|
जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे, तरी व्यायाम करणार्यांचे प्रमाण मात्र अल्पच दिसून येते. अजूनही अनेकांच्या मनात व्यायामाविषयी काही शंका असल्याचे आढळते. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर, उदा. मणक्यांचे आजार, मधुमेह, स्थूलता इत्यादींवर उपाय म्हणून औषधोपचार, पथ्य, उपवास, असे अनेक पर्याय निवडले जातात; पण व्यायामाविना या सर्व उपाययोजना अपूर्ण ठरतात. या सदरातून आपण व्यायाम करण्याविषयी जागरूकता निर्माण करणार आहोत, त्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.
(लेखांक २)
‘व्यायामाचा वजन न्यून करण्यासाठी निश्चितच लाभ होतो; पण तो व्यायामाचा एकमेव लाभ किंवा उद्देश नाही. नियमित व्यायामामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, स्नायू आणि हाडे बलवान होतात, मनःस्थिती सुधारते, मनावरील तणाव न्यून होतो अन् एकूणच आरोग्य सुधारते. त्यामुळे ऊर्जा वाढते, झोप सुधारते आणि हृदयविकार अन् मधुमेह यांसारख्या जुनाट आजारांचा धोका न्यून होतो.
व्यायाम हे एक समग्र आराेग्यवर्धक आहे, केवळ वजन न्यून करण्याचे साधन नाही. त्यामुळे स्वतःचे शरीर आणि मन यांना निरोगी बनवण्यात येणार्या सर्व अडचणी दूर सारून नियमितपणे व्यायाम करण्याचा प्रयत्न करूया !’
– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञ (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (११.८.२०२४)