आतंकवादाचा प्रतिशोध घेणार्‍या इस्रायलच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत ! – सात्‍यकी सावरकर, स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू

इस्रायलच्‍या समर्थनार्थ पुणे येथे पदयात्रा पार पडली !

पुणे, १२ नोव्‍हेंबर (वार्ता) – हमासने इस्रायलवर केलेल्‍या आतंकवादी आक्रमणात अनेक निष्‍पाप मारले गेले. त्‍यांनी लहान मुलांनाही अमानुषपणे मारले आहे. आता इस्रायल हे आतंकवादाचा प्रतिशोध घेत आहे. हमास ही आतंकवादी संघटना आहे; म्‍हणून इस्रायलच नव्‍हे, तर जो देश अथवा संघटना आतंकवादाच्‍या विरुद्ध उभी राहील, त्‍याच्‍या पाठीशी आम्‍ही ठामपणे उभे आहोत. वर्ष १९४८ मध्‍ये स्‍वतंत्र इस्रायलच्‍या निर्मितीसाठी स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. त्‍यामुळे इस्रायलची पहिली संसद भरली, तेव्‍हा त्‍यांनी सावरकर यांचा उल्लेख करत त्‍यांचे अभिनंदन केले होते. त्‍यामुळे इस्रायलच्‍या समर्थनार्थ असलेली ही पदयात्रा सारसबाग येथील वीर सावरकर स्‍मारक येथून चालू केली आहे, असे प्रतिपादन स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू श्री. सात्‍यकी सावरकर यांनी केले. ७ ऑक्‍टोबर या दिवशी हमास या आतंकवादी संघटनेकडून इस्रायलवर आक्रमण करण्‍यात आले. या भ्‍याड आक्रमणाचा निषेध करण्‍यासाठी, तसेच या आक्रमणात मृत्‍यूमुखी पडलेल्‍या नागरिकांना श्रद्धांजली वहाण्‍यासाठी ११ नोव्‍हेंबर या दिवशी पुणे येथे या पदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍या वेळी ते बोलत होते.

हमासचा निषेध करणारे फलक धरलेले नागरिक

‘हर घर सावरकर समिती’ आणि ‘भारत इस्रायल मैत्री मंच’ यांच्‍या वतीने पदयात्रेचे आयोजन केले होते. या पदयात्रेची सांगता टिळक रस्‍ता येथील ‘न्‍यू इंग्‍लिश स्‍कूल’ येथे झाली. या पदयात्रेत विविध मान्‍यवरांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत इस्रायलला पाठींबा दर्शवला. ‘भारत-इस्रायल मैत्री मंच’चे श्री. रणजीत नातू, श्री. विद्याधर नारगोलकर, ‘पतित पावन संघटने’चे स्‍वप्‍नील नाईक, ‘विराट हिंदुस्‍थान संगम’चे जगदीश शेट्टी, इस्रायली नागरिक अदेलीया पेणकर, तसेच विश्‍व हिंदु परिषद, हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना, यांच्‍यासह ३०० देशप्रेमी बांधव सहभागी झाले होते. या पदयात्रेला भारतातील इस्रायली बांधवही सहभागी झाले होते.

सावरकरांचे राष्‍ट्राच्‍या सीमांसंबंधित विचार आजही प्रेरणादायी ! – देवव्रत बापट, हर घर सावरकर समिती

स्‍वातंत्र्यवीर सावरकरांनी पूर्वी परकीय आक्रमणांपासून वाचवण्‍यासाठी भारताच्‍या सीमांचे रक्षण करण्‍यास सांगितले होते. त्‍याचप्रमाणे इस्रायल आपल्‍या सीमांचे संरक्षण करत आहे. त्‍याने ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्‍या आक्रमणापासून आपल्‍या सीमांचे रक्षण करण्‍यासाठी प्रत्‍युत्तर दिले आहे. जगभरात इस्रायलच्‍या समर्थनार्थ एकही पदयात्रा निघालेली नाही.

हमासमधील मदरशांतून मुलांना इस्रायली नागरिकांना मारण्‍याचे प्रशिक्षण दिले जाते ! – ससून फणसपूरकर

हमासने इस्रायलवर आतंकवादी आक्रमण करून निरपराध लहान मुले, वृद्ध आणि महिला यांना पकडून त्‍यांच्‍यावर अनन्‍वित अत्‍याचार केले. महिलांना जिवंत जाळण्‍यात आले. या घटनेने हिटलरच्‍या अत्‍याचारांची आठवण करून दिली. त्‍यांच्‍या मुलांना इस्रायली नागरिकांना कसे मारायचे, हे मदरशामधून शिकवले जात आहे.

पदयात्रेत उपस्‍थित शेकडो नागरिक

जग विरोधात असतांना भारतातून समर्थन मिळणे अतिशय महत्त्वाचे आहे !  – अदेलीया पेणकर, इस्रायली महिला

मी इस्रायली सैन्‍यात होते. मी पुण्‍यातही रहायला होते. सगळे जग आमच्‍या विरोधात असल्‍याचे चित्र आहे. त्‍यामध्‍ये भारतातून, विशेषतः पुण्‍यातून इस्रायलच्‍या समर्थनार्थ पदयात्रा निघाली आहे. भारतात कधीच ज्‍यू लोकांच्‍या विरोधात अत्‍याचार झाले नाहीत. त्‍यांना तेवढेच आदरातिथ्‍य मिळाले; म्‍हणून या पदयात्रेला अतिशय महत्त्व आहे.

एस डी पी आय सारख्या संघटनांच्या कारवायांवर पोलिसांनी नजर ठेवावी ! – श्री. रणजित नातू

पुणे येथे एसडीपीआय संघटनेने हमासच्या समर्थनार्थ मोर्चे काढले. एसडीपीआय ही पीएफआयची राजकीय बाजू हाताळणारी संघटना आहे. पोलिसांनी अशा संघटनांवर नजर ठेवली पाहिजे. त्यांच्याकडून काय कारवाया होत आहेत, यावरही नजर ठेवायला हवी. यातूनच भारतीयांना सुरक्षित केले जाऊ शकेल. भारतीय संत परंपरा आपल्याला लढण्यासाठी शिकवत आली आहे. भारताने अशा संकटांवर निश्चित मात केली आहे हे आपल्याला सर्जिकल स्ट्राईक वरून लक्षात येते.

प्रत्‍येक भारतियाने हमासच्‍या आतंकवादी आक्रमणाचा निषेध करायला हवा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखा

हमासने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणाचा प्रत्‍येक भारतियाने निषेध केला पाहिजे आणि इस्रायलच्‍या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. दुर्दैवाने भारतातील काही लोक इस्रायलच्‍या विरोधात मोर्चे काढत आहेत. आपण त्‍यांना जाब विचारला पाहिजे.