‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादाने १ ऑगस्ट १९९१ या दिवशी ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’ स्थापन केली. त्यानंतर त्यांनी २३.३.१९९९ या दिवशी ‘सनातन संस्था’ या संस्थेची गोवा येथे स्थापना केली. आता मार्च २०२४ मध्ये सनातन संस्थेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत. सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त संस्थेच्या साधकांचे सूक्ष्मातील जाणू शकण्याचे जे वैशिष्ट्य आहे, ते उदयास येऊन कसे वृद्धींगत होत गेले ? याविषयी माहिती देण्याचा मी प्रयत्न करत आहे.
‘चांगली वस्तू आणि त्रासदायक वस्तू कशी ओळखायची ?’, हे गुरुदेवांनी शिकवणेगुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) साधकांना त्यांच्या साधनेच्या आरंभी ‘सात्त्विक वस्तू आणि असात्त्विक वस्तू’ यांतील भेद समजण्यासाठी त्या दोन्ही वस्तूंचे प्रयोग घेतले. १. त्यामध्ये त्यांनी त्या वस्तू साधकांसमोर धरून त्यांना सात्त्विक वस्तू आणि असात्त्विक वस्तू ओळखायला शिकवले, म्हणजेच गुरुदेवांनी साधकांना ‘चांगली वस्तू आणि त्रासदायक वस्तू’ ओळखायला शिकवले. २. त्यानंतरचा पुढील टप्पा; म्हणजे साधकांना प्रत्यक्ष वस्तू न दाखवता त्या वेगवेगळ्या पाकिटांत घालून दोन पाकिटांपैकी चांगली स्पंदने कोणत्या पाकिटांतून येत आहेत ? आणि त्रासदायक स्पंदने कोणत्या पाकिटातून येत आहेत ? हे त्या पाकिटांकडे बघून किंवा पाकिटे हातांत घेऊन ओळखायला शिकवले. चांगल्या स्पंदनांमुळे देहाला हलके वाटणे, थंडावा जाणवणे, मनाला चांगले वाटणे, प्रकाश जाणवणे, अशा अनुभूती येतात. याउलट त्रासदायक स्पंदनांमुळे देहावर दाब जाणवणे, मळमळणे, मनाला नकोसे वाटणे, अंधार जाणवणे, अशा अनुभूती येतात. साधकांना हे शिकायला मिळाल्याने त्यांना चांगली आणि त्रासदायक स्पंदने ओळखता येऊ लागली. |
सूक्ष्मातील कळत असल्याने साधक वाईट शक्तींची आक्रमणे समजून घेऊन त्यावर नामजपादी उपाय योजत असणेसनातन संस्थेचे साधक अध्यात्माचा प्रसार करतात. यामुळे समाज सुसंस्कृत बनून सात्त्विक बनत आहे. या कलियुगात वाईट शक्तींचा प्रकोप झालेला आहे. वाईट शक्ती समाजाची सात्त्विकता वाढण्याला विरोध करतात. यामध्ये त्या साधकांवर आक्रमणे करतात, तसेच साधक जी अध्यात्मप्रसार करण्याची सत्सेवा करतात, त्यामध्येही विघ्ने आणतात. वाईट शक्तींची होणारी आक्रमणे कळण्यासाठी सूक्ष्मातील जाणण्याची कुवत असणे आवश्यक असते. ही कुवत असेल, तरच साधक वाईट शक्ती कशा प्रकारे ? आणि नेमके कुठे आक्रमण करत आहेत ?, तसेच वाईट शक्ती कोणत्या दिशेने ? कुठे ? कोणत्या कुंडलिनीचक्रावर आणि पंचतत्त्वांपैकी कुठल्या तत्त्वाच्या स्तरावर आक्रमण करत आहेत ? हे लक्षात घ्यावे लागते. ते सूक्ष्मातून समजले, तर त्यावर नामजपादी उपाय करणे सोपे जाते. |
१. अध्यात्मशास्त्र सूक्ष्माविषयीचे कसे आहे ? आणि सूक्ष्मातील अनुभूती कशा घ्यायच्या ? हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध प्रयोगांद्वारे शिकवणे
अध्यात्मशास्त्र हे कृती आणि अनुभूती यांचे शास्त्र आहे. अनुभूती या पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील असतात. सामान्य व्यक्तीला अनुभूतींचे ज्ञान नसते. तिला पंचज्ञानेंद्रियांद्वारे पंचतत्त्वांचे अनुभव येतात, ते स्थुलातील असतात. याउलट अनुभूती या सूक्ष्मातील असतात. अध्यात्मशास्त्र हे देवता, ‘सत्त्व, रज आणि तम’ हे त्रिगुण, प्रारब्ध, आध्यात्मिक त्रास अशा सूक्ष्मातील घटकांचा परिणाम, साधनेमुळे त्यांच्यात होणारे पालट यांविषयीचे शास्त्र समजावून सांगते. हे स्थुलातून समजावून सांगण्याला मर्यादा येतात. त्यांची अनुभूती घ्यावी लागते किंवा ईश्वरकृपेने येते. अनुभूती या पंचसूक्ष्मज्ञानेंद्रियांद्वारे येतात. साधनेने साधकांची पंचसूक्ष्मज्ञानेंद्रिये अनुभूती घेण्यास सक्षम होतात. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांनी हे शास्त्र समजावून सांगितले आणि विविध प्रयोगांद्वारे ‘सूक्ष्मातील स्पंदने कशी असतात ?’, याची अनुभूती घेण्यास शिकवले.
२. सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम आणि सूक्ष्मातीत हे सूक्ष्मातील परिणामांचे ४ स्तर
सूक्ष्म जाणून घेण्याचे ४ स्तर आहेत आणि ते म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम आणि सूक्ष्मातीत. याचे उदाहरण अयोध्येत श्री रामलल्लाची स्थापना झाली, यावरून देता येईल.
१. सूक्ष्म परिणाम : लोकांच्या मनात श्रीरामाप्रती भाव निर्माण होणे
२. सूक्ष्मतर परिणाम : लोकांच्या मनात भक्तीचे बीज रुजणे
३. सूक्ष्मतम परिणाम : भक्तीमुळे लोकांची सात्त्विकता वाढणे
४. सूक्ष्मातीत परिणाम : सात्त्विक लोकांमुळे भारतात ईश्वरी राज्य स्थापन होणे
यावरून लक्षात येते की, अधिकाधिक सूक्ष्म स्तराकडे जाणे, म्हणजे ईश्वराचा कार्यकारणभाव जाणू शकणे. सूक्ष्म ते सूक्ष्मातीत हा जो प्रवास आहे, त्यामध्ये व्यक्ती अधिकाधिक सूक्ष्म स्तराकडे जाते; म्हणजेच तिची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अधिकाधिक वाढते. हे एका उदाहरणाद्वारे आपण पाहू.
१. एखादी सूक्ष्मातील घटना लक्षात येणे (उदा. खोलीत चांगली स्पंदने जाणवत आहेत), म्हणजे सूक्ष्मातील कळणे.
२. त्या सूक्ष्मातील घटनेचे स्थळ कळणे (चांगली स्पंदने खोलीत कुठून येत आहेत), म्हणजे सूक्ष्मतर कळणे.
३. त्या सूक्ष्मातील घटनेचा काळ कळणे (चांगली स्पंदने खोलीत येण्याची प्रक्रिया केव्हा आरंभ झाली), म्हणजे सूक्ष्मतम कळणे.
४. शेवटी सूक्ष्मातील घटनेचा कार्यकारणभाव कळणे (खोलीत चांगली स्पंदने का येऊ लागली), म्हणजे सूक्ष्मातीत कळणे. ईश्वर हा सूक्ष्मातीत आहे आणि साधकांना साधनेने तेथपर्यंत जायचे असते.
३. पंचतत्त्वांच्या स्पंदनांची ओळख करून देणे
यापुढील सूक्ष्मातील जाणून घेण्याचा टप्पा म्हणजे जी स्पंदने जाणवतात, त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपैकी कुठली स्पंदने प्रामुख्याने जाणवतात, हे ओळखणे. या पंचतत्त्वांशी संबंधित अनुक्रमे शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती ही सूक्ष्मातील स्पंदने असतात अन् ती ओळखणे थोडेफार सोपे असते. या स्पंदनांशी संबंधित अनुभूती साधारण काय असतात ? हे पुढील सारणीत दिले आहे.
गुरुदेवांनी दिलेल्या या माहितीवरून साधकांना पंचतत्त्वांची स्पंदने ओळखता येऊ लागली. साधक साधना करत असल्याने त्यांना या अनुभूती येतात. सामान्य व्यक्तीला जरी ही माहिती दिली, तरी तिला अशा अनुभूती येऊ शकत नाहीत; कारण तिची साधना नसते.
४. गुरुदेवांनी साधकांना वाईट शक्ती करत असलेल्या आक्रमणांतूनही शिकवणे
गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली साधक व्यष्टी साधना (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना), तसेच समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना) करत आहेत. त्यामुळे समाजाची सात्त्विकता वाढत आहे. ती सहन न होऊन वर्ष २००२ पासून सूक्ष्मातील वाईट शक्ती साधक, साधकांच्या वस्तू, साधक रहात असलेले आश्रम यांवर आक्रमण करू लागल्या. एवढेच नव्हे, तर त्या गुरुदेवांवरही आक्रमण करू लागल्या. ही आक्रमणे साधकांना नवीनच होती. गुरुदेवांनी साधकांना या आक्रमणांतूनही शिकवले. वाईट शक्ती पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश अशा पुढच्या पुढच्या पंचतत्त्वांच्या स्तरांवर कशा आक्रमण करत आहेत ? हे त्यांनी सांगितले.
वाईट शक्ती साधकांवर विविध पंचतत्त्वांच्या स्तरांवर आक्रमण करत असल्या, तरी ईश्वरही साधकांना त्या त्या पंचतत्त्वाच्या चांगल्या अनुभूती देऊन त्यांना होत असलेला त्रास दूर करत असतो. याचे एक उदाहरण सांगायचे, तर वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.
५. काही साधक गुरुकृपेने सूक्ष्म परीक्षण करू शकणे
अ. एखादी घटना घडली, तर त्या घटनेचे सूक्ष्म परीक्षण करण्याची क्षमता काही साधकांमध्ये निर्माण झाली. साधक घटना कुठे घडली ? केव्हा घडली ? आणि तिच्या मागचा कार्यकारणभाव सूक्ष्मातून जाणून सांगू लागले. त्यांचे परीक्षण नियतकालिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. त्यातून समाजाला त्या घटनांमागचे अध्यात्मशास्त्र समजू लागले.
आ. घटना सात्त्विक (सकारात्मक ऊर्जेची किंवा मंगलदायी) असली, तर त्या घटनेच्या माध्यमातून ईश्वर कार्य करून कसा साहाय्य करतो ? त्या घटनेचा झालेला सकारात्मक परिणाम इत्यादी गोष्टी सूक्ष्म परीक्षणाद्वारे सामान्य लोकांच्या लक्षात येऊ लागल्या.
इ. ती घटना असात्त्विक (नकारात्मक ऊर्जेची, म्हणजे त्रासदायक) असली, तर वाईट शक्ती त्या घटनेच्या माध्यमातून कशा त्रास देतात? त्या घटनेचा झालेला वाईट परिणाम आणि तो परिणाम दूर करण्यासाठी करावयाची आध्यात्मिक उपाययोजना, या गोष्टी समाजाच्या लक्षात आणून देणे सूक्ष्म परीक्षणाद्वारे शक्य झाले. त्यामुळे सूक्ष्मातील जाणून घेण्याची उत्सुकता जिज्ञासूंमध्ये निर्माण होणे शक्य झाले. अशी त्रासदायक घटना टाळण्यासाठी साधना करणे कसे आवश्यक आहे ? हेही सांगणे शक्य झाले.
ई. एखादे संत किंवा साधक समाजात अध्यात्मातील प्रवचन करण्यासारखी सत्सेवा करत असतांना सूक्ष्मातील घडामोडी काय काय घडल्या ? याचेही सूक्ष्म परीक्षण साधकांनी केले.
उ. एखादी घटना घडत असतांनाही साधक सूक्ष्म परीक्षण करत असत. त्यामुळे त्या घटनेचा प्रवास सूक्ष्मातून कसा झाला, हे समजणे शक्य झाले. ती घटना प्रत्यक्ष समोर न घडता दूरवर कुठेही घडत असली, तरीही परीक्षण करण्याची क्षमता गुरुकृपेने साधकांमध्ये निर्माण झाली.
ऊ. एखाद्या साधकामध्ये तीव्र स्वभावदोष किंवा अहं असेल, तर ‘त्याच्या एखाद्या कृतीचा कसा अयोग्य परिणाम होतो ?’, हे सूक्ष्म परीक्षणाद्वारे समजावून सांगता आल्याने त्या साधकाला त्याचे स्वभावदोष किंवा अहं दूर करण्यासाठी साहाय्य करता आले.
ए. एखादे संत नामजपाद्वारे आध्यात्मिक उपाय करत असतांना समोरच्या किंवा दूरवरच्या व्यक्तीवर किंवा एखाद्या घटकावर काय परिणाम होत आहे ? हे सूक्ष्म परीक्षणाद्वारे साधकांना सांगता येऊ लागले.
ऐ. हिंदु संस्कृतीत एखादी कृती करण्याची विशिष्ट पद्धत सांगितलेली असते. ती परंपरेने चालत आलेली असते. सध्या पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव भारतियांवर पडत आहे. त्यामुळे हिंदु संस्कृतीतील पद्धती डावलल्या जात आहेत. भारतियांमध्ये पुन्हा हिंदु संस्कृती रुजवण्यासाठी हिंदु संस्कृतीत सांगितलेल्या कृतींचा कसा सात्त्विक परिणाम होतो, हे सूक्ष्म परीक्षणाद्वारे सिद्ध करता येऊ लागले.
ओ. सूक्ष्मातून जाणू शकणारे काही साधक सूक्ष्मातील घटनेचे चित्र काढून वर्णन करू शकत. या माध्यमातून ती घटना आणखी स्पष्ट होत असे.
अशा प्रकारे सूक्ष्म परीक्षण करण्याचे लाभ झाले. साधकांना सूक्ष्म परीक्षण करता येणे, ही त्यांच्यावरील गुरुकृपाच आहे !
६. सूक्ष्मातील कळण्याचा लाभ कलेच्या माध्यमातून साधना करणार्या साधकांना पुष्कळ होणे
६ अ. चित्रकलेच्या माध्यमातून साधना करणारे साधक : गुरुदेवांनी चित्रकलेच्या माध्यमातून साधना करणार्या साधकांना गणपति, शिव, श्रीकृष्ण, दत्त, मारुति, श्रीराम आणि श्री महालक्ष्मी या सप्तदेवतांची चित्रे काढण्यास सांगितले. यासाठी साधकांना यांतील प्रत्येक देवता कशी दिसते, तिची वस्त्रे, तिचे अलंकार, तिची आयुधे इत्यादी सूक्ष्मातून जाणून चित्र काढायचे होते. साधकांनी देवतांची चित्रे काढल्यावर गुरुदेवांनी ‘त्या प्रत्येकामध्ये देवतेचे तत्त्व किती प्रमाणात आले आहे ?’, हे सांगितले. प्रारंभी देवतेच्या तत्त्वाचे प्रमाण २ – ४ टक्केच होते; पण हेही पेठेत (बाजारात) मिळणार्या देवतेच्या चित्रातील १ – २ टक्के तत्त्वापेक्षा जास्तच होते. गुरुदेवांनी सप्तदेवतांपैकी प्रत्येक देवतेच्या चित्रातील तिचे तत्त्व वाढण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. जशी साधकांची साधना वाढत गेली, तसे त्यांना सूक्ष्मातील कळण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यामुळे देवतेच्या चित्रांतील देवतेचे तत्त्व २४ वर्षांच्या कालावधीत २ – ४ टक्क्यांवरून ३० – ३२ टक्क्यांपर्यंत वाढले. कलियुगात मनुष्याला देवतेचे तत्त्व अधिकाधिक ३० टक्क्यांपर्यंतच जाणता येते. सनातनच्या साधकांनी ही मर्यादाही ओलांडली आहे. या देवतांच्या चित्रांचा लाभ भक्तीभाव वाढण्यासाठी जसा साधकांना झाला, तसा समाजालाही झाला.
६ आ. मूर्तीकलेच्या माध्यमातून साधना करणारे साधक : गणेशोत्सवात पेठेत गणपतीच्या मूर्ती विक्रीस येतात, त्या बहुतेक वेळा धर्मशास्त्रानुसार आणि सात्त्विक नसतात. मूर्तीकला ज्ञात असणार्या साधकांना गुरुदेवांनी गणपतीची सात्त्विक मूर्ती बनवण्यास सांगितली. यामध्ये त्या साधकांना सूक्ष्मातून गणपतीचे रूप जाणून त्याप्रमाणे गणपतीची मूर्ती साकार करावी लागली. त्यासाठी त्यांना तीन वर्षे लागली. या मूर्तीमध्ये गणपतीचे २८.३ टक्के तत्त्व आले आहे. सध्या श्री दुर्गादेवीची मूर्ती बनवणे चालू आहे.
६ इ. सात्त्विक रांगोळ्या काढणार्या साधिका : रांगोळ्या पुष्कळ जण काढतात; पण बहुतांशी त्या सात्त्विक आणि देवतातत्त्व आकृष्ट करणार्या नसतात. सूक्ष्मातील जाणणार्या सनातनच्या साधिकांनी सर्वांना सहजतेने काढता येतील अशा, तसेच सात्त्विक आणि विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या रांगोळ्यांच्या आकृत्या बनवल्या आहेत. समाजाला त्यांचा उपयोग होण्यासाठी त्या संदर्भातील ‘सात्त्विक रांगोळ्या’ हा ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
६ ई. अन्य कलांच्या माध्यमातून साधना करणारे साधक : गायन, वादन, नृत्य इत्यादी कलांच्या माध्यमांतून साधना करणारे साधकही सनातन संस्थेमध्ये आहेत. त्यांनाही त्यांच्या कलेचा अभ्यास करतांना त्या कलेचा स्वतःवर, प्रेक्षकांवर, तसेच वातावरणावर काय परिणाम होत आहे ? हे जाणण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. या साधकांना स्वतःतील या क्षमतेचा लाभ होतो. सात्त्विक आणि ईश्वराकडे नेणारी कला कशी असायला हवी ? याचा ते अभ्यास करतात आणि समाजासमोरही मांडतात. यातून त्यांची व्यष्टी साधनेबरोबर समष्टी साधनाही होते.
७. सारांश
थोडक्यात साधक साधना करत असल्याने त्यांना सूक्ष्मातील कळू लागले. साधनेमुळे सात्त्विकता-असात्त्विकता, चांगले-त्रासदायक, पंचतत्त्वे, सत्त्व-रज-तम इत्यादी जाणण्याची क्षमता निर्माण होते आणि त्यांची अनुभूती घेता येते. त्यामुळे साहजिकच साधक योग्य तेच आचरण करतात. ते हिंदु संस्कृतीचे, हिंदु संस्कृतीत सांगितलेल्या आचारधर्माचे, धर्माचरणाचे पालन करतात. त्यामुळे सध्याच्या कलियुगातील रज-तमयुक्त वातावरणाची, नैसर्गिक संकटांची झळ त्यांना अल्प प्रमाणात लागते. देव त्यांचे रक्षण करतो. याउलट आपण सध्या बघतो की, अनेक जण हिंदु संस्कृतीनुसार न वागता पाश्चात्त्य संस्कृतीनुसार वागतात. याचे एक उदाहरण म्हणजे आजकाल मुली आणि स्त्रिया सर्रास केस मोकळे सोडून समाजात वावरतात, काळे कपडे परिधान करतात, तसेच पुरुषांप्रमाणे वेश धारण करतात; कारण त्यांची साधना नसल्याने त्यांना या अयोग्य कृतींमुळे सूक्ष्मातील काय परिणाम होतात, हे लक्षात येत नाहीत. साधकांना मात्र अयोग्य कृतींचे परिणाम माहीत असल्याने ते समाजात वावरणे असो कि घरात, नेहमी योग्य कृतीच करण्याचा प्रयत्न करतात. तसेच घरातील रचना असो, घरातील भिंतींचा रंग असो, त्यांच्या दैनंदिन कृती असोत, या सर्वांमध्ये ते सात्त्विकता आणण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे अनुकरण त्यांची मुले करतात. असे केल्याने त्यांचे जीवन सात्त्विक होत आहे.
यावरून साधना, सूक्ष्मातील कळणे आणि अनुभूती घेणे कसे महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते. सनातन संस्था हाच प्रायोगिक भाग शिकवत असल्याने साधकांची झपाट्याने आध्यात्मिक उन्नती होत आहे. याचे संपूर्ण श्रेय केवळ आणि केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनाच आहे !
सनातन संस्थेची अध्यात्माच्या क्षेत्रातील आतापर्यंतची २५ वर्षांची उत्कर्षमय आणि उल्लेखनीय वाटचाल सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यामुळेच झाली. यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करतो !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३.३.२०२४)
साधकांना प्राप्त झालेले अध्यात्माविषयीचे सूक्ष्मातील नाविन्यपूर्ण ज्ञान सनातन संस्थेने सर्वसामान्यांसाठी ३६५ हून अधिक ग्रंथांत प्रसिद्ध केलेले असणेकाही साधक करत असलेल्या सूक्ष्म परीक्षणाचा पुढील टप्पा म्हणजे त्यांना सूक्ष्मातील ज्ञान मिळू लागले. विश्वमन आणि विश्वबुद्धी यांच्याशी एकरूप झाल्यास असे ज्ञान मिळते. जेव्हा अशा साधकांना अध्यात्मातील एखादा प्रश्न विचारला जातो किंवा एखाद्या विषयाच्या संदर्भात माहिती विचारली जाते, तेव्हा त्यांना त्याविषयी सखोल आणि नाविन्यपूर्ण ज्ञान मिळते. त्यांना मिळत असलेल्या ज्ञानाचा ओघ पुष्कळ असतो. ते दिवसभरात (मोठ्या वहीच्या) कागदाच्या ‘A4’(ए ४) आकाराची १५ ते २० पाने भरतील एवढे ज्ञान मिळवू शकतात. वर्ष २००३ पासून १५ – २० साधक अशा प्रकारे ज्ञान मिळवत आहेत. त्यामुळे अध्यात्मातील कृतींविषयी ‘का आणि कसे’ यांची शास्त्रीय उत्तरे मिळू लागली. अध्यात्मातील विविध विषयांच्या संदर्भातील जिज्ञासेमुळे गुरुदेव सूक्ष्मातून ज्ञान मिळवू शकणार्या साधकांना अनेक प्रश्न विचारतात आणि साधकही तत्परतेने त्यांची उत्तरे टंकलिखित करून देतात. गुरुदेव ‘साधकांना मिळालेले ज्ञान योग्य आहे ना ?’, हे पडताळतात. ते म्हणतात, ‘‘काही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना असलेला वाईट शक्तींचा त्रास आणि त्यांची आध्यात्मिक पातळी यांमुळे त्यांची विश्वमन अन् विश्वबुद्धी यांच्याशी असलेली एकरूपता न्यून-अधिक होत असते, तसेच वाईट शक्तीही चुकीचे ज्ञान देतात. त्यामुळे साधकांना मिळालेल्या ज्ञानातील आध्यात्मिक सत्यता पडताळावी लागते.’’ अशा प्रकारे पडताळून संकलित झालेले सूक्ष्मातील ज्ञान सनातन संस्थेने सर्वसामान्यांना अध्यात्म समजावून सांगण्यासाठी ग्रंथांत प्रसिद्ध केलेले आहे. सनातनच्या बहुतांशी ग्रंथांत (आतापर्यंत ३६५ ग्रंथ छापून झाले आहेत.) पृथ्वीवर कुठेही उपलब्ध नसलेल्या दिव्य ज्ञानाचे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. अजूनही पुष्कळसे ज्ञान ग्रंथांद्वारे छापणे बाकी आहे. |
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. |