कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

श्रीरामजन्मभूमीसाठी कारावास भोगणारे हिंदु धर्माभिमानी श्री. सीतारामय्या !

श्री. सीतारामय्या

तेलंगाणातील हिंदु धर्माभिमानी श्री. सीतारामय्या आणि त्यांच्या धर्मपत्नी स्वर्णलता यांनी वर्ष १९९० अन् १९९२ मध्ये झालेल्या कारसेवांमध्ये भाग घेतला होता. वर्ष १९९० च्या कारसेवेत श्री. सीतारामय्या यांनी कारावासही भोगला होता. ‘वर्ष १९९० च्या ३० ऑक्टोबरपासून २ नोव्हेंबरपर्यंत अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीसाठी कारसेवा करण्याविषयी आवाहन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्यासाठी आमच्या शहरातून मी आणि माझी पत्नी सिद्ध झालो. आम्हाला ३० ऑक्टोबर पूर्वी अयोध्येत पोचायचे होते. अयोध्येसाठी आमच्यासह गुंटूर जिल्ह्यातून २०० कारसेवक प्रवास करत होते. आम्ही थेट मध्यप्रदेशपर्यंत गेलो. तेथून पुढे जाऊन उत्तरप्रदेशच्या सीमेवर विश्रांती घेण्यासाठी आम्ही सिद्ध होतो; परंतु त्या वेळी उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे मुलायम सिंह यांचे सरकार होते. त्यांनी संपूर्ण उत्तरप्रदेश सीमा बंद केली होती आणि तेथे पोलीस फौजफाटा ठेवला होता. सीमेच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्‍या कारसेवकांना अटक करून पोलीस तेथे उभ्या असलेल्या बसगाड्यांमध्ये भरून घेऊन जात होते. त्याप्रमाणे ते आम्हालाही बसमधून घेऊन नारायणगाव येथे पोचले. तेथे आम्हाला उतरवण्यात आले. तेथे आम्ही रात्रभर राहिलो. पोलीस ठाण्यामध्ये रामभक्तांना ठेवण्यास जागा नव्हती. त्यामुळे आमच्या पूर्वी पोचलेल्या रामभक्तांना एका शाळेत कुलूपबंद ठेवण्यात आले होते. दुसर्‍या राज्यातून आलेल्या काही स्वयंसेवकांनी पोलिसांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, ‘‘आम्हाला पुढे जायचे नाही. आम्हाला परत नेऊन सोडा.’’ त्यानंतर पोलिसांनी आम्हाला सतना रेल्वेस्थानकावर सोडून दिले. रात्री तेथेच थांबलो. आमच्या जिल्हाप्रमुखाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कृती करत होतो. सकाळी आम्ही रेल्वेने प्रवास चालू केला. त्या वेळी आम्ही आमचे भगवे उपरणे काढून एका साध्या प्रवाशांप्रमाणे अयोध्येकडे निघालो. आम्ही प्रयागराज रेल्वेस्थानकाच्या आधी नंदीग्राम स्थानकावर उतरलो आणि तेथून पुढे अयोध्येला गेलो.

– श्री. सीतारामय्या, तेलंगाणा.


वादग्रस्त बांधकाम पाडण्याचे कार्य श्रीराम करवून घेत असल्याचे जाणवणे !

श्री. अनिर्बान नियोगी

१. श्रीरामाच्या सेवेसाठी लक्ष लक्ष कारसेवकांच्या रांगा…!

‘आतुरतेने वाट पहात असलेला दिवस आला तो ६ डिसेंबर १९९२ ! ती केवळ प्रतिकात्मक कार सेवा असणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. आमच्या हातात रेती देण्यात येईल आणि ती आम्ही तेथे असलेल्या खड्ड्यात घालायची हेही सांगितले होते. आम्हाला खरेतर ही गांधीगिरी असणारी कारसेवा जरी आवडत नसली, तरी आम्ही सर्व समर्पित सैनिक होतो, हेही तितकेच खरे ! आम्हाला ‘सकाळी ९.३० वाजल्यानंतर केव्हाही सेवा चालू होणार’, अशी सूचना होती; म्हणून आम्ही सर्वजण स्नान करून, भोजन ग्रहण करून रांगेत उभे होतो. त्या सेवेसाठी आम्ही सकाळीच ९ वाजता सज्ज राहिलो होतो. आमच्या अनेक रांगा प्रत्येकी १ किलोमीटर लांबीच्या होत्या. आम्ही सर्व सैनिक शिस्तीत उभे होतो. श्रीरामाचे लक्ष लक्ष भक्त जणू श्रीरामाला पूजेत अर्पण करण्यासाठी फुले, फळे आणि मिठाई घेऊन उभे असल्यासारखे ते दृश्य होते.

२. वादग्रस्त वास्तू पडतांनाचा कालावधी आणि प्रत्यक्ष घटना

सकाळी ११.३० च्या सुमारास पहिली मोठी घटना घडली. एक तरुण माणूस हातात एक वीट घेऊन वादग्रस्त ठिकाणाच्या बाजूने धावत आला. त्यानंतर काही मिनिटांतच दुसरा माणूस तशीच वीट हातात घेऊन त्या ठिकाणाहून आला. त्याच्या मागोमग तिसरा तशीच हाती वीट घेतलेला आला. आम्ही सर्वजण स्तंभित होऊन हे सर्व पहात होतो. काय करावे ? ते आम्हाला सुचत नव्हते. आम्ही हाती वीट घेतलेल्या त्या व्यक्तीकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी सांगितले की, ती वादग्रस्त वास्तू पाडण्यात येत होती आणि तिच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या त्या विटा त्या व्यक्ती स्मृतीचिन्ह म्हणून स्वतःसमवेत घरी घेऊन जात होत्या. आम्ही सर्व गोंधळून गेलो; परंतु थोडी वाट पहाण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतरच आम्ही एका ठिकाणी पोचलो. ज्या ठिकाणाहून ती वादग्रस्त वास्तू दिसू शकेल, त्या ठिकाणी मी पोचलो होतो. कारसेवक त्या वास्तूच्या वरच्या टोकाला उभे राहून उपलब्ध उपकरणांनी वास्तूचे बांधकाम तोडायचा प्रयत्न करत होते. इतक्या उंचीवरून केलेले त्यांचे प्रयत्न फारसे यशस्वी होत नव्हते. बराच वेळ त्यांचे निष्ठेने प्रयत्न चालू होते. नंतर त्या ठिकाणी एक साध्वी आल्याचे मला स्मरते. तिने हाती ध्वनीक्षेपक (मायक्रोफोन) घेतला आणि सूचना दिली की, कारसेवकांनी वरून खाली यावे आणि खालून खणण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या वास्तूचा पाया ढिला होईल. त्याप्रमाणे कारसेवकांनी पाया खणायला प्रारंभ केला.

मोठे जाड पाईप वापरून ती वादग्रस्त वास्तू बंद केली गेली होती. जवळजवळ २० फुटांहून अधिक लांबीचे हे पाईप होते. त्यातील काही पाईप कारसेवकांनी काढले आणि त्यांचा उपयोग केला. २० हून अधिक कारसेवक एक पाईप खांद्यावर घेऊन १० पावले मागे येत आणि पुढे धावत जाऊन तेथील भिंतीवर आघात करत होते. ही पद्धत वापरून त्यांना यश मिळाले. हे बांधकाम पाडण्यापूर्वीच श्री रामललाला तेथून एका सुरक्षित जागी हालवण्यात आले होते, हे नमूद करणे योग्य ठरेल.

३. कारसेवकांचे बेभान होऊन कार्य करणे हे श्रीरामाप्रती अत्यंतिक प्रेमाचे प्रतीक !

एका घटनेचा उल्लेख केल्यावाचून रहावत नाही. पंजाब, हरियाणा आणि देहली येथून आलेले शीख सैनिक आमच्यात सहभागी झाले होते. एका सरदारजीच्या डोक्याला पट्टी बांधली होती. तोही घोषणा देत आनंदात सहभागी झाला होता. जवळून निरखून पहातांना ती पट्टी लाल झाल्याची दिसत होती. ती पट्टी रक्ताने माखली होती, तरी तो आनंदाने इतरांमध्ये हसत नाचत होता. ते बांधकाम पाडत असतांना कदाचित् त्याला मार लागला असल्याची शक्यता होती. असे असूनही त्या सरदारजीचा जोश वाखाणण्याजोगा होता, हे निर्विवाद ! श्रीरामाप्रती अत्यंतिक प्रेम वाटण्याचे ते प्रतीक होते.

४. प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव

सर्व बांधकाम पाडण्याचे कार्य श्रीराम करून घेत असल्याची जाणीव ज्या व्यक्तींना होती, त्यांनी नक्कीच पाहिले असणार की, बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. ते उभेच कसे कोसळले ? खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?

जसजसा अंधार पडू लागला, तसे आम्ही सर्व सैनिक आपापल्या छावणीकडे परतलो. रात्रीचे भोजन घेतल्यानंतर आम्हाला भगवान श्रीरामाचे तात्पुरते निवासस्थान उभारण्याविषयी माहिती मिळाली. पुन्हा कारसेवक रांगेत उभे राहिले आणि त्या बांधकामासाठी लागणारे साहित्य रिले पद्धतीने पोचवू लागले.’

– श्री. अनिर्बान नियोगी, ‘तरुण हिंदु’, कोलकाता, बंगाल.


इंदूर, मध्यप्रदेश येथील भारत रक्षा मंचच्या मध्य भारत प्रांताचे उपाध्यक्ष श्री. देवेंद्र पेंडसे यांचे अनुभव

श्री. देवेंद्र पेंडसे

१. पहिल्या कारसेवेनंतर हिंदूंमध्ये जागृती

मुलायम सिंह यांनी पहिल्या कारसेवेच्या वेळी केलेल्या निर्दयी हत्याकांडानंतर साध्वी ऋतंभरा, श्री. अशोक सिंघल आणि साध्वी उमा भराती यांची ओजस्वी भाषणे सर्व ठिकाणी गाजत होती. कारसेवकांच्या बलीदानाचे ‘व्हिडिओ’ दाखवून हिंदूंमध्ये जागृती केली जात होती. श्रीरामशिळांचे पूजन केले जात होते.

६ डिसेंबरला अयोध्येत जाण्याचा संदेश मिळाला. वयस्कर माता-भगिनी, लहान मुले आदी कारसेवेसाठी वानरसेनेप्रमाणे अयोध्येकडे रेल्वेगाड्यांमधून ‘जय श्रीरामा’चा जयघोष करत निघाले हाेते. फैजाबाद येथील सरस्वती मंदिरात आमची व्यवस्था करण्यात आली. चौकाचौकांत माता-भगिनी लंगर (अन्नदान) चालू करून कुणी उपाशी रहाणार नाही, याकडे लक्ष देत होत्या. संपूर्ण अयोध्येत संतांचे तंबू पडले होते. मोठमोठे हिंदु नेते भाषणे देत होते.

६ डिसेंबरला आमचा गट अयोध्येकडे निघाला. ज्या माता-भगिनी प्रतिदिन जेवू घालत होत्या, त्यांच्या हातांत औक्षणाचे तबक होते. त्या एकच मंत्र सांगत होत्या ‘काम पूर्ण करूनच परता, अन्यथा तोंडही दाखवू नका.’ बघता बघता अयोध्या चारही बाजूंनी विविध प्रांतांतून आलेले प्रशिक्षित आणि सामान्य कारसेवक यांची गर्दी होऊ लागली. पडलेल्या ढाचाच्या विटा आणि माती अयोध्येतून परतणार्‍या रेल्वेगाड्यांतून अनेक कारसेवकांनी स्वतःसमवेत नेली.

२. मुसलमानांकडून रेल्वेगाड्यांवर दगडफेक

कानपूर येथील मुसलमान रेल्वेलाईनच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने जमले होते. आमच्या रेल्वेत गस्त कडक करण्यात आली. सांखळी खेचून रेल्वे थांबवली जात होती. रेल्वे जिथे थांबेल, तेथे गाडीवर दगडफेक होत होती. रात्रभर रेल्वेगाडीवर दगडफेक होत होती, तरीही रेल्वे पुढे जात होती. त्यानंतर कडक सुरक्षाव्यवस्थेत मध्यप्रदेश पोलिसांनी आम्हाला त्यांच्या वाहनांत बसवून घरापर्यंत पोचवले.

– श्री. देवेंद्र पेंडसे, उपाध्यक्ष, मध्य भारत प्रांत, ‘भारत रक्षा मंच’ आणि सदस्य, ‘वन्दे मातरम् लॉ असोसिएट’, इंदूर, मध्यप्रदेश.