होमिओपॅथी ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे आणि अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ?

‘घरच्‍या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ याविषयीची लेखमाला !

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही कोणत्‍याही संसर्गजन्‍य आजारांना वा विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता अशा विविध आजारांवर घरीच उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. या उपचारपद्धतीविषयीची माहिती या लेखाद्वारे देत आहोत.

१ सप्‍टेंबरला प्रसिद्ध झालेल्‍या लेखात आपण ‘आपल्‍या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे, काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्‍यून करणारे औषध घेणे आवश्‍यक असणे, औषध सिद्ध करायची पद्धत आणि औषधाचा परिणाम कसा ओळखायचा ?’, यांविषयीची माहिती वाचली. आज लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.                              

(भाग ५)

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/716188.html

५. होमिओपॅथी ‘स्‍वउपचारा’विषयी मार्गदर्शक सूत्रे

५ आ १२. औषध किती दिवस घ्‍यायचे ? : होमिओपॅथीमध्‍ये ‘अमुक दिवस औषध घ्‍यायचे’, असे नसते. औषध चालू केल्‍यावर जर १ ते २ दिवसांनी बरे वाटू लागले किंवा ज्‍या मात्रेनंतर (dose नंतर) बरे वाटू लागेल, त्‍यानंतर ते औषध घेणे बंद करावे. थोडक्‍यात ज्‍या क्षणापासून आपल्‍याला बरे वाटू लागेल, उदा. ताप उतरला किंवा जुलाब थांबले की, औषध घेणे बंद करायचे.

आजार नवीन आहे कि जुनाट ? यावरही औषध किती कालावधी घ्‍यायचे, हे ठरते, उदा. तापावर चालू केलेल्‍या औषधाचा परिणाम लगेच दिसतो. त्‍यामुळे ताप उतरला की, लगेच औषध बंद करायचे असते. याउलट संधीवात, दमा, पाठदुखी यांसारख्‍या जुनाट आजारांना बरे व्‍हायला काही कालावधी लागू शकतो. जर आपल्‍या आजारावर योग्‍य औषध शोधण्‍यात आपण यशस्‍वी झालो, तर आजार पूर्ण बरा होतो. अन्‍यथा जुनाट आजाराने डोके वर काढले असता आपण योग्‍य औषध शोधून ते घ्‍यावे आणि त्‍यानंतर आजाराचा त्रास ५० टक्‍के न्‍यून झाला की, औषध बंद करावे. काही कालावधीनंतर त्रास जर पुन्‍हा उद़्‍भवला, तर आधीचेच औषध पुन्‍हा चालू करायचे.

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

५ आ १३. औषध पालटण्‍याचा विचार केव्‍हा करायचा ? : औषध चालू केल्‍यानंतर काहीतरी सकारात्‍मक पालट दिसणे अपेक्षित आहे. छोट्या कालावधीचे आजार, उदा. ताप, जुलाब यांमध्‍ये औषध चालू करून १ दिवस उलटला, तरी जरा सुद्धा पालट होत नसेल, तर ‘हे औषध आजारावर काम करत नाही’, असा निष्‍कर्ष आपण काढू शकतो. त्‍यानंतर ‘सूत्र क्र. ५ आ १ आणि ५ आ ३’ (अनुक्रमे २५ ऑगस्‍ट आणि १ सप्‍टेंबर या दिवशी ही सूत्रे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध केली आहेत.) यांमध्‍ये सांगितल्‍याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुनश्‍च करून आपल्‍या आजारावर गुणकारी औषध शोधावे.

याउलट बर्‍याच मासांपासून किंवा वर्षांपासून असलेले दमा, संधीवात, कंबरदुखी, पाठदुखी इत्‍यादी जुनाट आजारांविषयी औषध पालटण्‍याचा निर्णय लगेच घेता येत नाही. अशा आजारांमध्‍ये आपल्‍यासाठी गुणकारी औषध शोधल्‍यावर ते प्रत्‍येकी ४ गोळ्‍या दिवसातून २ वेळा (सकाळी आणि रात्री) असे १५ दिवस घ्‍यावे. त्‍यानंतर आपल्‍या आजाराच्‍या स्‍थितीचा आढावा घ्‍यावा. आजाराची लक्षणे जर कमी झाली असतील, तर वाट पाहू शकतो. जर त्रास परत उद़्‍भवला नाही, तर औषध पुन्‍हा घ्‍यायला नको. जर त्रास पुन्‍हा चालू झाला किंवा न्‍यून झाला; परंतु पूर्ण बरा झाला नाही, तर पुन्‍हा १५ दिवस औषध घेऊन आधीप्रमाणे आढावा घ्‍यावा. एकूण १ मास औषध घेतल्‍यावरही बरे वाटत नसेल, तर पुन्‍हा आजारावर वर दिल्‍याप्रमाणे पुन्‍हा औषध शोधावे; शक्‍य असल्‍यास होमिओपॅथी डॉक्‍टरांचा सल्ला घ्‍यावा. जुनाट आजार बरा व्‍हायला काही कालावधी जावा लागतो; परंतु होमिओपॅथी औषधाने आजाराची तीव्रता न्‍यून होते आणि दोन दुखण्‍यांमधील कालावधी वाढत जातो.

५ आ १४. आजार बरा झाल्‍यानंतर शिल्लक राहिलेल्‍या औषधाचे काय करायचे ? : जर आजार बरा झाला; परंतु त्‍या आजारावरील औषधाच्‍या सिद्ध केलेल्‍या गोळ्‍या शिल्लक असतील, तर एका प्‍लास्‍टिकच्‍या पाकिटावर औषधाच्‍या नावाची पट्टी चिकटवून त्‍यात ती बाटली घालून ठेवायची. त्‍यानंतर ६ मास किंवा एक वर्ष यानंतरही जर कुणाला त्‍या औषधाची आवश्‍यकता भासली, तर आपण त्‍याचा उपयोग करू शकतो.

५ आ १५. होमिओपॅथी औषध चुकून अधिक प्रमाणात घेतले गेल्‍यास काय करावे ? : जर लहान मुलांनी चुकून होमिओपॅथी औषधाच्‍या संपूर्ण बाटलीभर गोळ्‍या खाल्‍ल्‍या, तरी काळजीचे कारण नाही. आपण त्‍यांना कॉफी प्‍यायला देऊ शकतो. कॉफी प्‍यायल्‍याने औषधाचा परिणाम निघून जातो. याचे कारण कॉफी हे होमिओपॅथी औषधांसाठी ‘हारक परिणाम’ (antidote) करणारे आहे.

डॉ. अजित भरमगुडे

५ आ १६. आपल्‍या लक्षणांशी साधर्म्‍य असलेले होमिओपॅथी औषध सापडलेच नाही, तर काय करायचे  ? : जर आपल्‍या आजारांच्‍या लक्षणांशी जुळणारे गुणधर्म असणारे होमिओपॅथी औषध आपल्‍याला सापडले नाही, तर अशा वेळी आपण ‘बाराक्षार औषध’ घेऊ शकतो. प्रत्‍येक आजारासाठी कोणते ‘बाराक्षार औषध’ घ्‍यायचे, ते बहुतेक आजारांच्‍या प्रकरणांच्‍या शेवटी दिलेले आहे. काही आजारांमध्‍ये, उदा. ‘भाजणे’ यामध्‍ये आपण भाजलेल्‍या त्‍वचेवर कोणते होमिओपॅथी औषध (कॅन्‍थरिस व्‍हेसिकाटोरिया (Cantharis Vesicatoria)) लावायचे, हे नेमकेपणाने दिले असल्‍यामुळे त्‍या प्रकरणात बाराक्षार औषधाविषयी दिलेले नाही. बाराक्षार औषधाविषयी विस्‍तृत माहिती पुढे देण्‍यात येणार आहे.

६. अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असल्‍यास काय करावे ?

होमिओपॅथी औषधे ऊर्जेच्‍या स्‍तरावर कार्य करतात. होमिओपॅथी औषधांच्‍या पांढर्‍या साखरेच्‍या गोळ्‍या या मूळ औषधाच्‍या केवळ वाहक आहेत. त्‍या गोळ्‍या स्‍वतः औषध नाहीत; म्‍हणूनच होमिओपॅथीची सर्व औषधे एकसारखीच दिसतात. होमिओपॅथी उपचारपद्धती ही निर्मूलनाच्‍या तत्त्वावर आधारित आहे – व्‍यक्‍तीच्‍या अस्‍तित्‍वात असमतोल निर्माण करणारे शरीर आणि मन (नकारात्‍मक विचार अन् भावना रूपी) यांतील विषजन्‍य (toxic) घटकांचे निर्मूलन करून पुन्‍हा समतोल घडवून आणणे. त्‍यामुळे होमिओपॅथी औषधे अन्‍य पॅथीच्‍या औषधांच्‍या कार्यात हस्‍तक्षेप करत नाहीत, तसेच अन्‍य पॅथीची औषधे होमिओपॅथी औषधांच्‍या कार्यावर परिणाम करत नाहीत. त्‍यामुळे अन्‍य पॅथीनुसार उपचार चालू असले, तरीही आपण होमिओपॅथी उपचार घेऊ शकतो. होमिओपॅथी उपचार चालू केल्‍यावर अन्‍य पॅथीचे उपचार मनाने बंद करू नयेत. अन्‍य पॅथीची औषधे कमी किंवा बंद करायची असल्‍यास त्‍या त्‍या पॅथीच्‍या तज्ञांचा सल्ला घेऊन त्‍यांच्‍या देखरेखेखाली तसे करावे.

७. घरगुती साठ्यात ठेवायची होमिओपॅथी औषधे

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

७ अ. घरगुती वापरासाठी होमिओपॅथी औषधांचा साठा ठेवायची आवश्‍यकता का आहे ? : छोट्या कालावधीचे आजार (acute illnesses) आणि दुखापती काहीही पूर्वसूचना नसतांना अचानक उद़्‍भवतात. त्‍या वेळी आवश्‍यक ती औषधे विकत घेणे कठीण किंवा अशक्‍य असू शकते. या दृष्‍टीने सर्वसाधारण आजारांवर गुणकारी औषधे आपल्‍या साठ्यात ठेवणे लाभदायी ठरते. लांबच्‍या प्रवासाला जातांना ही औषधे आपण आपल्‍या समवेत नेऊ शकतो.

अ‍ॅलोपॅथीमध्‍ये एखाद्या आजारासाठी सामान्‍यतः एकच किंवा २-३ सामायिक औषधे असतात; कारण औषध आजारानुसार दिले जाते. त्‍यामुळे एखाद्या आजारावर साधारणतः तीच औषधे त्‍या आजाराच्‍या बहुतांश रुग्‍णांना दिली जातात. होमिओपॅथीमध्‍ये तसे नसते. या चिकित्‍सापद्धतीत ‘रुग्‍णामध्‍ये आजाराची दिसणारी लक्षणे जे औषध निरोगी व्‍यक्‍तीला दिल्‍यानंतर तशी लक्षणे निर्माण करते’ ते औषध दिले जाते. त्‍यामुळे एकच आजार असणार्‍या विविध रुग्‍णांसाठी औषध वेगवेगळे असते. आपल्‍या साठ्यात जेवढी अधिक औषधे असतील, तेवढी पुढे आपल्‍याला झालेल्‍या आजाराची लक्षणे आणि ‘तशीच लक्षणे आपला गुणधर्म असणारे औषध’ आपल्‍याकडे असण्‍याची शक्‍यता अधिक असते.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/720134.html

आगामी ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत.