Madhavi Lata Inspects Burqa Identity : भाग्यनगर येथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी बुरखाधारी मुसलमान महिला मतदारांचे बुरखे काढून ओळखपत्र तपासले !

माधवी लता यांच्या विरोधात गुन्हा नोंद

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी एका मतदान केंद्रावर काही बुरखाधारी मुसलमान महिला मतदारांचे ओळखपत्र मागितले. त्यांच्या चेहर्‍यावरून बुरखा काढून मतदान ओळपत्रावरील छायाचित्राशी चेहरा तपासून पाहिला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी माधवी लता यांच्या विरोधात मलकपेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणावर जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले की, माधवी लता यांच्या विरोधात कलम १७१ क, १८६, ५०५(१)(क) आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १३२ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मला ओळखपत्र तपासण्याचा अधिकार ! – माधवी लता

या प्रकरणाविषयी माधवी लता म्हणाल्या की, मी उमेदवार आहे. कायद्यानुसार उमेदवाराला ओळखपत्र तपासण्याचा अधिकार आहे. मी पुरुष नाही, मी एक स्त्री आहे आणि अत्यंत नम्रतेने मी मुसलमान महिलांना केवळ विनंती केली. जर एखाद्याला या घटनेचा मोठा विषय बनवायचा असेल, तर याचा अर्थ विरोधक घाबरले आहेत.

मुसलमान महिला बुरखा घालून बोगस मतदान करतात !  – आमदार टी. राजा सिंह

बुरखा घालून एक मुसलमान महिला २० हून अधिक वेळा मतदान करते. असे प्रत्येक निवडणुकीत होत असते, असा दावा येथील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी केला.

संपादकीय भूमिका

मुसलमान महिला मतदान करतांना ओळखपत्रावरील छायाचित्र आणि प्रत्यक्ष चेहरा तपासण्यास नेहमीच विरोध करत असतात. बुरख्यामागे कोण आहे ? हे तपासता येत नसल्याने याद्वारे बोगस मतदान होत असते, असे अनेक वर्षे सांगितले जात आहे. आता प्रत्यक्ष उमेदवार त्याची पडताळणी करत असेल, तर त्याला दोषी कसे ठरवणार ? निवडणूक आयोगाला हे लक्षात का येत नाही ?