बैठ्या जीवनशैलीमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी प्रतिदिन व्यायाम करा !

  • आजपासून प्रत्येक बुधवारी आणि शुक्रवारी वाचा नवीन सदर !

  • आरोग्यमय जीवन जगण्यासाठी व्यायामाची आवश्यकता, त्याचे महत्त्व आणि त्याविषयीचे शंकानिरसन !

जगाच्या आधुनिकीकरणाच्या समवेत उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. आजकाल याविषयी बरीच चर्चा होत आहे आणि त्याविषयी जागरूकताही निर्माण झाली आहे, तरी व्यायाम करणार्‍यांचे प्रमाण मात्र अल्पच दिसून येते. अजूनही अनेकांच्या मनात व्यायामाविषयी काही शंका असल्याचे आढळते. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर, उदा. मणक्यांचे आजार, मधुमेह, स्थूलता इत्यादींवर उपाय म्हणून औषधोपचार, पथ्य, उपवास, असे अनेक पर्याय निवडले जातात. या सदरातून आपण व्यायाम करण्याविषयी जागरूकता निर्माण करणार आहोत, त्याची आवश्यकता आणि महत्त्व जाणून घेणार आहोत, तसेच व्यायामाविषयीच्या शंकांचे निरसन करणार आहोत.

सौ. अक्षता रेडकर

‘सध्याच्या आधुनिक जगात आपण बरेच जण बैठ्या जीवनशैलीच्या जाळ्यात अडकलो आहोत. आधुनिक जीवनातील सोयी-सुविधा, भ्रमणभाषवरून उपलब्ध झालेल्या ‘ऑनलाईन’ सुविधा इत्यादी पहाता जगाने एका नवीन युगात प्रवेश केला आहे, हे खरेच !

देवाने आपल्याला दिलेल्या शरिराची हालचाल होणे आवश्यक आहे. जेव्हा आपण या मूलभूत आवश्यकतेकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याची किंमत मोजावी लागते. निष्क्रीय आणि बैठ्या जीवनशैलीमुळे शारीरिक श्रम अल्प होऊ लागले आहेत. ‘अनेक घंटे बसून संगणकावर काम करणे, तसेच भ्रमणभाषचा अतीवापर’, यांमुळे आपल्या शरिराची ठेवण बिघडून सांधे आणि स्नायू यांच्याशी संबंधित त्रास वाढू लागले आहेत, तसेच बर्‍याच जणांना लठ्ठपणा, हृदय‍विकार, मधुमेह यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

बैठ्या जीवनशैलीतून निर्माण होणार्‍या या शारीरिक विकारांच्या साखळ्यांपासून मुक्त व्हा आणि आपले शारीरिक स्वास्थ जपून ठेवण्यासाठी आतापासूनच प्रतिदिन व्यायामासाठी न्यूनतम ३० मिनिटे वेळ द्या !’

– सौ. अक्षता रूपेश रेडकर, भौतिकोपचार तज्ञा (फिजिओथेरपिस्ट), फोंडा, गोवा. (११.८.२०२४)