तालिबान सरकारला मान्यता नाही ! – संयुक्त राष्ट्रे

दोहा (कतार) – अफगाणिस्तानशी संबंध वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे आणि तालिबान यांच्यात कतारची राजधानी दोहा येथे बैठक झाली. याविषयी संयुक्त राष्ट्रांच्या राजकीय आणि शांतता निर्माणविषयीच्या अधिकारी रोझमेरी ए. डिकार्लो यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, या बैठकीचा अर्थ ‘आम्ही तालिबान सरकारला मान्यता दिली’, असा होत नाही. या बैठकीला २४ देशांचे राजदूत उपस्थित होते.

डिकार्लो पुढे म्हणाल्या की, या बैठकीत विविध सूत्रांवर झालेल्या वैचारिक देवाण-घेवाणीमुळे अफगाण लोकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे. दोहा येथील शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारा तालिबान सरकारचा मुख्य प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद म्हणाला की, हा मेळावा तालिबानसाठी विविध देशांच्या प्रतिनिधींना भेटण्याची संधी आहे.

अँटोनियो गुटेरेस

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, तालिबानने अफगाण नागरी समाजातील लोकांना चर्चेपासून दूर ठेवण्याची आणि तालिबानला कायदेशीर देशाप्रमाणेच वागणूक देण्याची मागणी केली होती. दोहा येथे झालेल्या बैठकीत अफगाण महिलांच्या प्रतिनिधींना सहभागी होण्यापासून वगळण्यात आले, ज्यामुळे तालिबानने त्याचे दूत पाठवले.

२०२१ मध्ये अमेरिका आणि ‘नाटो’ यांच्या सैन्याने २० वर्षांनंतर अफगाणिस्तानातून माघार घेतली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने देशाची सत्ता कह्यात घेतली होती; पण कोणताही देश अधिकृतपणे तालिबानला ‘सरकार’ म्हणून मान्यता देत नाही.