Land Jihad : मशिदीच्या नावाने मोठ्या प्रमाणात मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार आदी ठिकाणी भूमी बळकावण्याचे कारस्थान !

  • कठोर नियमावली बनवण्यासाठी आणि कारवाईसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

  • ४८ घंट्यांत भोंगे काढले नाहीत, तर भाजप रस्त्यावर उतरेल ! – किरीट सोमय्‍या

मुंबई – मशिदीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लँड जिहाद करून भूमी बळकावण्याचे कारस्थान मुंबई, भाईंदर, नवी मुंबई, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, पनवेल येथे चालू आहे. मशिदीच्या नावाने अनधिकृत घरे, झोपड्या, चाळी, वाढीव बांधकाम होत आहे. अनेक ठिकाणी सरकारी भूमीवर, मैदानात, हरित पट्टयावर किंवा समुद्राच्या लगतच्या खारफुटीवर अनधिकृत बांधकाम करून त्याला मशिदीचे नाव देण्यात येते. यावर भोंगेही लावले जातात; पण अशा प्रकारच्या बहुतेक मशिदींसाठी संबंधित व्यक्ती या पोलीस, महापालिका यांच्याकडून भोंग्यांची अनुमती घेत नाहीत.

मशिदींच्या नावाने जर भूमी बळकावणे चालू असेल, खुल्या सरकारी जागेत किंवा ‘नो डेव्हलपमेंट झोन’, सी.आर्.झेड.मध्ये (किनारी नियमन क्षेत्रामध्ये) बांधकाम होत असेल, तर त्यासंबंधी कठोर पावले उचलावीत, कठोर नियमावली सिद्ध करावी आणि या लोकांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्‍या यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. त्यांनी घाटकोपर आणि भांडुप येथील २५ अनधिकृत मशिदी, भोंग्यांची माहितीही दिली आहे. (ही माहिती पोलीस-प्रशासन यांना का मिळत नाही ? – संपादक) तसेच ४८ घंट्यांत भोंगे काढले नाहीत, तर भाजप रस्त्यावर उतरेल, अशी चेतावणीही दिली आहे. (अशी चेतावणी का द्यावी लागते ? यंत्रणा काम का करत नाही ? – संपादक)

पत्रामध्ये मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे

१. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या संबंधात पोलीस अनुमती, तसेच भोंग्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनीप्रदूषण, लोकांच्या तक्रारी, अनधिकृत मशिदीसाठी देण्यात येणार्‍या पोलीस अनुमती या संबंधात कारवाईची घोषणा केली होती.

२. गेल्या २ महिन्यांत मी या संबंधात मुंबईतील मुलुंड, भांडूप, विक्रोळी (पार्कसाईट), घाटकोपर (पश्चिम) इत्यादी पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या.

३. घाटकोपर (पश्चिम) पोलीस ठाण्याला मी भेट दिली. त्या वेळी पोलीस अधिकार्‍यांनी असे सांगितले की, आमच्या येथून एकाही मशिदीच्या भोंग्याला अनुमती दिलेली नाही. त्यावर आम्ही आक्षेप घेतल्यानंतर मशिदीवर जर भोंगे लावले असतील, तर त्याची अनुमती आवश्यक आहे, हे सांगितल्यानंतर पुढच्या ४ दिवसांत ३३ मशिदींच्या प्रतिनिधींनी पोलीस ठाण्यात अनुमतीसाठी अर्ज दिला. जी स्थिती घाटकोपरची (पश्चिम) आहे, तीच अन्य पोलीस ठाण्यांची आणि बहुतेक ठिकाणच्या मशिदींची आहे. (पोलिसांना याचे ज्ञान नाही कि त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अशांवरही कारवाई हवी ! – संपादक)

४. पोलीस अनुमती देतांना एका वेळेला ३० दिवसांसाठीची अनुमती देतात, सकाळी ६ ते १० वाजेपर्यंतची ही अनुमती असते. याचे प्रत्येक ३० दिवसांनी नूतनीकरण केले जाते; मात्र अनुमती देतांना पोलीस कोणत्याही प्रकारचे पुरावे, मशिदीची मालकी, अधिकृतता/अनधिकृतता, मशीद आहे कि नाही किंवा दोन-चार खोल्या उभारून उभे करण्यात आलेले अवैध बांधकाम आहे, अशी कोणतीही चौकशी करत नाहीत. (पोलीस जाणीवपूर्वक चौकशी करत नाही का ? – संपादक)

५. या मशिदीवर लावण्यात आलेले भोंगे हे बाहेरच्या दिशेने असतात, म्हणजेच आसपासच्या लोकांना आवाज ऐकवण्यासाठी असतात. या भोंग्यांसंबंधी आलेल्या तक्रारीची नोंदही घेतली जात नाही.

६. भोंग्यांचा आवाज किती मोठा आहे ? त्याचे कधीही ध्वनीवर्धकद्वारे पडताळणी केली जात नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा त्यांचे अधिकारीही या ध्वनीप्रदूषणाची फारशी चौकशी करीत नाहीत, कार्यवाही करीत नाहीत. (महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केवळ हिंदूंच्या सणांद्वारे होणारे प्रदूषणच दिसते, केवळ त्यावरच कारवाई केली जाते ! – संपादक)