Nepal MDH Everest Ban : ‘एव्हरेस्ट’ आणि ‘एम्.डी.एच्’ या भारतीय आस्थापनांच्या मसाल्यांवर आता नेपाळमध्येही बंदी !

काठमांडू (नेपाळ) – हाँगकाँग आणि सिंगापूर या देशांनंतर आता शेजारील नेपाळनेही भारतातील ‘एव्हरेस्ट’ आणि ‘एम्.डी.एच्’ या आस्थापनांच्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आस्थापनांच्या मसाल्यांमध्ये ‘इथिलीन ऑक्साईड’ हे  किटकनाशक असण्याची भीती नेपाळच्या अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता नियंत्रण विभागाने व्यक्त केली होती. त्यानंतर या दोन्ही मसाल्यांची विक्री, साठवणूक आणि आयात यांवर नेपाळने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

१. नेपाळच्या अन्न तंत्रज्ञान विभागाचे प्रवक्ते मोहन कृष्णा महाराजन् यांनी सांगितले की, या दोन्ही मसाल्यांची तपासणी केली जात असून अहवाल येईपर्यंत बंदी कायम राहील.

२. अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी यापूर्वीच या मसाल्यांच्या तपासणीचा आदेश दिला आहे. ब्रिटनच्या अन्न सुरक्षा विभागाने भारतातून आयात होणार्‍या सर्व मसाल्यांच्या तपासणीचे निर्देश दिले आहेत.