Jagdish Tytler 1984 Delhi Riots : काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर

नवी देहली – देहली न्यायालयाने काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष १९८४ च्या देहलीतील शीख विरोधी दंगलीच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने त्यांच्यावर विविध कलमांखाली आरोप निश्‍चित केले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) २० मे २०२३ या दिवशी टायटलर यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) केले होते.

१ नोव्हेंबर १९८४ या दिवशी टायटलर यांनी देहलीतील गुरुद्वारा पूल बंगशसमोर अ‍ॅम्बेसेडर गाडीमधून उतरून शिखांना मारण्यासाठी जमावाला भडकवल्याचा आरोप एका साक्षीदाराने केला होता. यानंतर गुरुद्वाराला आग लावण्यात आली. या हिंसाचारात ३ जण  मारले गेले.

शीख दंगलीच्या प्रकरणी सीबीआयने टायटलर यांना यापूर्वी ३ वेळा निर्दोष ठरवले होते. वर्ष २००७ मध्ये पहिल्यांदा निर्दोेष ठरवल्यावर न्यायालयाने ते निर्दोष असल्याचे फेटाळून लावत फेरचौकशीचा आदेश दिला. यानंतर वर्ष २०१३ मध्ये सीबीआयने पुराव्यांअभावी टायटलर यांना पुन्हा निर्दोष ठरवले. याविरोधात याचिककर्ते न्यायालयात गेल्यावर डिसेंबर २०१५ मध्ये न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचे पुढील अन्वेषण करण्याचे निर्देश देत सांगितले की, आम्ही (न्यायालय) प्रत्येक पैलू तपासले गेले आहेत कि नाही ?, याची निश्‍चिती करण्यासाठी प्रत्येक २ महिन्यांनी तपासाचे निरीक्षण करू.

संपादकीय भूमिका

दोषींविरुद्ध गुन्हे नोंद व्हायला ४० वर्षे लागत असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल ? हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !