PM Modi On Muslims : मुसलमानांनी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता !

  • पंतप्रधान मोदी यांचे मुसलमानांना आवाहन !

  • काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी व्यवस्थेचा लाभ का मिळाला नाही ?, याचा विचार करा ! – पंतप्रधान

पंतप्रधान मोदी

नवी देहली – मी प्रथमच हे बोलत आहे. मी मुसलमान समाजातील सुशिक्षित लोकांना आत्मपरीक्षण करायला सांगतो. देश एवढा प्रगती करत आहे. जर आपल्या समाजात न्यूनता जाणवत असेल, तर त्याची कारणे काय आहेत, याचा विचार करा ! काँग्रेसच्या काळात तुम्हाला सरकारी व्यवस्थेचा लाभ का मिळाला नाही ? एकदा आत्मपरीक्षण करून निर्णय घ्या ! तुमच्या मुलांचे भविष्य खराब करू नका, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी विशेष संवाद साधतांना केले.

या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,

१. वर्ष २००२ च्या आधी प्रत्येक १० वर्षांत ७ वर्षे तरी गुजरातमध्ये दंगली होत असत; परंतु २००२ नंतर गुजरातमध्ये एकही दंगल झाली नाही.

२. जागतिक स्तरावर मुसलमान समाजात पालट घडून येत आहेत. आज मी आखाती देशांमध्ये जातो. मला वैयक्तिकरित्या तेथे पुष्कळ आदर मिळतो आणि भारतालाही मिळतो. ‘योग’ हा सौदी अरेबियात अधिकृत अभ्यासक्रमाचा विषय आहे. मी भारतात योगाविषयी बोललो, तर तुम्ही म्हणता की, ‘मोदी मुसलमानविरोधी आहेत !’

३. कोणत्याही समाजाने मजुरांसारखे जगावे, अशी माझी इच्छा नाही.

४. आम्ही ना इस्लामच्या विरोधात आहोत, ना मुसलमानांच्या ! मी जेव्हा तिहेरी तलाक रहित करण्याचा कायदा केला, तेव्हा मुसलमान भगिनींना ‘मी वास्तविक काम करणारा माणूस आहे’, असे वाटले. जेव्हा मी कोरोनाचा प्रतिबंध करणारी लस आणली, तेव्हाही लोकांना तसेच वाटले. आम्ही कुणाशीही भेदभाव करत नाही.