Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा धोका नाही !

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा अभ्यास

नवी देहली – भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने, म्हणजेच ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (‘आय.सी.एम्.आर्.’ने) कोरोना लसीच्या संदर्भात केलेल्या एका संशोधनाअंती सांगितले की, कोरोना लसीमुळे तरुणांचा अचानक मृत्यू होण्याचा कुठलाही धोका नाही.

१. या अभ्यासानुसार रुग्णालयात भरती केल्यामुळे, तसेच आकस्मिक मृत्यू होण्याचा कौटुंबिक इतिहास आणि जीवनशैलीच्या काही सवयी, यांमुळे कोरोनाकाळात अचानक मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले.

२. या सवयींमध्ये मृत्यूपूर्वी ४८ घंटे सतत दारू पिणे, अमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करणे अथवा मृत्यूच्या ४८ घंटे आधी विविध प्रकारचे तीव्र शारीरिक कष्ट करणे, यांचा समावेश आहे.

३. अहवालात असेही म्हटले आहे की, या लसीचा किमान एक डोस घेतल्यास लोकांमध्ये अशा आकस्मिक मृत्यूचा धोका अल्प होऊ शकतो.

देशातील ४७ रुग्णालयांमध्ये करण्यात आला दीड वर्ष अभ्यास !

आय.सी.एम्.आर्.ने केलेले हे संशोधन १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या दीड वर्षाच्या कालावधीत देशभरातील ४७ प्रमुख रुग्णालयांमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासावर आधारित आहे. १८ ते ४५ वयोगटांतील ७२९ लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. हे असे लोक होते, जे निरोगी होते आणि त्यांना कोणताही मोठा आजार नव्हता. असे असले, तरीही अज्ञात कारणांमुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला. अभ्यासात असे दिसून आले की, ज्या लोकांनी लसीचे दोन डोस घेतले होते, त्यांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता अल्प होती, तर ज्यांनी एक डोस घेतला होता, त्यांचा अचानक मृत्यू होण्याची शक्यता थोडी अधिक होती.