काँग्रेसरूपी शत्रूला कोसो मैल दूर ठेवा ! – पंतप्रधान

ठाणे येथील कार्यक्रमात भूमीपूजन आणि विविध विकासकामांचे लोकार्पण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

ठाणे – ‘मेट्रो ३’ प्रकल्पाचे ६० टक्के काम झाले असतांना आघाडी सरकारने अहंकारामुळे प्रकल्प अडीच वर्षे बंद पाडल्याने महाराष्ट्रातील करदात्या जनतेचे १४ सहस्र कोटी रुपये वाया गेले. मुंबईची लोकसंख्या वाढल्याने आर्थिक राजधानीची गती थांबण्याची शक्यता होती. त्यामुळे आता मुंबईत ३०० कि.मी.चे मेट्रो नेटवर्क निर्माण केले आहे. जपानच्या जायका आस्थापनासमवेत होत असलेली ही मेट्रो भारत-जपान मैत्रीचेही प्रतीक आहे. काँग्रेसने अटलसेतू, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, इतकेच काय तर दुष्काळी परिसरातील पाणी प्रकल्पांनाही विरोध करून ते प्रकल्प थांबवले. काँग्रेसचे सरकार आल्यावर ते शिंदे सरकारने आणलेल्या सर्व योजना रहित करतील. त्यांना महिलांच्या नव्हे, तर दलालांच्या हातात पैसा द्यायचा आहे. आता तुम्हाला त्यांना थांबवायचे आहे. त्यामुळे काँग्रेसरूपी शत्रूला सत्तेपासून आता कोसो मैल दूर ठेवा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाणे येथे केले. ‘मेट्रो ३’च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महायुतीने केलेल्या कामांची सूची सांगत काँग्रेससह महाआघाडीतील पक्षांना त्यांनी लक्ष्य केले.

३० सहस्र कोटींहून अधिक रुपयांची विकासकामे मुंबई आणि ठाणे परिसरात होत आहेत. कोस्टल रोड, अटल सेतू, भूमीगत बोगदे, वर्साेवा वांद्रे प्रकल्प, ठाणे-बोरिवली प्रकल्प अशा किती तरी प्रकल्पांमुळे मुंबई आणि ठाणे यांचा चेहरा पालटेल, त्यांची आधुनिक ओळख निर्माण होईल. मुंबई आणि उपनगरांतील अडचणी अल्प होतील, रोजगाराच्या संधी निर्माण होतील, उद्योग वाढतील, असे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

या कार्यक्रमानंतर बीकेसी स्थानकावरून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून पंतप्रधानांनी सांताक्रूझपर्यंत आणि परत तसाच उलटा प्रवास विद्यार्थ्यांसमवेत केला.


मोदी यांची अन्य काही सूत्रे !

  • मराठी भाषेने ज्ञान, दर्शन, अध्यात्म आणि साहित्य यांची समृद्ध संस्कृती दिली !
  • इतिहासातून धडा घेऊन एकतेला देशाची ढाल बनवले पाहिजे !
  • भाजपने आधुनिक आणि सामाजिक ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ (बांधणी) केले आहे !

या कार्यक्रमात भूमीपूजन झालेली अन्य विकासकामे !

  • ठाणे अंतर्गत २९ कि.मी. ‘रिंग मेट्रो’चा शिलान्यास
  • ठाणे ते मुंबई हा प्रवास केवळ २० मिनिटांत करणारा ‘इस्टर्न फ्री वे’
  • नैना प्रकल्प
  • ठाणे महापालिकेचे नवीन मुख्यालय

क्षणचित्रे

  • पंतप्रधानांना महाराष्ट्राची परंपरा सांगणार्‍या पैठणीचा फेटा, ठाण्याचे ग्रामदैवत कौपिनेश्वराची प्रतिमा आणि आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या दुर्गेश्वरीची प्रतिमा देण्यात आली.
  • महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांना वंदन करून पंतप्रधानांनी भाषणाला आरंभ केला.

मोदी यांचे ‘मास्टर स्ट्रोक’ (घणाघात) !

काँग्रेस म्हणजे लूट आणि फसवणूक यांचे ‘पॅकेज’ !

काँग्रेस भारताचा सर्वांत अप्रामाणिक आणि भ्रष्ट पक्ष आहे. कुठलाही काळ आणि राज्य असू दे, काँग्रेसचे चरित्र पालटत नाही. कर लावून पैसे गोळा करणे, भूमी घोटाळे करणे, युवकांना अमली पदार्थांत फसवणे, महिलांना शिवीगाळ करणारे नेते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेस म्हणजे लूट आणि फसवणूक यांचे ‘पॅकेज’ आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे हेच केले आहे. मोदी शौचालये बनवत आहेत आणि हिमाचलमध्ये काँग्रेसने शौचालयावर कर लावला.

शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत !

काँग्रेसने ज्या राज्यात सरकार बनवले, त्यांना उद्ध्वस्त केले. शेतकर्‍यांना उद्ध्वस्त केले. ‘समाजाला फोडा आणि सत्ता मिळवा’ हे काँग्रेसचे लक्ष्य आहे. आपण फुटलो, तर फोडणारे मौज करतील. काँग्रेसचे मनसुबे यशस्वी होऊ देऊ नका. शहरी नक्षलवादी काँग्रेस पक्ष चालवत आहेत.

विचारधारेचे एवढे पतन पाहिले नाही !

काँग्रेसच्या संगतीत जे राष्ट्रवादी पक्ष आले, ते तुष्टीकरण करणारे पक्ष बनले. सरकार वक्फ बोर्डाने केलेल्या अवैध हक्कांच्या विरोधात विधेयक आणू पहात आहे आणि काँग्रेसला मिळालेले पक्ष त्याला विरोध करण्याचे पाप करत आहेत.

काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वारंवार अपशब्द बोलते, तरीही हे पक्ष गप्प असतात. काँग्रेस ‘कलम ३७०’ (जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम) परत लागू करण्याची भाषा करते, तेव्हाही या पक्षांची बोलती बंद असते. विचारधारेचे एवढे पतन कधी पाहिले नाही.