होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची मार्गदर्शक सूत्रे

‘घरच्या घरी करता येतील, असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’, याविषयीची लेखमाला !

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही. सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, अम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. या उपचारपद्धतीविषयीची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

२५ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘होमिओपॅथी उपचाराचे लाभ आणि होमिओपॅथी ‘स्वउपचारा’विषयीची काही मार्गदर्शक सूत्रे’, वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

(भाग ४)

संकलक : होमिओपॅथी डॉ. प्रवीण मेहता, डॉ. अजित भरमगुडे आणि डॉ. (सौ.) संगीता भरमगुडे

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/714211.html

आपण याआधीच्या ११ आणि १८ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘होमिओपॅथी म्हणजे काय ?’, ‘होमिओपॅथी उपचारपद्धतीची मूलभूत तत्त्वे’ इत्यादी सूत्रे समजून घेतली. ती अद्याप वाचली नसल्यास ती आधी अवश्य वाचून, समजून घ्यावी. ती समजून घेतल्याने स्वतःवर, तसेच आपल्या जीवलगांवर उपचार करण्यामागील मूलतत्त्वे समजायला सोपे जाईल

होमिओपॅथी वैद्य (डॉ.) प्रवीण मेहता

५ आ ३. आपल्या आजारावर नेमके गुणकारी औषध शोधणे : ‘होमिओपॅथी’विषयी प्रसिद्ध करण्यात येणार्‍या ग्रंथात प्रत्येक आजाराच्या संक्षिप्त माहितीच्या नंतर त्या आजारावर गुणकारी होमिओपॅथीच्या औषधांची माहिती दिली आहे. यात प्रत्येक औषधाचे गुणधर्म (म्हणजे ते औषध निरोगी व्यक्तीला दिल्यानंतर तिच्यात निर्माण होणारी लक्षणे) थोडक्यात दिले आहेत. हे गुणधर्म वाचून आपल्या लक्षणांशी साम्य असलेले गुणधर्म असणारे औषध निवडायचे आहे, उदा. आपल्याला ताप आला असतांना त्यासह मन अस्वस्थ असणे आणि पुष्कळ तहान लागणे अन् त्यासाठी पुष्कळ प्रमाणात थंडगार पाणी पिणे, अशी लक्षणे असतील, तर त्यावर ‘ॲकोनाईट नॅपेलस (Aconite Napellus)’, हे औषध घ्यायचे असते; मात्र तापासह चेहरा लाल आणि फुललेला दिसणे, ताप आला असतांना तहान अजिबात नसणे, अशी लक्षणे असतील, तर त्यावर ‘बेलाडोना (Belladona)’, हे औषध घ्यायचे असते.

यावरून केवळ ताप या एकाच मुख्य लक्षणावर आधारित औषध निवडायचे नसते, तर त्या आजारावरील कोणत्या औषधाच्या विशिष्ट लक्षणांशी आपली लक्षणे सर्वाधिक जुळतात, हे पाहून ते औषध घ्यायचे असते.

ताप आल्यानंतर आपल्यामध्ये जाणवलेली विविध लक्षणे आणि त्या प्रकरणात दिलेल्या एखाद्या औषधाच्या गुणधर्माशी जिथे अधिकाधिक साधर्म्य दिसते, त्या औषधाचे नाव आपल्या कागदावर लिहावे. जर २-३ औषधांशी साधर्म्य जाणवत असेल, तर पुन्हा सर्व औषधांचे गुणधर्म वाचून त्यातील कोणत्या औषधाशी आपली लक्षणे सर्वाधिक जुळतात, ते पहावे.

५ आ ४. एकच औषध घेणे : जरी आपल्या आजाराच्या लक्षणांचे २-३ औषधांच्या गुणधर्मांशी साधर्म्य  जाणवत असेल आणि त्यामुळे एकच औषध निश्चित करता येत नसेल, तरी एका वेळी त्यातल्या त्यात सर्वाधिक साधर्म्य असणारे एकच औषध आपण घ्यायचे असते.

५ आ ५. काही आजारांविषयी आरंभी लक्षणांची तीव्रता न्यून करणारे औषध घेणे आवश्यक असणे :  काही आजारांविषयी, उदा. ‘पोटदुखी’, या आजाराच्या प्रकरणात ‘पोटामध्ये वेदना होत असतांना त्वरित वेदनामुक्ती व्हावी, यासाठी मॅग्नेशियम फॉस्फोरिकम्  (Magnesium Phosphoricum) या औषधाच्या ४ गोळ्या अर्धा कप कोमट पाण्यामध्ये विरघळवून त्यातील १ चमचा पाणी प्रत्येक १५ मिनिटांनी वेदना थांबेपर्यंत घ्यावे’, असे दिलेले आहे. याप्रमाणे ज्या आजारांविषयी दिलेले असेल, तिथे त्या आजाराची लक्षणे चालू झाल्यावर उपचाराच्या आरंभी आधी ते औषध घ्यावे. त्यानंतर ‘सूत्र क्र. ५ आ ३’ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपली लक्षणे त्या आजारावर गुणकारी औषधांपैकी ज्या औषधाच्या गुणधर्मांशी सर्वाधिक जुळतात ते औषध चालू करावे.

डॉ. अजित भरमगुडे

५ आ ६. औषध सिद्ध करायची पद्धत : पुढे ‘सूत्र क्र. ७’ मध्ये सांगितल्याप्रमाणे बाजारात मिळणार्‍या होमिओपॅथीच्या औषधासाठी वापरात येणार्‍या करंगळीच्या लांबीच्या प्लास्टिकच्या बाटलीमध्ये ‘४०’ क्रमांकाच्या साखरेच्या गोळ्या भरून त्यात आपण निवडलेल्या औषधाचे ३-४ थेंब टाकून बाटलीचे टोपण लावून बाटलीतील गोळ्या वर-खाली कराव्या. यामुळे औषध प्रत्येक गोळीवर समान पसरते. त्यानंतर त्यातील ४ गोळ्या जिभेखाली ठेवाव्या. या बाटल्या आणि साखरेच्या गोळ्या होमिओपॅथी औषधाच्या दुकानात मिळतात.

बाजारात अनेक ‘पोटन्सी’ची (शक्तीची) औषधे उपलब्ध असतात; परंतु स्वउपचार करण्यासाठी आपण सामान्यतः केवळ ‘३०’ पोटन्सीचे औषध वापरायचे. यापेक्षा वेगळ्या ‘पोटन्सी’चे औषध वापरायचे असेल, तर तिथे आम्ही दिलेले आहे; अन्यथा अन्य पोटन्सीचे औषध केवळ तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

५ आ ७. औषधांच्या बाटल्यांवर व्यक्ती आणि औषध यांच्या नावाची पट्टी (लेबल) लावणे आवश्यक असणे :  घरात एकाच वेळी २-३ व्यक्तींना होमिओपॅथी औषध चालू आहे, असे होऊ शकते. अशा वेळी प्रत्येकासाठी औषधाच्या गोळ्या सिद्ध करण्यापूर्वी ती व्यक्ती आणि औषध यांचे नाव बाटलीवर घालून मगच त्यात साखरेच्या गोळ्या अन् औषधाचे थेंब घालून औषध सिद्ध करावे.

५ आ ८. औषध घ्यायची पद्धत : औषध घेतांना डबीतून  ४ गोळ्या डबीच्या झाकणात (टोपणात) घेऊन त्या झाकणातून थेट जिभेखाली ठेवायच्या. त्या आपोआप विरघळतात. औषधाच्या गोळ्या गिळू नयेत. औषध सामान्यतः जिभेच्या खाली ठेवून घेतले जाते; परंतु नवजात शिशूंमध्ये ते त्यांच्या मनगटावर, पायांच्या तळव्यांना किंवा पायाच्या अंगठ्याच्या घडीमध्ये (big toe skin fold) लावू शकतो. ज्या प्रौढ व्यक्ती गोळ्या घेऊ शकत नाहीत, उदा. कोमामध्ये असलेल्या व्यक्ती, अशांना औषध हुंगायला देऊ शकतो. अशा वेळी औषधाचे झाकण काढलेली बाटली रुग्णाच्या नाकाखाली ३० सेकंद धरावी.

डॉ. (सौ.) संगीता अ. भरमगुडे

५ आ ९. औषध घेतांना घ्यायची खबरदारी

अ. औषध घेण्याच्या १५ मिनिटे आधी आणि घेतल्यानंतर १५ मिनिटे काहीही खाऊ-पिऊ नये.

आ. अत्तर, कापूर, गरम मसाले (वेलची, मिरी) इत्यादी उग्र गंधांपासून, तसेच सूर्यप्रकाशापासून औषध लांब ठेवावे.

इ. औषध घेण्यापूर्वी आणि नंतर १ घंटा टूथपेस्ट (त्यात असलेल्या पुदिनामुळे (mint मुळे) वापरू नये. सर्दीची पोटात घ्यायची, तसेच त्वचेवर लावायची ‘व्हिक्स व्हेपोरब’सारखी औषधे (त्यांत असलेले कापूर, मेन्थॉल, निलगिरीचे तेल यांमुळे) टाळावी.

५ आ १०. औषध प्रतिदिन किती वेळा घ्यायचे ? : सामान्यतः औषध सकाळी, दुपारी आणि रात्री, असे ३ वेळा घ्यायचे असते; परंतु ताप, अतीसार अशा छोट्या कालावधीच्या आजारांसाठी (acute illnessesसाठी) आवश्यकतेनुसार दिवसातून ३ ते ८ वेळाही घ्यावे लागू शकेल. अपघात होऊन दुखापत झाली असेल, तर प्रत्येक घंट्यालाही औषध घ्यावे लागू शकते.

५ आ ११. औषधाचा परिणाम होत आहे, हे कसे ओळखायचे ? : होमिओपॅथी औषधांचा परिणाम व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतो. काही जणांमध्ये औषध चालू करताच लक्षणांमध्ये स्पष्ट घट दिसू लागते. काही जणांच्या लक्षणांमध्ये घट होण्यापूर्वी त्यांत काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळू शकते. काही जणांविषयी त्यांच्या आजाराच्या विशिष्ट लक्षणांत (उदा. त्वचेवरील पुरळ) फारसा पालट न होता, त्यांना एकूण शरीर आणि मन यांच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक पालट जाणवतो. होमिओपॅथीमध्ये एकूण सकारात्मक पालट हे चांगले लक्षण मानले जाते; कारण असे होणे, हे ‘औषध आजारावर सर्वांत मूलभूत स्तरावर कार्य करत आहे’, याचे दर्शक असते. अर्थात् पुढे सर्वच लक्षणे जाणे अपेक्षित आहे आणि तसेच होते.

आगामी ‘घरच्‍या घरी करता येतील असे ‘होमिओपॅथी’ उपचार !’ या ग्रंथातील निवडक भाग प्रत्‍येक शुक्रवारी लेखाच्‍या रूपात प्रसिद्ध करण्‍यात येणार आहे. तरी स्‍वउपचार करण्‍याच्‍या दृष्‍टीने साधक, वाचक, राष्‍ट्र-धर्मप्रेमी, हितचिंतक, अर्पणदाते यांनी हे लेख संग्रही ठेवावेत.