संपादकीय : हिंदुविरोधी ‘यू ट्यूब-फेसबुक’ !

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रख्यात फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए यांच्या यू ट्यूब चॅनेलवर यू ट्यूबकडून बंदी घालण्यात आली आहे. यू ट्यूबच्या मार्गदर्शक तत्त्वांचे कथित उल्लंघन केल्यामुळे त्यांचे चॅनेल बंद करण्यात आले. या घटनेवरून सामाजिक माध्यमांतून टीका होत असून ‘यू ट्यूबची ही कृती एका व्यापक कटाचा भाग आहे’, असा आरोप केला जात आहे. ‘यू ट्यूब’, ‘गूगल’, ‘फेसबुक’ या जागतिक स्तरावर मोठ्या समजल्या जाणार्‍या आस्थापनांचा कारभार हा हिंदुविरोधी, डाव्या आणि विकृतीचे समर्थन करणार्‍या विचारसरणीच्या लोकांच्या हातात आहे. जागतिक स्तरावर कोणत्याही देशात राष्ट्रनिष्ठ लोक-गट-समुदाय यांचे खच्चीकरण करणे, संस्कृतीचे हनन करणे, स्वैराचाराचे समर्थन करणे, यांसाठी या माध्यमांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. फ्रान्सुआ गोतिए यांच्या यू ट्यूब चॅनेलवर बंदी आणल्याचे हे पहिलेच उदाहरण नाही. प्रखर हिंदुत्वनिष्ठ विचारांचे, अल्पावधीतच १० लाखांपेक्षा अधिक दर्शकसंख्या असलेले, राष्ट्रविरोधी लोकांचा पर्दाफाश करणार्‍या ‘स्ट्रिंग्ज रिव्हिल्स’वर ‘यू ट्यूब’ने बंदी आणली होती आणि ही बंदी आणतांना कोणतेही समर्पक कारण देण्यात आले नव्हते.

हिंदुविरोधी साहित्याला नेहमीच प्रोत्साहन !

‘यू ट्यूब’ हे अमेरिकी ऑनलाईन ‘व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म’ असून याच्या संस्थापक सदस्यांमध्ये प्रामुख्याने ख्रिस्ती आणि काही मुसलमानही आहेत. एकीकडे ‘यू ट्यूब’वर हिंदु धर्माचा प्रचार केल्यावर त्यांच्या पोटात दुखते, तर दुसरीकडे या माध्यमांद्वारे हिंदुविरोधी साहित्याला (‘कंटेट’ला) नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. ‘यू ट्यूब’वर काय असावे आणि काय असू नये, यांच्याशी संबंधित त्यांची काही धोरणे, मानके असून ती मानके केवळ दिखाव्यासाठीच आहेत. ‘यू ट्यूब’च्या मानकांचे उल्लंघन करणारे लाखो व्हिडिओज उघडपणे तेथे असून त्यांच्यावर कसलीच कारवाई केली जात नाही; त्याही पुढे जाऊन विकृत, पॉर्न, जिहादी आतंकवाद, धर्मांतर यांच्याशी संबंधित असलेल्या ‘कंटेट’वर कोणतीही कारवाई होत नाही.

बांगलादेशातील डॉक्टर असलेल्या पिनाकी भट्टाचार्य नावाच्या व्यक्तीकडून ‘पिनाकी भट्टाचार्य’ नावाचे एक भारतविरोधी, हिंदुविरोधी आणि इस्लामचे समर्थन करणारे ‘यू ट्यूब चॅनल’ चालवले जाते. खरेतर काही वर्षांपूर्वी पिनाकी भट्टाचार्य याने तबलिकी जमातीच्या प्रभावाखाली येऊन हिंदु धर्म सोडून इस्लामचा स्वीकार केल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याला हाकलून दिले. तो ‘यू ट्यूब’वर सातत्याने हिंदूंच्या विरोधात अत्यंत खालच्या थराला जाऊन, तसेच आतंकवादी संघटनांचे उदात्तीकरण करणारी प्रक्षोभक विधाने करतो. त्याच्या विरोधात वर्ष २०२१ मध्ये बांगलादेशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याविषयी फ्रान्स पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती; मात्र पुढे कारवाई झाली नाही ! पिनाकी याच्या विरोधात अनेक भारतियांनी ‘यू ट्यूब’ला पत्रे पाठवली; मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले.

हिंदुत्वनिष्ठांची गळचेपी !

‘यू ट्यूब’, ‘गूगल’, ‘फेसबुक’ ही बडी धेंडे नेहमीच हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी विचारांचे कार्य करणार्‍या व्यक्ती यांना पाण्यात पहातात. त्यातही जर कुणी या प्रसारमाध्यमांचा उपयोग करून हिंदु धर्माचा प्रसार करत असेल, तर लगेचच त्यांच्यावर हिरिरीने कारवाई  केली जाते. सर्वप्रथम वर्ष २०१२ मध्ये हिंदूंना संघटित करण्याचे कार्य करणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत ‘फेसबुक पेज’वर अन्याय्य बंदी घालण्यात आली. यानंतर पुन्हा नव्याने चालू करण्यात आलेले समितीचे ‘हिंदु अधिवेशन’ हे पान जून २०२१ मध्ये, त्याचसमवेत समितीचे ‘इन्स्टाग्राम’ खाते कोणतेही ठोस कारण न देता बंद करण्यात आले. केवळ भारतात नव्हे, तर जागतिक स्तरावर हिंदु धर्माचा शास्त्रशुद्ध भाषेत हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या सनातन संस्थेचे अधिकृत फेसबुक खाते सप्टेंबर २०२० मध्ये बंद करण्यात आले. यात धक्कादायक म्हणजे सनातन संस्थेला ‘फेसबुक’ने धोकादायक संघटना म्हणून काळ्या सूचीत समाविष्ट केले.

वर्ष २०२३ मध्ये सनातन संस्थेच्या ‘वेबसाइट’चे ॲप, विविध नामजप, आरती, मंत्र, स्तोत्रे, इत्यादींचा समावेश असलेले ‘सनातन चैतन्यवाणी’, आपत्काळासाठी उपयुक्त ‘सर्व्हायव्हल गाइड’ बंद करण्यात आले आहे. श्राद्धाची शास्त्रीय माहिती देणारे ‘श्राद्ध’,  ‘गणेशपूजा विधी, असे ५ ॲप ‘गूगल’ने प्ले स्टोअरवरून काढून टाकली. यामागे कारण देतांना ‘कट्टरतेला प्रोत्साहन देणारे आणि दिशाभूल करणारे कंटेट’, असे गूगलने म्हटले आहे. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबुक पानेही बंद करण्यात आली. एकीकडे अनेक वेळा तक्रारी करूनही धर्मांतराला प्रोत्साहन देणारा, युवकांना बाँबस्फोट करण्यास प्रवृत्त करणारा जिहादी आतंकवादी झाकीर नाईक याच्या ‘फेसबुक पेज’वर फेसबुक बंदी घालत नाही, तर दुसरीकडे हिंदु धर्माचा प्रसार करणार्‍या संस्थेची पाने तात्काळ बंद केली जातात. हे सरळसरळ जागतिक स्तरावरील हिंदुविरोधी षड्यंत्रच असल्याचे लक्षात येते.

अशांवर कठोर बंधने आणावीत !

प्रत्येकाच्या हातात आता भ्रमणभाष आल्यामुळे कुणालाही लागणारी माहिती कुठेही, कशीही उपलब्ध होते; मात्र येणारी माहिती ही दूषित, एकांगी असेल, तर ती मोठी समस्या निर्माण करते. ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ आणि अन्य काही सामाजिक माध्यमांमुळे आता जगाच्या कुठल्या कोपर्‍यात काय चालते, हे तुम्हाला लगेच कळते. या सर्व माध्यमांचे नियंत्रण हे भारताबाहेरील व्यक्तींच्या कह्यात असल्याने ही माध्यमे मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ अशांवर आता नियंत्रण आणण्याची अत्यावश्यकता निर्माण झाली आहे. ही माध्यमे इतकी शक्तीशाली आहेत की, ‘त्यांचे कुणीच वाकडे करू शकत नाही’, असे त्यांना वाटते.  त्यामुळे ‘नाक दाबल्यावर तोंड उघडते’ या उक्तीप्रमाणे ‘यू ट्यूब’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्राम’ या  माध्यमांना आता वेसण घालण्याचे काम सरकारला करावेच लागेल. तुम्हाला भारतात व्यवसाय करायचा असेल, प्रसारण करायचे असेल, तर इथले नियम-कायदे तुम्हाला पाळावेच लागतील, असे ठणकावून सांगावे लागेल. त्याचसमवेत या सर्व माध्यमांना समर्थपणे टक्कर देणारी स्वदेशी सामाजिक माध्यमेही उभी करावी लागतील.

हिंदुविरोधी सामाजिक माध्यमांवर वेसण घालण्यासाठी आता सरकारने कठोर पावले उचलावीत !