Service Tax On Yoga Shibirs : योगऋषी रामदेवबाबा यांना योग शिबिरासाठी भरावा लागणार ‘सेवा कर’ ! – सर्वोच्च न्यायालय

योग शिबिरासाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याचे दिले कारण !

योगऋषी रामदेवबाबा

नवी देहली – योगऋषी रामदेवबाबा यांची संस्था ‘पतंजलि योगपीठ न्यासा’कडून आयोजित करण्यात येणार्‍या योग शिबिरांसाठी प्रवेश शुल्क आकारले जात असल्याने योग ही एक सेवा बनते. त्यामुळे यापुढे न्यासाकडून आयोजित शिबिरांसाठी त्याला ‘सेवा शुल्क’ भरणे बंधनकारक असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भूईया यांच्या खंडपिठाने दिला. या माध्यमातून सेवा कर अपील न्यायाधिकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.

प्रयागराज येथील सीमा शुल्क, उत्पादन शुल्क आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणाने ५ ऑक्टोबर २०२३ या दिवशी पतंजलि योगपीठ न्यासाला कर भरण्याचा आदेश दिला होता. त्याला आव्हान देणारी याचिका न्यासाने सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत न्यायाधिकरणाचा निकाल कायम ठेवला.