हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवाद : ‘कॅनडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ !’
मुंबई – कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे वडिल पंतप्रधान असतांना खलिस्तानची मागणी करणार्या तलविंदर सिंग परमार या आतंकवाद्याने विमानात बाँबस्फोट करून शेकडो शिखांना मारले होते. तत्पूर्वी शीख प्रवासी जहाज ‘कामागाटामारू’ याला कॅनडामध्ये प्रवेश नाकारून त्यावर गोळीबार करण्यात आला. हा कॅनडाचा शीख प्रेमाचा इतिहास आहे. कॅनडा हा आतंकवाद्यांचे समर्थन करणारा देश नव्हे, तर आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे, असे रोखठोक विधान ‘झटका सर्टिफिकेशन अॅथॉरिटी’चे अध्यक्ष श्री. रवीरंजन सिंह यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॅनडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ’ या विषयावर आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.
श्री. रवीरंजन सिंह पुढे म्हणाले की, कॅनडा हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचा निखालस खोटा आरोप भारतावर करत असून यामागे पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. अन्य देशाच्या सीमेत जाऊन देशद्रोह्यांना ठार करण्याचा आपला कायदा नाही. तसेच कुणी अधिकारी स्वतःची नोकरी धोक्यात घालून असे कृत्य करणार नाही. खलिस्तान हा असा आजार आहे, ज्याच्यावर अनेक डॉक्टर उपचार करत आहेत; पण जोपर्यंत पाकिस्तान नेस्तनाबूत केले जात नाही, तोपर्यंत ही समस्या नष्ट होणार नाही. आक्रमण हाच बचावाचा मार्ग आहे. भारतात शिखांच्या काही समस्या आहेत; पण त्याला खलिस्तानशी जोडू नये. त्या समस्या वैध मार्गाने मांडाव्यात. त्यासाठी शत्रू राष्ट्रांशी मिळून देशविरोधी कारवाया करणे, हे केव्हाही चूक आहे. हिंदू आणि शीख बांधव आहेत. या दोघांना विलग करणे, ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’ची राजकीय खेळी आहे. ‘शिखांचे ४ तख्त असतांना वर्ष १९६० मध्ये ५ वे तख्त निर्माण करणे’, हा याच षड्यंत्राचा भाग आहे. तसेच गुरुपतवंत सिंग पन्नू हा शीख धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे त्याला शिखांचे नेतृत्व करण्याचा कोणताही अधिकार नाही.
भारतविरोधी शिकवले जाणार असेल, तर कॅनडामध्ये मुलांना पाठवायचे का ? याचा विचार करा ! – सौ. संदीप मुंजाल, ‘रणरागिणी’ महिला शाखा, हिंदु जनजागृती समिती
कॅनडाच्या गुरुद्वाराबाहेर आजही निज्जरच्या समर्थनाची भित्तीपत्रके लावण्यात आलेली आहेत. तेथे भारताच्या राजनैतिक अधिकार्यांची छायाचित्रे लावून त्यांच्या हत्येला उद्युक्त केले जात आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांनी तेथील लक्ष्मीनारायण मंदिरावर आक्रमण केल्याप्रकरणी कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे कॅनडा सरकार हे पूर्णतः खलिस्तानी आतंकवाद्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. कॅनडामध्ये भारतातून शिकण्यासाठी जाणार्या मुलांवर भारतीय पालक कोट्यवधी रुपये व्यय करतात; मात्र ज्या देशाचे धोरण भारतविरोधी आहे, अशा देशात भारतविरोधीच शिकवले जाणार, याचा विचार आता पालकांनी करणे आवश्यक आहे.