माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे ९२ व्या वर्षी निधन !

नवी देहली – भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे २६ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. म्हातारपणामुळे त्यांना विविध शारीरिक त्रास होत होते. २६ डिसेंबरच्या सायंकाळी ते बेशुद्ध पडल्याने त्यांना देहलीच्या एम्स रुग्णालयात तातडीने हलवण्यात आले. रात्री ९.५१ ला त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला, अशी माहिती रुग्णालयाने प्रसारित केलेल्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली.

मनमोहन सिंह यांचा जन्म वर्ष १९३२ मध्ये तत्कालीन पंजाब प्रांतात झाला. त्यांनी वर्ष १९७२ मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून दायित्व पाहिले होते. वर्ष १९८२ ते १९८५ या कालावधीत ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. ऑक्टोबर १९९२ मध्ये ते राज्यसभेत खासदार म्हणून निवडून आले. गेली ३३ वर्षे म्हणजे एप्रिल २०२४ पर्यंत ते खासदार राहिले. वर्ष २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कालावधीत सिंह हे भारताचे पंतप्रधान होते. त्यांच्याकडे भारताच्या आर्थिक उदारीकरणाचे जनक म्हणून पाहिले जाते.