Canada legitimized separatist forces: कॅनडाने ‘स्वातंत्र्या’च्या नावाखाली फुटीरतावादी शक्तींना वैध रूप दिले !- परराष्ट्रमंत्री जयशंकर

निज्जर हत्याप्रकरणी ३ भारतियांना अटक केल्याचे प्रकरण

परराष्ट्रमंत्री जयशंकर

नवी देहली – कॅनडाने भारतावर आरोप करणे त्याचा राजकीय नाइलाज आहे. कॅनडात निवडणुका होत असून मतपेटीचे राजकारण चालू आहे. आमची सर्वांत मोठी समस्या आज कॅनडामध्ये आहे; कारण तेथील सत्ताधारी पक्ष आणि अन्य राजकीय पक्ष यांनी उग्रवाद, फुटीरतावाद अन् हिंसाचार यांमध्ये गुंतलेल्या शक्तींचे समर्थन केले आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांना कायदेशीर रूप देण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही यासंदर्भात त्यांना काही विचारता, तर ते ‘आम्ही एक लोकशाही देश आहोत’, असे उत्तर देतात, अशी सडेतोड प्रतिक्रिया भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाने ३ भारतियांना अटक केल्यावरून जयशंकर यांनी त्यांची भूमिका मांडली. कॅनडाच्या ‘सीबीसी’ वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले तिघे कुख्यात गुंड लॉरेंस बिश्‍नोई याच्या गटाशी संबंधित आहेत.

जयशंकर यांनी कॅनडावर अनेक गंभीर आरोपही केले आहेत. ते म्हणाले की,

१. अनेक वेळा सांगूनही संघटित गुन्हे करणार्‍या गटांना कॅनडाने दिला आश्रय !

अटक केलेल्या भारतियांची माहिती अजूनपर्यंत कॅनडाने दिलेली नाही. आम्ही त्याच्या प्रतीक्षेत आहोत. अटक करण्यात आलेले संदिग्ध गटांशी संबंधित असल्याचे समजले आहे. भारताने अनेक वेळा सांगूनही पंजाब राज्यातील संघटित गुन्हे करणार्‍या गटांना कॅनडाने आश्रय दिला आहे.

२. कॅनडातील पोलीस यंत्रणा आम्हाला कोणतेच सहकार्य करीत नाही !

निज्जरच्या हत्येवरून जे काही घडत आहे, ते कॅनडाचे आंतरिक राजकारणामुळे होत असून भारताशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही. कॅनडाकडे निज्जर हत्येवरून भारताच्या विरोधात कोणताही पुरावा नाही. तेथील पोलीसयंत्रणा आम्हाला कोणतेच सहकार्य करीत नाही.

३. कॅनडात ‘खालिस्तान समर्थक’ मतपेटीचे राजकारण !

कॅनडात ‘खालिस्तान समर्थक’ असलेल्या काही लोकांनी स्वत:ला राजकीय स्तरावर संघटित केले आहे आणि त्याला एका प्रभावशाली राजकीय दबावगटाचा आकार प्राप्त झाला आहे. तेथील सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक खासदारांची संख्या नसल्याने त्यांना अशा काही पक्षांच्या आणि नेत्यांच्या समर्थनावर अवलंबून रहावे लागत आहे. मतपेटीच्या अशा राजकारणाची तेवढी मोठी समस्या अजून अमेरिकेत निर्माण झालेली नाही, जेवढी कॅनडात आहे.

४. ‘न्यूटनच्या सिद्धांता’नुसार प्रतिक्रिया दिली जाणार !

कॅनडाने हे लक्षात घेतले पाहिजे की, आजचे जग हे एकतर्फा चालत नाही. क्रिया केली, तर ‘न्यूटनच्या सिद्धांता’नुसार आता राजकारणातही प्रतिक्रिया दिली जाणार.

५. संदिग्ध लोकांना स्थान दिले, तर आपल्या संबंधांवर परिणाम होणार !

कॅनडाने पंजाबमध्ये संघटित गुन्हेगारी करणार्‍या अनेक गटांचे स्वागत केले आहे. भारताने अनेक वेळा कॅनडाला समजावले आहे की, हे लोक भारताचे गुन्हेगार आहेत, तरीही तुम्ही त्यांना ‘व्हिसा’ देता. यांच्यापैकी अनेक जण बनावट कागदपत्रे करून तुमच्याकडे आले आहेत, तरीही तुम्ही त्यांना स्थान देता. तुम्ही राजकीय उद्देशासाठी आलेल्या अशा संदिग्ध लोकांना स्थान दिले, तर आपल्या संबंधांमध्येही समस्या निर्माण होतील. भारताने आतापर्यंत २५ लोकांच्या प्रत्यर्पणाची माहिती देऊनही कॅनडाने त्या लोकांना भारताच्या सुपुर्द केलेले नाही. यांच्यापैकी अनेक जण खलिस्तान समर्थक आहेत.