१. सद्गुरु सत्यवान कदम यांचे बोलणे अंतर्मनावर बिंबणे आणि त्यानुसार कृती करण्यासाठी ऊर्जा मिळणे अन् ताण न्यून होणे

‘एकदा मला सद्गुरु सत्यवान कदम यांच्या समवेत प्रवास करण्याची संधी मिळाली. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मी कुटुंबियांना प्रेम देण्यास अल्प पडते. त्यांच्या संदर्भातील आधीचे प्रसंग आठवून मला वर्तमानात स्थिर रहाता येत नाही. अशा वेळी मी काय करू ?’’ त्या वेळी सद्गुरु सत्यवानदादांनी अतिशय सोप्या भाषेत मला सांगितले, ‘‘ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असो द्यावे समाधान ।।’’ (अर्थ : भगवंताने आपणाला ज्या स्थितीत ठेवले, त्या स्थितीत रहावे. चित्ती मात्र समाधान असावे.) सद्गुरु दादांनी सांगितलेल्या या वचनातून ‘मला परिस्थिती स्वीकारायची आहे’, हे माझ्या लक्षात आले. हे वचन मला आधी ठाऊक होते; मात्र सद्गुरु दादांनी सांगितल्यावर ‘ते माझ्या अंतर्मनापर्यंत पोचले आणि मला तशी कृती करण्यासाठी ऊर्जा मिळाली’, असे मला वाटले. ‘माझ्या मनावरचा ताण न्यून झाला’, असे मी अनुभवले. सद्गुरु दादा सतत इतरांचा विचार करतात. ‘ते साधकांना प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांगतात’, हे मला क्षणोक्षणी अनुभवता येत होते.
२. ‘साधकांमधील स्वभावदोषांचे निर्मूलन व्हावे’, अशी तळमळ असणारे सद्गुरु सत्यवान कदम !

मला ४ दिवस कुडाळ सेवाकेंद्रात जाण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत मला सद्गुरु सत्यवानदादांच्या समवेत काही सत्संगांना बसण्याची संधी मिळाली. तेव्हा सद्गुरु सत्यवानदादांनी त्यांच्या आचरणातून अनेक सूत्रे शिकवली. कुडाळ सेवाकेंद्रातील साधकांना स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया राबवतांना काही सूत्रांमध्ये अडचण येत होती. ‘साधकांना ती प्रक्रिया समजावी’, ही सद्गुरु दादांची तळमळ होती. मी एक घंट्याने परतीच्या प्रवासाला निघणार होते. तेव्हा वेळ अल्प असूनही सद्गुरु दादांनी कुडाळ सेवाकेंद्रातील सर्व साधकांना एकत्र करून प्रसंगानुरूप स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगण्याची संधी मला दिली. तेव्हा ‘साधकांचा वेळ आणि त्यांच्यामधील कौशल्य यांची सांगड घालून सेवेचे नियोजन कसे करावे ?’, हे मला शिकायला मिळाले.
हे गुरुदेवा, आपणच सद्गुरु सत्यवानदादांच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन करता. ‘आपल्याच कृपेने मला सर्व सूत्रे शिकायला मिळाली आणि आपले चैतन्य अनुभवता आले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. दीपा औंधकर, रत्नागिरी (२४.३.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |