निरोगी जीवनासाठी व्यायाम !
जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे, तरी व्यायाम करणार्यांचे प्रमाण मात्र अल्पच दिसून येते. अजूनही अनेकांच्या मनात व्यायामाविषयी काही शंका असल्याचे आढळते. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर, उदा. मणक्यांचे आजार, मधुमेह, स्थूलता इत्यादींवर उपाय म्हणून औषधोपचार, पथ्य, उपवास, असे अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याविषयी जागरूकता निर्माण करणार आहोत, त्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत. (भाग ३)
प्रतिदिन व्यायाम करण्यामागील ध्येय निश्चित करा !
‘व्यायाम करतांना आपल्या शरिराला त्रास होतोच; पण त्यामुळे इच्छित पालट घडवण्याची उत्तेजना शरिराला मिळते, उदा. तुम्ही बळ वाढवण्यासाठी व्यायाम करत असाल, तर व्यायाम केल्याने शरिरातील स्नायू बळकट होण्यासाठीची उत्तेजना शरिराला मिळते. तुमचे मन व्यायाम करणे टाळत असेल, तर ‘आपल्याला प्रतिदिन व्यायाम का करायचा आहे ?’, हे आधी ठरवून घेणे आवश्यक आहे, उदा. बळ वाढवणे, वेदना न्यून करणे, शारीरिक त्रास न्यून करणे, वजन न्यून करणे, मनावरील ताण न्यून करून उत्साह वाढवणे किंवा एकंदरीत आरोग्य सुधारणे इत्यादी. यांपैकी एक ध्येय निश्चित केले, तर तेच तुम्हाला नियमित व्यायाम करण्यास प्रवृत्त करील. ध्येयाचा ध्यास असला की, कष्टांचा त्रास होत नाही.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.८.२०२४)