सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !

फाल्गुन कृष्ण द्वादशी (६.४.२०२४) या दिवशी सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचा ५१ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण येथे पाहूया.

सद्गुरु (सुश्री (कु.)) अनुराधा वाडेकर

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

‘सनातनच्या सद्गुरु अनुराधा वाडेकर या ‘सनातनच्या धर्मप्रचारक’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षापासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना चालू केली. त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही त्यांनी चिकाटीने साधनेचे प्रयत्न करून शीघ्र आध्यात्मिक उन्नती साध्य केली. त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढील लेखात केले आहे.

श्री. राज कर्वे

१. सामान्य माहिती

अ. जन्मदिनांक : ३१.३.१९७३

आ. जन्मवेळ : दुपारी १.५०

इ. जन्मस्थळ : डोंबिवली, ठाणे

२. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे व्यक्तीमत्त्व दर्शवणारे घटक

अ. लग्नरास (कुंडलीतील प्रथम स्थानातील रास) : सद्गुरु अनुराधाताईंच्या कुंडलीत प्रथम स्थानात कर्क रास आहे. कर्क रास जलत‌त्त्वाची रास आहे. या राशीत सर्जनशीलता (क्रिएटिव्हीटी), निर्मितीक्षमता, प्रेमभाव, वात्सल्यभाव आदी वैशिष्ट्ये आहेत. कर्क रास प्रथम स्थानी असणार्‍या कुंडलीत मंगळ ग्रह योगकारक (प्रभावी) असतो. त्यामुळे व्यक्तीमध्ये परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात प्रगती करून अढळपद प्राप्त करते.

श्री. यशवंत कणगलेकर

आ. जन्मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : सद्गुरु अनुराधाताईंच्या कुंडलीत चंद्र कुंभ राशीत आहे. कुंभ रास वायुत‌त्त्वाची रास आहे. या राशीत संशोधकवृत्ती, नाविन्यता, बौद्धिक प्रगल्भता, ध्येयप्राप्तीची तळमळ, सांसारिक जीवनापासून अलिप्तता आदी वैशिष्ट्ये आहेत. ही शनि ग्रहाची रास आहे. आध्यात्मिक गुणांनी युक्त असलेली ही रास व्यक्तीला विरक्तीकडे नेते.

 

३. सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्ये

३ अ. सद्गुरु अनुराधाताई प्रारंभीपासून आनंदाच्या शोधात असणे : कुंडलीतील प्रथम स्थानाचा स्वामी चंद्र अष्टम स्थानात आहे. अष्टम स्थान हे दुःख, शोक, शारीरिक त्रास आदींचे स्थान आहे. त्यामुळे व्यक्तीला जीवनात अधिक कष्ट सोसावे लागतात. असे असले, तरी अष्टम स्थान एक आध्यात्मिक स्थान आहे. त्यामुळे व्यक्ती आनंदाचा शोध घेण्यासाठी धडपडते. सद्गुरु अनुराधाताईंच्या तारुण्यपणी सभोवतालची परिस्थिती समाधानकारक असतांनाही त्यांचे मन समाधानी नसे. ‘धन आणि प्रसिद्धी प्राप्त करणे’, एवढेच मनुष्यजन्माचे लक्ष्य नाही’, हे त्यांना जाणवत असे. त्यांची ओढ प्रारंभीपासून शाश्वत आनंदप्राप्तीकडे होती.

३ आ. पूर्वजन्मी श्रीविष्णूची उपासना करणे : सद्गुरु अनुराधाताईंच्या कुंडलीत पंचम स्थानाचा स्वामी मंगळ आणि नवम स्थानाचा स्वामी गुरु यांची युती आहे. पंचम स्थान पूर्वजन्माशी संबंधित असून नवम स्थान भाग्याशी संबंधित स्थान आहे. हा योग सद्गुरु अनुराधाताईंची पूर्वजन्मीची साधना असल्याचे दर्शवतो. मंगळ आणि गुरु हे ग्रह ‘मकर’ राशीत आहेत. मकर ही भगवान श्रीविष्णूची रास आहे. त्यामुळे हा योग सद्गुरु अनुराधाताईंनी पूर्वजन्मी श्रीविष्णूची उपासना केल्याचे दर्शवतो.

३ इ. कलागुण देणारी कुंडलीतील रवि आणि शुक्र यांची युती : कुंडलीत नवम (भाग्य) स्थानात रवि आणि शुक्र या ग्रहांची मीन राशीत युती आहे. हा योग कलेसाठी पुष्कळ चांगला आहे. हा योग उपजत कलागुण देतो. सद्गुरु अनुराधाताईंना बालपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यांना मुंबईतील ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’ या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला. तेथे त्यांनी ‘टायपोग्राफी’ (अक्षरशास्त्र) हा विषय निवडला. पुढे या शिक्षणाचा उपयोग त्यांना साधनेसाठी झाला. सद्गुरु अनुराधाताईंच्या साधनेचा आरंभ ‘सात्त्विक अक्षरे बनवणे’ या सेवेपासून झाला.

३ ई. गुरुप्राप्ती होणे आणि गुरूंचा सहवास लाभणे : आद्य शंकराचार्य यांनी ‘विवेकचूडामणी’ या ग्रंथात लिहिले आहे की, ‘या जगात ३ गोष्टी लाभणे दुर्लभ आहे – पहिली गोष्ट म्हणजे ‘मनुष्यजन्म’, दुसरी गोष्ट म्हणजे ‘मुमुक्षुत्व’ (ईश्वरप्राप्तीची तळमळ) आणि तिसरी गोष्ट म्हणजे ‘महापुरुषांचा (संतांचा) सहवास’. या तिन्ही गोष्टी ईश्वरीकृपेने लाभतात.’

सद्गुरु अनुराधाताईंच्या जीवनात गुरूंचे आगमन झाल्यावर त्यांना समाधान, आनंद आणि शांती यांची प्राप्ती झाली. त्यांना गुरूंचा प्रत्यक्ष सहवास लाभला. त्या कालावधीत गुरूंनी त्यांना घडवले आणि समष्टी कार्य करण्यासाठी सिद्ध केले. सद्गुरु अनुराधाताईंच्या कुंडलीतील सप्तम स्थानातील ‘मंगळ-गुरु युती’ अन् नवम (भाग्य) स्थानातील ‘रवि-शुक्र युती’ हे योग गुरुप्राप्तीचा लाभ दर्शवतात.

३ उ. साधनेसाठी सर्वस्वाचा त्याग करणे : सद्गुरु अनुराधाताईंच्या कुंडलीत बाराव्या (मोक्ष) स्थानात शनि आणि केतू हे ग्रह आहेत. हे दोन्ही ग्रह वैराग्यदायी आहेत. हा एक प्रकारचा ‘संन्यासयोग’ आहे. या योगामुळे व्यक्ती मायेपासून अलिप्त असते, तसेच तिला ईश्वरप्राप्तीची तळमळ असते. सद्गुरु अनुराधाताईंनी वर्ष १९९८ मध्ये म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केला. त्यांनी कुटुंब, घर, व्यवसाय, सुख, प्रसिद्धी आदी सर्वांचा त्याग केला. त्यांनी त्यांची कला गुरुचरणी समर्पित केली. स्वतःकडील सर्वकाही अर्पण केल्यामुळे गुरूंनी त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. गुरुकृपेमुळे सद्गुरु अनुराधाताईंची जलद आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांनी वर्ष २०११ मध्ये म्हणजे वयाच्या ३८ व्या वर्षी संतपद प्राप्त केले.

३ ऊ. व्यापक कार्य करण्याची क्षमता असणे : कुंडलीत सप्तम स्थानात मंगळ आणि गुरु या ग्रहांची युती आहे. मंगळ ग्रह ‘क्रियाशीलता आणि नेतृत्वगुण’ यांचा, तर गुरु ग्रह ‘व्यापकता आणि वृद्धी’ यांचा कारक आहे. त्यामुळे मंगळ आणि गुरु यांची ही युती व्यापक कार्य करण्याची क्षमता देते. हा योग समष्टी प्रकृती दर्शवतो. सद्गुरु अनुराधाताईंनी त्यांच्या साधनाप्रवासात ‘प्रसारसेविका म्हणून दायित्व सांभाळणे, साधनेविषयक शिबिरांच्या आयोजनात सहभागी होणे’, आदी समष्टी सेवा केल्या आहेत. वर्ष २०११ पासून त्या ‘धर्मप्रचारक’ म्हणून कार्यरत आहेत. ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेच्या कार्यात सद्गुरु अनुराधाताईंचे मोलाचे योगदान असणार आहे.

३ ए. भावजागृती आणि स्वभावदोष-निर्मूलन यांसाठी चिकाटीने केलेल्या प्रयत्नांमुळे तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणे : सद्गुरु अनुराधाताईंना सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास होता. त्रासामुळे शारीरिक आणि मानसिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होत असे; पण अशाही स्थितीत त्यांनी गुरूंना अपेक्षित अशी साधना करण्यासाठी प्रयत्न केले. भाववृद्धी होण्यासाठी त्यांनी दैनंदिन कृती, सेवा इत्यादी करतांना देवाशी सतत अनुसंधान साधण्याचा प्रयत्न केला. स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवतांना ‘स्वतःमधील स्वभावदोषांमध्ये किती घट झाली आणि गुणांमध्ये किती वृद्धी झाली ?’ याची टक्केवारी त्या वेळोवेळी लिहून काढत. त्यांनी केलेल्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे त्यांचे स्वभावदोष अल्प कालावधीत न्यून होऊन गुणवृद्धी पुष्कळ प्रमाणात झाली. (याविषयी अधिक माहिती सनातनचा ग्रंथ ‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांचे साधनापूर्व जीवन अन् साधनाप्रवास’ या ग्रंथात दिली आहे.) तीव्र स्वरूपाचा आध्यात्मिक त्रास असूनही जलद गतीने आध्यात्मिक उन्नती करून सद्गुरु अनुराधाताईंनी साधकांसमोर एक आदर्श ठेवला.

४. सारांश

सद्गुरु अनुराधाताईंच्या जन्मकुंडलीचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, त्यांच्या कुंडलीत अनेक कष्टदायक योग आहेत. त्यांच्या प्रारब्धाची तीव्रता अधिक होती, तसेच त्यांना तीव्र आध्यात्मिक त्रास होता. अशा प्रतिकूल परिस्थितीतही भाव, श्रद्धा आणि तळमळ यांच्या बळावर त्यांनी साधना करून आध्यात्मिक उन्नती साध्य केली. त्यांनी कुणा व्यक्तीचा मानसिक आधार मिळवण्यापेक्षा सर्वशक्तीमान ईश्वरावरच स्वत:चा भार सोपवला. ‘आपण जन्माला येतांना कोणते प्रारब्धकर्म घेऊन येतो, यापेक्षा या जन्मात आपण क्रियमाणकर्म कसे वापरतो ? याला अधिक महत्त्व आहे’, हे सद्गुरु अनुराधाताईंनी त्यांच्या उदाहरणातून सिद्ध केले. त्यांच्या उदाहरणामुळे शेकडो साधकांना प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रेरणा मिळते.

कृतज्ञता

सद्गुरु अनुराधा वाडेकर यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२६.५.२०२३)