NCERT : गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही ! – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद

  • ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात बाबरीचा उल्लेख ‘३ घुमटांची वास्तू’ !

  • अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याचे आरोप फेटाळले !

एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी

नवी देहली – ‘राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे’च्या (‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या) इयत्ता १२ वीच्या राज्यशास्त्र विषयाच्या नव्या पुस्तकात बाबरीचा उल्लेख ‘३ घुमटांची वास्तू’ असा करण्यात आला आहे. अयोध्या प्रकरणाला २ पाने देण्यात आली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर अभ्यासक्रमात अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रमात केलेल्या पालटांचे समर्थन करतांना ‘गुजरात दंगल आणि बाबरी पाडणे, या घटना शालेय विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवश्यकता नाही’, अशी भूमिका ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने घेतली आहे. अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ होत असल्याच्या आरोपाचे एन्.सी.ई.आर्.टी.चे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत खंडन केले.

दिनेश सकलानी म्हणाले की,

१. विद्यार्थी आक्रमक व्हावेत आणि समाजात तेढ निर्माण व्हावा, असे शिक्षण आपण द्यायचे आहे का ? विद्यार्थ्यांना दंगलींविषयी शिकवण्याची आवश्यकता आहे का ? ते मोठे झाल्यानंतर त्याविषयी माहिती करून घेऊ शकतील; पण पाठ्यपुस्तकातून कशाला शिकवायचे ? वर्ष १९८४ मधील शीखविरोधी दंगलींविषयीचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातून काढल्यानंतर एवढी ओरड झाली नव्हती.

२. जर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल दिला असेल, तर तो अभ्यासक्रमाचा भाग का नसावा ? त्यात समस्या काय आहे ? एखादी गोष्ट कालबाह्य झाली असेल, तर ती पालटली पाहिजे. यात कुठेही ‘हे अभ्यासक्रमाचे ‘भगवेकरण’ आहे’, असे मला वाटत नाही. मुलांना तथ्ये माहिती व्हावीत; म्हणून आपण इतिहास शिकवतो, युद्धभूमी सिद्ध करण्यासाठी नव्हे.

३. आम्हाला सकारात्मक नागरिक घडवायचे आहेत आणि हा या पाठ्यपुस्तकांचा उद्देश आहे. आपल्या शिक्षणाचा उद्देश हिंसक आणि खचलेले नागरिक घडवणे, हा नाही. द्वेष आणि हिंसा हे शिकवण्याचे विषय नाहीत.

पुस्तकात करण्यात आलेले पालट

अ. ‘१६ व्या शतकात मोगल बादशहा बाबर याचा सेनापती मीर बांकी याने बाबरी बांधली’, असा इयत्ता १२ वीच्या जुन्या पुस्तकात संदर्भ होता. हा संदर्भ पालटून आता नमूद केले आहे की, वर्ष १५२८ मध्ये श्रीराम यांच्या जन्मस्थानी ३ घुमट असलेला ढाचा उभारण्यात आला होता; मात्र या ढाच्याच्या आत आणि बाहेर हिंदु देवतांच्या आकृत्या  स्पष्ट दिसत होत्या.

आ. आधीच्या पुस्तकात फैजाबाद (आता अयोध्या) जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी १९८६ मध्ये बाबरीचे टाळे उघडण्याची अनुमती दिल्यानंतर दोन्ही (हिंदु आणि मुसलमान) बाजूंनी झालेल्या हालचालींची माहिती दिली होती. तसेच जातीय हिंसाचार, रथयात्रा, वर्ष १९९२ मध्ये झालेले बाबरीचे पतन, त्यानंतर जानेवारी १९९३ मध्ये उसळलेला हिंसाचार यासंबधी माहिती दिली होती.

नव्या पुस्तकात हे संदर्भ वगळण्यात आले आहेत. अयोध्या वादाचा उल्लेख एका उतार्‍यात करण्यात आला आहे. ‘वर्ष १९८६ मध्ये फैजाबाद जिल्हा न्यायालयाने ३ घुमट असलेल्या ढाच्याचे टाळे उघडण्याचा आदेश दिला. त्यामुळे लोकांना त्याठिकाणी प्रार्थना करण्याची संधी मिळाली. हे ३ घुमट असलेली वास्तू श्रीराम यांच्या जन्मस्थानी बांधली असल्याचे मानले जाते. श्रीराममंदिराचा शिलान्यास झाला; मात्र पुढे श्रीराममंदिर बांधण्यास मनाई होती. हिंदु समुदायाला याविषयी चिंता वाटत होती, तर मुसलमान समुदाय या वास्तूवर नियंत्रण मिळवण्याची मागणी करत होता. जागेच्या हक्कांवरून दोन्ही समुदायांमध्ये तणाव वाढल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. वर्ष १९९२ मध्ये सदर वास्तूचे पतन झाल्यानंतर अनेक समीक्षकांनी हा भारतीय लोकशाहीच्या तत्त्वांना धक्का असल्याचे विवेचन केले होते’, असा उल्लेख या उतार्‍यात करण्यात आला आहे.

ब. नव्या पुस्तकात अयोध्या वादावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचाही उल्लेख करण्यात आला आहे. ९ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपिठाने ही भूमी हिंदु पक्षकारांची असल्याचा निकाल दिला.

जुन्या पुस्तकात ७ डिसेंबर १९९२ या दिवशी छापून आलेल्या बातम्यांची कात्रणेही देण्यात आली होती. या बातमीचे शीर्षक होते, ‘बाबरी मशिदीचे पतन’, ‘केंद्राकडून कल्याण सरकार बरखास्त’ तसेच १३ डिसेंबर १९९२ या दिवशीचे एक कात्रण होते, ज्यामध्ये ‘भाजपचे नेते अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, अयोध्येत भाजपचे गणित चुकले.’ नव्या पुस्तकात ही कात्रणे वगळण्यात आली आहेत.