इस्लामाबाद – लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरच्या दौर्यावर गेले आहेत. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहिलाच दौरा होता. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी संरक्षणतज्ञ कमर चीमा यांनी पाकिस्तानचे सरकार आणि सैन्यदल यांच्यावर सडकून टीका केली आणि ‘पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र विसरल पाहिजे’, असे म्हटले आहे. कमर चीमा यांनी पाकिस्तानने काश्मीरचे सूत्र का विसराव, यासाठी त्यांनी खालील कारणे दिली आहेत.
सौजन्य : Dr. Qamar Cheema
१. पाकिस्तानच्या राजकीय वर्गाला काश्मीरचा प्रश्न कधीच आठवत नाही. जेव्हा त्यांना लोकप्रियता हवी असते, तेव्हाच ते याविषयी बोलतात. निवडणुकीतही हे सूत्र उपस्थित केले जात नाही. एवढेच नाही, तर भारताने पाकव्याप्त काश्मीर घेण्याचे वक्तव्य केले, तेव्हाही त्याचे उत्तरही पाकिस्तानचे नेते देऊ शकले नाहीत.
२. पाकिस्तानी जनता काश्मीरचे सूत्र विसरली आहे. त्यांच्या स्वत:च्याच इतक्या समस्या आहेत की, त्यांना पुनःपुन्हा काश्मीरच्या प्रश्नाची आठवण करून द्यावी लागते.
३. भारताने काश्मीरवर घटनात्मक, राजकीय आणि राजनैतिक विजय मिळवला आहे. पहिल्यांदा भारताने कलम ३७० हटवले, नंतर तेथील सर्वोच्च न्यायालयाने ते योग्य ठरवले आणि आता संपूर्ण जगात भारताने स्वतःची भूमिका अशा प्रकारे मांडली आहे की, त्यात पाकिस्तानची चूक असल्याचे दिसते.
४. पाश्चात्य देश काश्मीरचे सूत्र विसरले आहेत. ते भारताच्या पाठीशी उभे आहेत; कारण भारत ही एक मोठी अर्थव्यवस्था आहे. यासह त्यांना चीनच्या विरोधात शक्ती निर्माण करायची आहे. यामुळेच पाश्चात्त्य देश पाकिस्तानला काश्मीर प्रश्न विसरून पुढे जाण्यास सांगतात.
५. पाकिस्तानची प्रसारमाध्यमे काश्मीरविषयी बोलण्याचे टाळतात. पंतप्रधान मोदी यांच्या काश्मीर दौर्याच्या बातम्या पाकिस्तानात दाखवल्या गेल्या नाहीत.
६. पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनाच पाकिस्तानसोबत रहायचे नाही. ते पाकविषयी समाधानी नाहीत; कारण त्यांना दाखवलेली स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत.
७. भारतात रहाणार्या काश्मिरींना हे ठाऊक आहे की, त्यांचा लाभ भारतासोबत रहाण्यातच आहे. जगामध्ये भारताचा मान असल्यानेेेे, त्यांना त्यांच्यासोबतच रहायला आवडेल.