विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे मोठे यश ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन

‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

नवी देहली – भारताचे यान चंद्रावर यशस्वीपणे उतरल्यावर जगभरातून भारतावर कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे हे मोठे यश आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस म्हणाल्या की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचल्यासाठी भारताचे अभिनंदन. या मोहिमेमध्ये सहभागी असलेले सर्व शास्त्रज्ञ आणि अभियंते यांची ही  अविश्‍वसनीय कामगिरी आहे. या मोहिमेमध्ये तुमच्यासमवेत सहभागी असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नेही भारताचे अभिनंदन केले आहे. नासाने म्हटले आहे, ‘चंद्रावर यशस्वीपणे यान उतरवणारा चौथा देश बनल्यासाठी भारताचे अभिनंदन. या मोहिमेमध्ये भारतासमवेत काम करतांना आम्हाला फार आनंद होत आहे.’ नासाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला (‘इस्रो’ला) अंतर मोजण्याचे आणि संपर्कात रहाण्याची उपकरणे दिली आहेत.

१. ब्रिटनची अंतराळ संशोधन संस्था ‘यु.के.एस्.ए.ने म्हटले की, भारताने इतिहास घडवला आहे. विज्ञान क्षेत्रात एवढे मोठे यश मिळवले त्यासाठी भारताचे अभिनंदन.

२. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेने लिहिले की, इस्रोने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवले. यामुळे मानवजातीला चंद्र अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास साहाय्य होईल. या यशासाठी इस्रोचे अभिनंदन.

३. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन म्हणाले की, इस्रो आणि भारत यांचे हार्दिक अभिनंदन. चंद्रयान-३ चे हे यश अतुलनीय आहे; कारण आतापर्यंत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर इतर कोणताही देश पोचू शकलेला नाही. तुमचे हे यश आम्हा सर्वांना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचण्याची प्रेरणा देईल.

४. नेपाळचे परराष्ट्रमंत्री एन्.पी. सौद म्हणाले की, चंद्रयान-३च्या यशस्वी कामगिरीसाठी भारताचे हार्दिक अभिनंदन. आपल्या भारतीय मित्रांसाठी हा केवळ राष्ट्रीय अभिमानाचा क्षण नाही, तर अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रगतीतील एक मैलाचा दगड आहे. ही कामगिरी आपले जीवन सुधारण्यास हातभार लावील.

५. मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी म्हटले की, भारताने इतिहास रचला. आम्ही भारताचे शेजारी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. हे संपूर्ण मानवतेचे यश आहे. अंतराळ संशोधनासाठी नवीन मार्ग खुले होत आहेत. इतिहास घडवल्यासाठी भारताचे अभिनंदन.