Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी ३ भारतियांना अटक

भारताने सोपवले होते हत्या करण्याचे दायित्व ! – पोलिसांचा आरोप

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी ३ भारतियांना एडमंटन शहरातून अटक केली. करण ब्रार, करणप्रीत सिंह आणि कमलप्रीत सिंह अशी त्यांची नावे असल्याचे असून तिघांचेही वय २० ते ३० वर्षे या दरम्यान आहे. ‘उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले.

१. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत होते. निज्जरची हत्या करण्याचे दायित्व भारताने त्यांच्यावर सोपवले होते, असा आरोप पोलिसांनी केला आहे.

२. या अटक केलेल्या आरोपींचा संबंध भारतातील गुंड लॉरेन्स बिश्‍नोई टोळीशी असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष २०२१ मध्ये हे तिघेही तात्पुरत्या व्हिसावर कॅनडामध्ये आले होते.

३. कॅनडाच्या पोलिसांच्या आरोपानुसार निज्जरच्या हत्येमध्ये तिन्ही आरोपींनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. त्यांतील एकावर निज्जरचे ठिकाण शोधण्याचे दायित्व होते. दुसरा आरोपी वाहनचालक होता आणि तिसर्‍याने निज्जरवर गोळीबार केला.

४. संशयित आरोपींच्या अटकेनंतर कॅनडाचे सार्वजनिक संरक्षण मंत्री डॉमिनिक लेब्लँक म्हणाले की, मला कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस यांच्यावर पूर्ण विश्‍वास आहे. पोलिसांनी निज्जर हत्या प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. हत्येचा भारताशी संबंध आहे कि नाही ?, याचे उत्तर पोलीस चांगले देऊ शकतील.

५. १८ जून २०२३ ला संध्याकाळी सरे शहरातील गुरुद्वारातून बाहेर पडतांना निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर १८ सप्टेंबरला पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जरच्या हत्येत भारत सरकारचा सहभाग असल्याचा आरोप केला होता, जो भारताने फेटाळला होता. ‘या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे पुरावे देऊ’ असे कॅनडाने म्हटले होते; मात्र अद्याप ते दिलेले नाही.

संपादकीय भूमिका

कॅनडा जाणीवपूर्वक या हत्येच्या प्रकरणात भारतियांना अडकवत आहे का ?, याची चौकशी भारताने करणे आवश्यक आहे !