वॉकीटॉकी, पेजर अशा कामचलाऊ उपकरणांचा उपयोग चालू केला आणि त्यांना तो लाभदायक होत आहे, असे लक्षात आले. हिजबुल्लाच्या या पालटत्या संपर्क व्यवस्थेचा अंदाज ‘मोसाद’ला (इस्रायलची गुप्तचर यंत्रणा) लक्षात आला. त्यामुळे इस्रायलने त्यावर पुढील लक्ष केंद्रीत केले.
३. भ्रमणभाषऐवजी पेजरचा वापर करण्याचे निश्चित !
भारतात भ्रमणभाषचा सार्वत्रिक वापर चालू होण्यापूर्वी अनेकांकडे पेजर असायचे. पेजर रेडिओ फ्रिक्वेन्सीवर काम करतात. त्यामुळे त्याच्यावर दोन्ही बाजूने संपर्क करू शकत नाही. केवळ एकाच बाजूने, म्हणजे त्यावर केवळ संदेश स्वीकारू शकतो. असे विविध पेजर एका विशिष्ट संदेश पाठवू शकणार्या यंत्रणेशी जोडल्यास एकाच वेळी एकाच ठिकाणाहून अनेक पेजर्सना संदेश पाठवू शकतो. त्यामुळे ही संपर्क यंत्रणा पूर्णपणे आत्मसात् करायची, असे ‘हिजबुल्ला’ने ठरवले आणि ते मोठ्या प्रमाणात पेजरचा पुरवठा करू शकणार्या आस्थापनाचा शोध घेऊ लागले. याचाही सुगावा इस्रायलला लागला आणि त्यांनी नवीन ऐतिहासिक गुप्त योजनेला प्रारंभ केला. याचे दायित्व इस्रायलची सैन्य गुप्तचर यंत्रणा ‘युनिट ८२००’ला देण्यात आले. इस्रायलमध्ये ‘मोसाद’, ‘शिन बेट’, ‘अमन’ अशा विविध गुप्तचर यंत्रणा कार्यरत आहेत. त्यातील सैन्य गुप्तचर यंत्रणेची शाखा, म्हणजे ‘युनिट ८२००’ ही आहे. या शाखेला हिजबुल्लाची कामगिरी सोपवण्यात आली होती.
४. इस्रायलकडून पेजरनिर्मिती आस्थापन स्थापन
आतंकवादी पेजर घेणार, म्हणजे ते शेकडो नाही, तर सहस्रो घेतील. त्यामुळे हिजबुल्ला नेमके कुणाकडून पेजर खरेदी करत आहे, यावर इस्रायलची गुप्तचर यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून होती. तिने स्वत:चे एक पेजर निर्मिती आस्थापन हंगेरी या देशात उभारलेही, जेणेकरून त्यांच्याकडून खरेदी होईल. हंगेरी या देशात उद्योग, व्यवसाय उभारणी अन्य देशांच्या तुलनेत थोडे सोपे आहे; कारण अत्यंत अल्प करआकारणी करणारा आणि उद्योगांसाठी चांगल्या पायाभूत सुविधा पुरवणारा देश म्हणून हंगेरी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी इस्रायलने त्यांचे एक आस्थापन चालू केले. जगात पेजरचे उत्पादन काही युरोपियन देश आणि तैवान यांच्याकडे केले जाते. युरोपियन देशात हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेवर बंदी आहे, परिणामी ते त्यांना काही विकत देणार नाही आणि हिजबुल्लाही घेणार नाही. त्यामुळे त्यांना एकमेव पर्याय उरला तो म्हणजे तैवान येथील आस्थापनाचा ! या आस्थापनाचे नाव ‘गोल्ड अपोलो’ आहे. या आस्थापनाकडून हिजबुल्लाने यापूर्वीही गुप्तपणे पेजर मिळवले होते.
याच आस्थापनाला हिजबुल्ला एकूण ५ सहस्र पेजरच्या मागणीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेची बोलणी करत आहे, हे समजले. हीच संधी ‘युनिट ८२००’ने साधली. त्यांनी ‘गोल्ड अपोलो’च्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला. ‘आम्ही पेजरनिर्मिती करू. केवळ तुमच्या आस्थापनाचा लोगोचा वापर करण्याची अनुमती द्यावी’, असे सांगितले. यातील प्रक्रियेत अन्यही मध्यस्थ, मध्यस्थ आस्थापने असू शकतात. त्यांच्या चाललेल्या बोलणीतून ‘गोल्ड अपोलो’ला त्यांनी करार करण्यास बाध्य केले आणि अखेर इस्रायलचे आस्थापन अन् ‘गोल्ड अपोलो’ यांच्यात करार झाला. थोडक्यात हिजबुल्ला पेजरच्या मागणीचे जे कंत्राट ‘गोल्ड अपोलो’ला मिळणार होते, ते इस्रायलच्या आस्थापनाला मिळाले; मात्र हिजबुल्लाला हे माहिती नव्हते की, त्यांनी ज्या आस्थापनाशी व्यवहार केला, ते इस्रायली आस्थापन आहे, तसेच तैवानच्या आस्थापनलाही काही कळले नाही. यामध्ये भारतीय मूळनिवासी असलेल्या एका व्यक्तीचा उल्लेख आला, ते म्हणजे रिन्सन होजे यांचा. ते मूळचे केरळ येथील; मात्र सध्या नॉर्वे येथे वास्तव्याला होते, त्यांच्या आस्थापनाकडे पेजरच्या निर्मितीसाठी १६ दशलक्ष युरो (चलन) इस्रायलला पुरवण्याचे दायित्व होते. वर्ष २०२४ च्या जानेवारी-फेब्रुवारी मासात ही प्रक्रिया चालू होती आणि पेजरनिर्मिती चालू झाली. तैवानला इस्रायलचे हंगेरीतील आस्थापन करारानुसार पैसे पाठवू लागले होते; मात्र तैवानच्या बँकांना मध्य-पूर्वेतील संशयास्पदरित्या हा पैसा येत आहे, असे लक्षात आले. आस्थापनाच्या प्रमुखांनाही अशा काही गोष्टी लक्षात आल्या होत्या; मात्र तोपर्यंत व्यवहार पूर्ण झाला होता.
५. पेजरमध्ये स्फोट घडवणे
इस्रायलनिर्मित या पेजरमध्ये असलेल्या २ बॅटर्यांच्या जागी एक बॅटरी आणि दुसर्या ठिकाणी स्फोटक वस्तू लावण्यात आली, असे तंत्रज्ञांचे मत आहे. याचा स्फोट घडवायचा होता. त्यासाठी योग्य दिवसाची इस्रायल वाट पहात होता. १५ सप्टेंबर २०२४ या दिवशी हिजबुल्लाला इस्रायलमधील एका भागात एक बाँब पेरला होता आणि त्याचा मोठा स्फोट घडवून आणायचा होता. याची चाहुल इस्रायलला लागली, त्यांनी बाँब निकामी केला आणि गत वर्षभरापूर्वीपासून काम करत असलेल्या योजनेला मूर्त रूप देण्याचे निश्चित केले. गतवर्षी लेबनॉन येथून झालेल्या आक्रमणांमुळे लेबनॉन-इस्रायलच्या सीमावर्ती भागातील इस्रायली नागरिक तेथून सुरक्षित भागांमध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांना पुन्हा सन्मानाने त्यांच्या घरात जाता येण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर दबाव वाढला होता. जेव्हा पेजर पुरवठ्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तेव्हा नेतान्याहू यांनी इस्रायलच्या जनतेला ती पुन्हा सन्मानाने त्यांच्या घरी जाऊ शकेल, असे आश्वासन दिले. त्यांनी १७ सप्टेंबरला लेबनॉन सीमेवर काही सैन्य कारवाई होण्याचे संकेतही दिले. त्यानंतर हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांनी घेतलेल्या पेजरला एक संदेश आला. तो संदेश काय आहे, हे या आतंकवाद्यांनी पहाण्यास पेजर घेतल्यावर त्यांचे एकाएकी स्फोट होऊ लागले. त्यात ४० आतंकवाद्यांचा तात्काळ मृत्यू झाला, तर सहस्रो या स्फोटामुळे घायाळ झाले. लेबनॉनमधील रुग्णालये घायाळांनी भरून गेली. जेथे जेथे म्हणजे अगदी मॉल, सार्वजनिक जागा येथे हे आतंकवादी होते, तेथे स्फोट झाले. काही आतंकवाद्यांची अंतिम यात्रा जमाव काढत होता, तेथे स्फोट झाला. त्याचप्रमाणे नंतर अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांमध्ये स्फोट होऊ लागले. हिजबुल्लाच काय जगासाठी हे आक्रमण नवीन होते. त्यानंतर टीव्ही, शीतकपाट, वातानुकूलित यंत्रे यांमध्येही स्फोट होईल कि काय ? अशी भीती नागरिकांना वाटू लागली. या आक्रमणाचे दायित्व अधिकृतरित्या इस्रायलने स्वीकारले नसले, तरी त्यांच्या संरक्षण मंत्र्याने सांगितले, ‘युद्धाची एक नवी खेळी चालू होणार आहे.’ यापूर्वीही इस्रायलने अतिशय धाडसी मोहिमा राबवल्या आहेत. त्यापैकी वर्ष २०२० मध्ये इराणच्या अणूशास्त्रज्ञाला इस्रायलने कृत्रिम बुद्धीमत्ता वापरणार्या यंत्रमानवाला सॅटेलाईटद्वारे नियंत्रित करून गोळ्या घालून ठार केले होते. हिजबुल्लावरील या आक्रमणानंतर इस्रायलने तिला सावरण्याची जराही संधी न देता तिचा प्रमुख नसरूल्ला याला तो भूमीत ६० फूट खाली बैठक घेत असतांना बंकरभेदी बाँबचा वर्षाव करून तेथेच ठार केले. आता इस्रायलवर इराणने क्षेपणास्त्रे सोडल्यामुळे आणि इस्रायल त्याचेही जोरदार प्रत्युत्तर देणार असल्यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. एकूणच यातून तिसरे जागतिक महायुद्ध भडकते कि काय ?, अशी भीती सर्वच देशांना भेडसावू लागली आहे.
श्री गुरुचरणार्पणमस्तु ।
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल. (३.१०.२०२४)
संपादकीय भूमिका‘जशास तसे’ आणि ‘शत्रूला त्याच्या घरात घुसून मारणे’, या इस्रायलच्या धोरणाचा अवलंब भारत त्याच्या शत्रूराष्ट्रांच्या विरोधात केव्हा करणार ? |