सनातन संस्था निष्कलंकच !


अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांची ऑगस्ट २०१३ मध्ये हत्या झाली. आपल्याकडे न्यायव्यवस्था अस्तित्वात असून या न्यायव्यवस्थेकडे न्याय मागण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला मुभा आहे. त्यामुळे कितीही मतभेद निर्माण झाले, तरी त्यासाठी कुणाचीही हत्या करणे, हे सुसंस्कृत आणि सुविद्य समाजाचे लक्षण नाही. त्यामुळे डॉ. दाभोलकर यांची हत्या हे निंदनीय कृत्य आहे, याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. तथापि कोणताही सबळ पुरावा नसतांना एखाद्या संस्थेवर हत्येचे खापर फोडणे, हे सभ्यतेचे लक्षण आहे, असे म्हणता येत नाही; पण ‘दाभोलकरांची हत्या सनातन संस्थेने केली’, असे कोणताही आधार नसतांना प्रारंभीपासून सांगण्यात आले आणि दुर्दैवाने अन्वेषणाची दिशाही तीच राहिली. ‘डॉ. दाभोलकरांची हत्या ही घटना, म्हणजे ‘भगवा आतंकवाद’ आहे’, असे जनमानसावर ठसवण्यात आले.

 १. निरपराध्यांना कारावास सहन करावा लागणे हा एक प्रकारचा अन्याय !

सनातन संस्थेला लक्ष्य केल्यावर तिच्या साधकांवर संशय घेतला गेला. त्याप्रमाणे अन्वेषण कार्याला आरंभ झाला. सनातनचे साधक विक्रम भावे, हिंदु जनजागृती समितीशी संबंधित सेवा करणारे डॉ. वीरेंद्र तावडे आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर दाभोलकरांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना अटक झाली आणि कारावासात टाकण्यात आले. वास्तविक ते निरपराध होते, तरीही त्यांना कारावास सहन करावा लागला. हा एक प्रकारचा अन्याय होता.

२. सनातन संस्थेने दिलेला लढा अत्यंत संयमाने आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादेत राहूनच !

श्री. दुर्गेश परुळकर

या प्रसंगाला सनातन संस्थेने मात्र अत्यंत संयमाने तोंड दिले. आपल्या साधकांवर झालेला अन्याय पाहून संस्था अविचारीपणाने वागल्याचे आढळून येत नाही. सनातन संस्था ही खरोखर आतंकवादी संघटना असती किंवा हा खराच भगवा आतंकवाद असता, तर देशात दंगली उसळल्या असत्या, जाळपोळ झाली असती; पण गेल्या १० वर्षांत सनातन संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. सनातन संस्थेकडून कोणत्याही प्रकारची सामाजिक किंवा राष्ट्रीय संपत्तीची हानी झालेली नाही. ही गोष्ट आपल्याला दुर्लक्षित करता येत नाही.

सनातन संस्थेने हा संपूर्ण लढा अत्यंत संयमाने आणि न्यायव्यवस्थेच्या मर्यादेत राहून दिला, असेच दिसून येते. न्याय प्रस्थापित करण्यासाठी अवैध मार्ग अनुसरावा, असे सनातन संस्थेला वाटले नाही. सनातन संस्थेने निर्बंधात्मक लढा चिकाटीने चालू ठेवला. या लढ्यात सनातन संस्थेचा विजय झाला.

३. सनातन संस्था : एक सांस्कृतिक विश्वविद्यालय !

मुळातच सनदशीर मार्गाने स्वतःचे कार्य करणारी सनातन संस्था सात्त्विक वृत्तीची आहे. जनता याचा नित्य अनुभव घेत आहे. ‘शिस्तबद्ध आणि ज्ञानवृद्धी करण्याचा प्रयत्न करणारी सनातन संस्था संस्कृती आणि धर्म यांचे विश्वविद्यालय आहे’, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही. कोणतेही विश्वविद्यालय हिंसक वृत्ती जोपासत नाही. सनातन संस्था हे एक असेच सांस्कृतिक विश्वविद्यालय आहे.

४. ‘सनातन संस्था ही आतंकवादी संघटना आहे’, हा आरोप न्यायालयाकडून निराधार !

देशद्रोही कारवायांच्या अंतर्गत जे कलम लावले जाते, असे ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्या’चे कलम सनातन संस्थेच्या साधकांवर लावण्यात आले. याचा अर्थ ‘द्वेषभावनेने सनातन संस्थेच्या विरोधात आरोप करण्यात आले’, असे म्हटल्यास वावगे ठरत नाही; कारण न्यायालयाने सनातन संस्थेवर लावलेल्या या कलमाला हटवले आहे. यातून ‘सनातन संस्था देशद्रोही, म्हणजेच आतंकवादी संघटना आहे’, असा केला जाणारा आरोप निराधार ठरतो.

सोने प्रत्येक वेळी कसाला (पूर्ण क्षमता लावणे) लावले जाते. त्यासाठी सोन्याला अग्नीपरीक्षा द्यावी लागते. त्याचप्रमाणे सनातन संस्थेविषयीही हे घडले आहे. या संस्थेने अग्नीपरीक्षा देऊन ती सोन्यासारखी पवित्र आणि तेजस्वी आहे, हे आता सिद्ध झाले आहे.

सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना उच्च न्यायालयात न्याय मिळेल !

दाभोलकर हत्येच्या प्रकरणात श्री. सचिन अंदुरे आणि श्री. शरद कळसकर यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तरी वरच्या म्हणजेच उच्च न्यायालयात त्यांना न्याय मागण्याची मुभा आहे. उच्च न्यायालयात त्यांना न्याय मिळेल आणि त्यांचेही निर्दोषत्व सिद्ध होऊन ते निष्कलंकित ठरतील, अशी आशा आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर

५. सत्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी ते कधीही अस्तास जात नाही !

‘सनातन संस्था हिंदुत्वाच्या विचारधारेचा पुरस्कार करते, म्हणजे फार मोठा अपराध करत आहे’, असा समज करून घेण्याची आवश्यकता नाही. आजपर्यंत हिंदुत्वाच्या विचारधारेने मानवी समाजाला मान खाली घालावी लागेल, असे कोणतेही कृत्य केलेले नाही. जगातील अन्य विचारधारांकडे लक्ष दिले, तर त्या मानवी समाजाला किती घातक आहेत, हे लक्षात येते. सद्विचारांचा संस्कार करण्याऐवजी विकृत मानसिकता वाढवण्याकडे ज्या विचारधारांचा कल आहे, अशा विचारधारा आज उजळ माथ्याने जगात वावरत आहेत. असत्य कथन करणारी विचारधारा कुणाचेही भले करू शकत नाही. ‘सत्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीही अस्तास जात नाही’, हा त्रिकालाबाधित सिद्धांत आहे. तो १० मे या दिवशी लागलेल्या निवाड्याने अधिक उजळला गेला आहे. या सिद्धांताला धाब्यावर बसवून विकृत मनोवृत्ती निर्माण करणार्‍या विचारधारेकडे दुर्लक्ष करून हिंदुत्वाच्या विचारधारेला लक्ष्य करणे, म्हणजे मानवतेशी वैर करण्यासारखे आहे; कारण विकृत विचारधारा नैतिकता अन् न्याय यांचा गळा घोटणारी असते. सामान्यजनांनी याचा अवश्य विचार करावा, अशीच ही घटना आहे; म्हणूनच ‘सनातन संस्था निष्कलंक असल्याचे शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद कुणाही सज्जन माणसाला होईल’, यात वाद नाही.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (११.५.२०२४)

सत्याच्या आणि हिंदुत्वाच्या विचारधारेला लक्ष्य करणे म्हणजे मानवतेशी वैर करण्यासारखे  !