|
पणजी, २८ मार्च (वार्ता.) : देहली मद्य धोरण घोटाळाचा संबंध गोव्यात वर्ष २०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीशी असल्याचा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) यापूर्वीच केला आहे. या अनुषंगाने ‘ईडी’कडून गोव्यातही चौकशी चालू आहे. ‘ईडी’ने समन्स बजावल्यानंतर ‘आप’चे संयोजक अमित पालेकर, प्रा. रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक यांनी २८ मार्च या दिवशी ‘ईडी’च्या कार्यालयात उपस्थिती लावली. चौकशीनंतर सायंकाळी प्रा. रामराव वाघ म्हणाले, ‘‘ईडी’ला ‘आप’ने गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा खर्च आणि प्रचार कसा केला ? याविषयी माहिती हवी होती. यासंबंधी ‘ईडी’ला काही प्रश्न होते आणि त्याविषयीची माहिती आम्ही त्यांना दिली आहे.’’
(सौजन्य : Republic World)
‘ईडी’च्या चौकशीच्या वेळी अमित पालेकर, प्रा. रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक यांनी दुपारी ‘ईडी’च्या कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. या ठिकाणी उपस्थित असलेले ‘आप’चे नेते वाल्मीकि नायक यांनी भाजप सरकारकडून अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला.
‘ईडी’चे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर ‘आप’चे संयोजक अमित पालेकर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘ईडी’ तिचे काम करत आहे आणि मी या चौकशीला पूर्ण सहकार्य केले आहे. लोकांनी आता काय घडत आहे ? ते पाहिले पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाला सत्ताच्युत केले पाहिजे. आजची घटना ही एखाद्या चित्रपटाप्रमाणे आहे. यापुढेही अजूनही पुष्कळ काही घडणार आहे. आश्चर्यकारक म्हणजे ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावलेले चौघेही भंडारी समाजाचे आहेत.’’
देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २१ मार्च या दिवशी कह्यात घेतल्यानंतर न्यायालयात त्यांच्या जामीनअर्जाला विरोध करतांना ‘ईडी’च्या अधिवक्त्यांनी देहली येथील मद्य धोरण घोटाळ्यातील रक्कम आम आदमी पक्षाने वर्ष २०२२ मध्ये गोव्यातील विधानसभा निवडणुकीत वापरल्याचे म्हटले होते.