अनेक शारीरिक कष्ट होत असतांनाही तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करणारे वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. अजित सिंह बग्गा

वाराणसी (उत्तरप्रदेश) – अनेक शारीरिक कष्ट होत असतांनाही तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करणारे वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा (वय ६४ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत, अशी आनंददायी घोषणा हिंदु जनजागृतीचे समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी १०.६.२०२४ या दिवशी एका कार्यक्रमात केली. या वेळी श्री. बग्गा यांची पत्नी सौ. लवप्रीत कौर, मोठे भाऊ श्री. गुलवंत सिंह बग्गा आणि काका श्री. इंद्रजीत सिंह सुहेल उपस्थित होते.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्री. अजित सिंह बग्गा यांनी मागील वर्षी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त केलेल्या भाषणातील काही भाग त्यांच्या कुटुंबियांना दाखवला. त्यानंतर सद्गुरु सिंगबाळ यांनी श्री. बग्गा यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना जाणवलेली काही आध्यात्मिक वैशिष्ट्ये सांगितली.

डावीकडून श्री.अजित सिंह बग्गा यांना शिवाची प्रतिमा भेट देताना सद्गुरु नीलेश सिंगबाळ

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली श्री. अजित सिंह बग्गा यांची गुणवैशिष्ट्ये

१. श्री. अजित सिंह बग्गा यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. आठवड्यातून दोन वेळेला त्यांना ‘डायलिसिस’ करून घ्यावे लागते. इतका गंभीर शारीरिक आजार असूनही समाजाला साहाय्य करण्याचे कार्य ते निरपेक्ष आणि समर्पित भावाने अखंडपणे करतात. कोरोनाच्या संकटकाळात सुद्धा त्यांनी स्वत:ची काळजी न करता समाजातील लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न केले.

२. श्री. बग्गा कर्मयोगी आहेत. समाजाकडे निरपेक्ष भावाने पहाणे, हे भक्तीचे उदाहरण आहे. त्यांचा अहं अल्प असल्यामुळेच ते निरपेक्ष भावाने समाज आणि राष्ट्र यांसाठी कार्य करतात.

श्री. अजित सिंह बग्गा यांची सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना जाणवलेली आध्यात्मिक वैशिष्ट्ये !

श्री.अजित सिंह बग्गा यांनी जून २०२३ मध्ये गोवा येथे झालेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त त्यांचे विचार व्यक्त केले होते. या वेळी सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना जाणवलेली त्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये येथे देत आहोत.

१. श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘श्री. अजित सिंह बग्गा यांच्या मनात ‘गरीब आणि गरजू यांच्या उदरनिर्वाहाचे कार्य घडावे’, अशी इच्छा असते.

आ. ते समाजसेवा अपेक्षाविरहित करतात. त्यामुळे त्यांची कर्मयोगाद्वारे साधना होते.

इ. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यासाठी समर्पित व्हावे’, अशी त्यांची इच्छा आहे.

ई. आतापर्यंत त्यांनी धर्मासाठी बराच त्याग केला आहे. त्यामुळे ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली आहे’, असे मला जाणवते.’

२. श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘श्री. अजित सिंह बग्गा यांच्यात हिंदु धर्मासाठी त्याग करण्याची तीव्र तळमळ आहे.

आ. त्यागपूर्ण साधनेमुळे त्यांच्यातील इच्छाशक्ती आणि मनोबल जागृत झाले आहे. त्यामुळे ते शारीरिक त्रासावर मात करून बिकट शारीरिक स्थिती असतांनाही हिंदुत्वासाठी कार्य करत आहेत. (त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार असून त्यांची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली आहेत. आठवड्यातून २ वेळा त्यांना ‘डायलिसिस’ (टीप) करावे लागते. असे असूनही ते शक्य तेवढे हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.)

टीप – मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया.

इ. त्यांच्या मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी सात्त्विक अपेक्षा आहे. ‘मी हिंदुत्वासाठी किती करू ?’, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे त्यांना ईश्वरी शक्ती सहजतेने ग्रहण होत असते.

ई. ते स्वसुखाचा विचार न करता हिंदु राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी त्याग करण्यास सिद्ध आहेत. ‘धर्मरक्षकाने कुठल्या पातळीपर्यंत त्याग करावा ?’, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला आहे. त्यांच्यात अप्रकट भाव असल्यामुळे त्यांच्याभोवती भावाची निळसर रंगाची प्रभावळ कार्यरत असते.

उ. त्यांना स्वतःकडून पूर्वी झालेल्या काही चुकांचा बोध झाला असून आता ते हिंदु धर्माचा प्रचार आणि धर्मरक्षण यांसाठी तळमळीने प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक स्थिती चांगली आहे.

ऊ. त्यांचे बोलणे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त होते. त्यामुळे त्यांचे बोलणे सर्वच श्रोत्यांच्या मनाला पुष्कळ भावले. त्यांचे भाषण ऐकतांना मला उत्साह आणि आनंद जाणवत होता.

ए. ते कर्महिंदू आहेत आणि त्यांच्या मनात निरपेक्ष प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्या १५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांना आपलेसे केले. त्यांचे राष्ट्र आणि धर्म या संदर्भातील दृष्टीकोन पुष्कळ सकारात्मक अन् सुस्पष्ट आहेत.

ऐ. त्यांनी स्वतःच्या पंथाचा महिमा न गाता हिंदुत्वाला मनातून स्वीकारले आहे. ते पंथ, शरिराची मर्यादा, अशा विविध बंधनांतून मुक्त आहेत.

३. सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ. ‘श्री. अजित सिंह बग्गा यांची हिंदु धर्मावर श्रद्धा आहे.

आ. त्यांनी हिंदु धर्मशास्त्राचे महत्त्व बुद्धीने समजून घेतले आहे आणि त्यातून प्रेरित होऊन बिकट शारीरिक स्थिती असूनही ते झोकून देऊन धर्मसेवा करत आहेत.

इ. निरपेक्ष धर्मसेवेमुळे त्यांचा स्वभाव मनमोकळा आणि प्रांजळ झाला आहे.

ई. त्यांच्यात चांगल्या प्रकारे धर्मप्रसार करून यशस्वी संघटन करण्याची क्षमता आहे.

उ. त्यांच्या मनात ‘हिंदु देवता आणि संत यांच्याप्रती पुष्कळ आदरभाव आहे.’

ऊ. त्यांच्यात दूरदृष्टी असल्यामुळे ते हिंदु राष्ट्राचे कट्टर समर्थक झाले आहेत.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : १९.६.२०२३)

श्री. अजित सिंह बग्गा यांचे मनोगत

श्री. अजित सिंह बग्गा यांचा सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती उच्च कोटीचा भाव आहे. स्वत:ची आध्यात्मिक प्रगती ऐकून त्यांच्या मनात कृतज्ञता भाव जागृत झाला. अत्यंत नम्र भावाने श्री. बग्गा म्हणाले, ‘‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचे चरण आमच्या घरी लागले, ही पुष्कळ भाग्याची गोष्ट आहे.’’ कृतज्ञतेच्या भावाने श्री. बग्गा यांनी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान केला.

यावर्षी श्रीरामनवमीच्या एक दिवस आधी शारीरिक त्रासामुळे श्री. बग्गा यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात भरती करण्यात आले होते, तरीसुद्धा दुसर्‍या दिवशी ध्वजपूजनासाठी ते ठरलेल्या ठिकाणी आले होते. अतिशय व्यस्त असूनसुद्धा ते समितीच्या उपक्रमांत सहभागी होतात आणि समितीच्या लोकांशी संलग्न रहाण्यासाठी प्रयत्न करतात.

क्षणचित्रे

१. श्री. बग्गा यांची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याच्या शुभप्रसंगी त्यांचे काका श्री. इंद्रजीत सिंह सुहेल यांनी सांगितले की, श्री. अजित सिहं बग्गा यांची इच्छाशक्ती इतकी अधिक आहे की, एक निरोगी व्यक्तीसुद्धा इतके परिश्रम करू शकत नाही, एवढे धर्मकार्य शारीरिक मर्यादा असतांनाही श्री. अजित सिंह बग्गा करत आहेत. सर्व कार्य करतांना ते सतत उत्साही आणि सकारात्मक रहातात.

२. श्री. बग्गा यांची पत्नी सौ. लवप्रीत कौर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मनुष्याची काय पात्रता आहे, हे ईश्वर सर्वज्ञानी असल्यामुळे तोच सर्व जाणतो. तोच बळ देत आहे आणि त्याच्या कृपेनेच सर्व होत आहे.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.