‘६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन हे प्रतिवर्षी गोवा येथे होणारे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ आणि उत्तर भारतात होणारे ‘उत्तर भारत हिंदु राष्ट्र् अधिवेशन’ यांसाठी उपस्थित रहातात. अधिवेशनात किंवा अन्य सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाषणाला आरंभ करतांना ते नेहमी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना वंदन करून बोलायला आरंभ करतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये बँकॉक, थायलंड येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ हा जागतिक स्तरावरील ३ दिवसांचा कार्यक्रम झाला. तेथे ६० देशांचे २ सहस्र प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमात अधिवक्ता विष्णु शंकर जैन एक मान्यवर आमंत्रित वक्ता होते. त्या वेळी मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. शुद्धभाव आणि धर्मकार्याची तळमळ यांमुळे भाषण क्षात्रभावयुक्त होणे
‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या कार्यक्रमातील एका सत्रात ‘हिंदु मंदिरांची सरकारी यंत्रणा आणि अतिक्रमणे यांतून मुक्ती’ या विषयावर अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे भाषण होणार होते. येथेही त्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांच्या भाषणाचा आरंभ ‘धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले’ यांना वंदन करून केला. यातून त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव दिसून आला. धर्मकार्याची तळमळ आणि शुद्धभाव यांमुळे त्यांचे भाषण क्षात्रभावयुक्त झाले. त्यांचा आध्यात्मिक स्तर चांगला असल्याने त्यांच्या वाणीत चैतन्य जाणवून ‘त्यांचे भाषण ऐकत रहावे’, असे मला वाटले. ‘अन्य वक्त्यांच्या तुलनेत त्यांचे भाषण प्रभावी आणि अहंविरहित झाले’, असे मला जाणवले.
२. भ्रमणभाषवरून श्री. श्रीराम लुकतुके यांच्या संपर्कात राहून भेटण्याची उत्सुकता दर्शवणे
‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या कार्यक्रमासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, मी आणि श्री. श्रीराम लुकतुके गेलो होतो. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या मनात सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. बँकॉक येथे असतांनाही ते भ्रमणभाषवरून श्री. श्रीराम लुकतुके यांच्या संपर्कात होते. आम्ही बँकॉक येथे पोचल्यावर ते आमच्या भेटीसाठी उत्सुक होते.
३. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्याप्रती असलेला भाव !
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी अधिवक्ता विष्णु शंकर जैन मुख्य सभागृहात मान्यवरांच्या पहिल्या रांगेत बसले होते. आम्हाला (सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि मला) पाहिल्यावर ते आमच्याकडे आले. त्यांनी आम्हाला दोघांनाही वाकून चरणस्पर्श करून भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा सभागृहात अनुमाने २ सहस्र मान्यवर बसले होते, तरीही अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना आम्हाला चरणस्पर्श करून नमस्कार करतांना प्रतिष्ठा आड आली नाही. यावरून त्यांच्यातील उत्तम साधकत्त्व, नम्रता आणि भाव हे दैवी गुण दिसून आले.
४.‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांना गोवा येथे आयोजित केल्या जाणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सहभागी होण्यास सांगणे
कार्यक्रमानंतर अधिवक्ता विष्णु शंकर जैन आम्हाला भेटून म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तुम्ही ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’साठी आला आणि या कार्यक्रमात सहभागी झाला’ हे पुष्कळ महत्त्वाचे अन् आवश्यकही आहे.’’ ते तेथील काही मान्यवरांना गोवा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित होणार्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे (अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे) महत्त्व सांगून त्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुचवत होते. ते त्यांना ‘या अधिवेशनांचे किती बारकाईने नियोजन केले जाते’, याविषयी सांगत होते. यावरून त्यांचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याप्रती आदर दिसून आला.’
– (सद्गुरु) नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक, वाराणसी (३०.१२.२०२३)