२५० पाकिस्तानी हिंदूंनी अयोध्येत प्रभु श्रीरामाचे दर्शन घेतले !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – पाकिस्तानमधून आलेल्या २५० हिंदूंनी अयोध्येत शरयू नदीमध्ये स्नान करून प्रभु श्रीरामाचे मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यासह अयोध्येतील हनुमानगढी, कनक भवन आदी अन्य प्राचीन मंदिरांतही जाऊन त्यांनी दर्शन घेतले. छत्तीसगडमधील रायपूर येथील प्रसिद्ध शदानी दरबारचे प्रमुख पू. डॉ. युधिष्ठिर लाल यांनी या दर्शनासाठी पुढकार घेतला. पू. डॉ. युधिष्ठिर लाल म्हणाले की, ज्याप्रमाणे ५०० वर्षांनंतर श्रीरामजन्मभूमी आपल्याला मिळाली आणि तेथे भव्य श्रीराममंदिर बांधले गेले, त्याचप्रमाणे पाकिस्तानातील सिंध प्रांतही एक दिवस भारताचा भाग बनेल.
१. सिंध प्रांतातील जरवार गावातून आलेले गोविंद राम माखेजा म्हणाले की, भारतात पूर्ण शांतता आहे. रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावर फिरू शकतात. व्यवसाय करू शकतात. सर्व सण उत्साहाने आणि श्रद्धेने साजरे केले जातात. मिरवणुका काढल्या जातात. पाकिस्तानमध्ये हिंदूंना अशा प्रकारे सण साजरे करण्याचे स्वातंत्र्य नाही.
२. सिंधमधील मीरपूर माथेलो येथील रहिवासी ओमप्रकाश म्हणाले की, पाकिस्तानमध्ये नेहमीच भीतीचे वातावरण असते. भारतात सून सुरक्षित आहे; पण पाकिस्तानात मुलगी संध्याकाळी घरी परतली नाही, तर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती सतावू लागते.