पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांची मागणी !
पुणे – ८३ वर्षांचे पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू मागील ११ वर्षांपासून कारागृहात आहेत. अद्यापही त्यांची सुटका झालेली नाही. ज्यांनी लाखो धर्मांतरितांना हिंदु धर्मात परत आणले, गेल्या ५० वर्षांपासून ज्यांनी समाजातील मागासलेल्या आणि गरजू घटकांच्या उत्थानासाठी कठोर सेवा केली, अशा बापूंनी इतकी वर्षे कारावास भोगणे कितपत योग्य आहे ? वर्ष २०२१ मध्ये कोरोनाचा गंभीर त्रास झाल्यानंतर त्यांचे ‘हिमोग्लोबिन’ ३ इतके झाले होते; मात्र अनेक दिवस अतीदक्षता विभागात असतांना बापूजींना ‘पॅरोल’ (बंदीवानाला विशिष्ट मुदतीसाठी काही अटींवर मुक्त करणे) मिळाला नाही. त्यांना आधीच ‘ट्रायजेमिनल न्युरेल्जिया’ (चेहर्याच्या ठिकाणी होणार्या प्रचंड वेदना), किडनी आणि यकृत यांसारख्या अनेक गंभीर आजारांनी ग्रासले आहे.
सनातन धर्मासाठी सर्वस्व अर्पण करणार्या संतांच्या बाजूने बोलण्याचे धाडस कुणीही करू शकत नाही का ? बापूंवर अन्याय होत असून त्यांच्या मानवी हक्कांचे हनन होत आहे. अशा स्थितीत सामान्य जनता, हिंदु समाज आणि त्यांचे भक्त यांची न्यायव्यवस्थेकडे एकच मागणी आहे की, त्यांचे वय, प्रकृती आणि सामाजिक कार्य यांचा विचार करून त्यांना तत्परतेने जामीन किंवा पॅरोल मिळावा, तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जावेत, अशी मागणी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापूंच्या भक्तांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.